Saturday, November 28, 2020

धुंदी

धुंदी
काही व्यक्ती किंवा काही गोष्टी पहिल्या की आपल्याला आपोआप आनंद होतो .बरे वाटते .त्या व्यक्तींचा आणि त्या घटनांचा आपल्याशी कधीही संबंध आलेला नसतो.पण त्यांच्या देहबोलीतून खूपच सकारात्मकता जाणवते .उदासीनता दूर होते .सालं.... असे लाईफ हवे मनात शब्द उमटतात.मला ही कधीकधी अश्या व्यक्ती अधूनमधून दर्शन देतात. 
मार्केटमध्ये खरेदीला गेल्यावर एका गल्लीत स्कुटर पार्क करून मी उभा राहतो. सौ.इथून हलू नका असा दम देत त्या गर्दीत घुसते.तिथे दोन चार ते पाच वर्षांची मुले खेळत असतात. हातात बॉल आणि काठी . दोघेही जगाशी संबंध नसल्यासारखे बागडत असतात .आपल्यात विश्वात मग्न,आजूबाजूच्या गाड्या डोक्यावरचे ऊन, पायाला चटके देणारा रस्ता याकडे लक्ष न देता ते आपल्या धुंदीत खेळत असतात.त्यांच्याकडे पाहून वाटते असे लाईफ हवे.....
शेट्टीच्या नटराजमध्ये आठवड्याच्या ठराविक दिवशी एका कोपऱ्यात तो बसलेला असतो. मला आणि विक्रमला पाहताच तो ओळखीचा हात हलवतो. मला कसेतरी वाटते पण विक्रम जुनी ओळख असल्यासारखा हात दाखवतो .थोड्या वेळाने त्याच्या गळ्यातून मुकेश रफी किशोर बाहेर येतात . पूर्ण नटराज ते ऐकत असते पण कोणीही त्याला थांबवित नाही . साल इतके सहज कसे वागता येते याला असा विचार मनात येतो....पण आत कुठेतरी बरे वाटलेले असते .
अण्णाच्या बाजूच्या टपरीवर ती नेहमी येते.मांड्यांना घट्ट बसणारी जीन्स...टाईट बिझनेस शर्ट असा तिचा पेहेराव . झोकात ती मेंथॉल सिगारेट मागते . आजूबाजूला कोण आहे...?? कोण बघतेय...??याची पर्वा न करता जोरदार कश मारत मोबाईलशी चाळा करीत ती एका कोपऱ्यात उभी राहते .दुनियेला कस्पटासमान समजणाऱ्या तिच्या देहबोलीकडे पाहून बरे वाटते .
संध्याकाळो धावतपळत गर्दीने भरलेल्या त्या रेल्वे स्टेशनात आपण शिरतो .समोर 6.40 ची ठाणे फास्ट उभी .फक्त एक मिनिटात गाडी सुटणार असते आणि अचानक ठेका धरणारे म्युझिक सुरू होते .चारी बाजूने काही तरुण तरुणी अचानक तो ठेका पकडून नाचायला सुरवात करतात .म्युझिक वाढत जाते वातावरण अजून धुंद होते समोरची ट्रेन सोडून आपण त्या ठेक्यावर नाचायला सुरवात करतो .xxx गेली दुनिया ...पाच मिनिटात म्युझिक बंद होते आणि आपण 6.50 ची डोंबिवली फास्ट पकडायला धावतो .पण ती पाच मिनिटे खूप काही देऊन जातात ...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment