Tuesday, November 10, 2020

दोस्ती बडी चीज है ...३

दोस्ती बडी चीज है ...३
 कॉलेजच्या त्या खाचखळग्यांनी दगडधोंड्यानी भरलेल्या ग्राउंडवर खेळायला भीतीच वाटायची. अश्यावेळी फुटबॉल मॅचला गोलकिपर कोण...?? ही चिंता आम्हाला सतावायची.... शेवटी उड्या मारून जखमा कोण करून घेईल....??
.शेवटी आम्हाला एकजण सापडला. कधीही कोणाच्या आध्यातमध्यात नसलेला. लेक्चर संपताच सरळ घरची वाट पकडणारा....आमच्या ग्रुपला लांबून हात दाखवणारा.. रितेश नवरंगे हा गोरा गोमटा नाजूक  मुलगा आम्हाला नाही बोलणार नाही याची खात्री होतीच. तो गोलकीपर म्हणून तयार झाला.
 पहिल्या मॅचमध्ये गोल अडवताना त्याने ज्या अचाट उड्या मारल्या ते पाहून आम्ही हादरलोच. अंगावर जखमा घेऊन विजयी वीरांच्या जोशात त्याने सर्वाना अभिवादन केले त्याच क्षणापासून तो आमच्यातील झाला.
 कसलाही विचार न करता झोकून देण्याची हीच सवय त्यांच्या पुढील आयुष्यात यशाची गुरुकिल्ली बनली .पुढे त्याने इंजिनियरिंगची पदवी घेतली .पण त्या मशीन आणि टेक्नॉंलॉजीमध्ये मन रमले नसावे.
 बऱ्याच वर्षांनी ठाण्यात भेटला. अर्थात तेव्हा आम्ही सर्व पुरुष झालेलो. पण हा आमच्यापेक्षा वयाने लहान असूनही विचारी पुरुष वाटत होता. डोक्यावरचे केस गायब झालेले .
गाडीत बसून त्याने मारलेली हाक पुन्हा जुन्या काळात घेऊन गेली.मग टपरीवर कटिंग पिता पिता जुन्या आठवणी जाग्या झाल्या.तो टुरिझम क्षेत्रात उतरला होता. मामाच्या गावाला जाऊया हि संकल्पना घेऊन संगमेश्वर येथे तुरळ या गावात त्याने छोट्या मुलांना नजरेसमोर ठेवून छान पिकनिक प्लॅन अरेंज करत होता . छोट्या छोट्या मुलांचे कॅम्प घेऊन जायचे त्यांना गावाची ओळख करून द्यायची..संस्कृतीची ओळख करून द्यायची...भारतीय परंपरा ,रीतिरिवाज शिकवणे .मुलांसोबत मुक्त मनाने मैदानी खेळ खेळावे, झाडावरील फळे तोडणे..विहिरीत डुंबणे, बैलगाडीतून प्रवास करणे अश्या गोष्टीत रमून गेला .त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मन मोकळे करू लागला.
आमच्या स्टार्ट गिविंगच्या कामात नेहमी बॅकफूटवर राहून अडचणींवर मात करणारा रितेश खरोखरच स्वतःचे आयुष्य मनासारखे उपभोगतोय हे पाहून खूप आनंद होतोय. आजही आमच्यासाठी तो गोलपकीपरच आहे .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment