Friday, January 1, 2021

दोस्ती बडी चीज है .....६

दोस्ती बडी चीज है .....६
साल १९९०
खरे तर त्या दोघीही माझ्यापेक्षा वयाने मोठ्याच. कॉलेजमध्ये बदली क्लार्क म्हणून आलेल्या.पण हळू हळू ओळख झाली आणि मॅडमच्या जागी कधी एकेरी उल्लेख होऊ लागला ते कळलेच नाही .
एक संगीता तर दुसरी सुनीता.
संगीता बडबडी...अग्रेसिव्ह .. ती सतत बोलत असते.झोपते....तेव्हाच तिची बडबड बंद असते असे आमचे म्हणणे.तिला फोन करायचा तर हातात दीड दोन तास तरी हवेच. 
तर सुनीता बहुलीसारखी दिसणारी शांत....हळुवार हसणारी. मोजून मापून बोलणारी. दोघांनाही माझे कान पकडण्याचा आणि टपल्या मारायचा अधिकार होताच आणि अजूनही आहे.
आम्ही तिघेही विरुद्ध स्वभावाचे .पण मैत्री जुळायला ट्युनिंग लागते आणि ते आमच्यात आहे. 
पुढे दोघीही कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर निघून गेल्या . पण संगीता माझ्या सतत संपर्कात होती. शक्य  असेल तेव्हा भेटायचो .घरी येणे जाणे होतेच . आयुष्यातील सुख दुःख ,चढ उतार आम्ही एकत्र पाहिले.. अनुभवले..शेयरही केले. चांगल्या वाईट क्षणांचे आम्ही साक्षीदार आहोत.
सुनीता मात्र गायब झाली. बरीच वर्षे आम्ही तिला शोधत होतो.एक दिवशी अचानक तिचा फोन नंबर मिळाला आणि पुन्हा संपर्क झाला.
सुनीता एका मूक बधिर शाळेत टीचर आहे.आमचे स्टार्ट गिविंग फौंडेशन नुकतेच सुरू झाले होते . तिला ते आवडले आणि आमच्या स्टार्ट गिविंग फौंडेशनची सक्रिय कार्यकर्ती झाली. समाजसेवेची आवड असल्यामुळे मनापासून आम्हाला मदत करते. आमच्यासोबत कार्यक्रमाला हजर राहते . 1990 पासून मैत्रीचा हा प्रवास चालू आहे . कधी काही वाटले तर फोन करणे मन मोकळे करणे चालूच असते.
परवा नेहमीप्रमाणेच सुनीताचा फोन आला . 31 डिसेंबर संगीताच्या घरी साजरा करायचा का ...?? अर्थात माझा होकार होता. तसेही दोन वर्षे तिला भेटलो नव्हतोच . मग 31 ला सकाळीच तिच्या घरी हजर झालो . मग चालू झाली बडबड ,हास्य विनोद ,जुन्या आठवणी मग छान शाकाहारी जेवण पुन्हा टेरेसवर बसून गप्पा .पाच कधी वाजले कळलेच नाही . वर्षातून दोन वेळा तरी भेटूच असे ठरवूनच तिथून निघालो .
दोस्ती बडी चीज है.....😀😀😀😀
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment