Wednesday, January 6, 2021

इश्वाकूचे वंशज .....अमीश

इश्वाकूचे वंशज .....अमीश
रामचंद्र शृंखला...१
अनुवाद...... संध्या पेडणेकर
अमीशच्या लेखणीतून उतरलेला आधुनिक राम अशी या पुस्तकाची ओळख करता येईल.पुराणकाळातील पूज्यनिय व्यक्तीला शास्त्रीय चौकटीत बसविण्याचे काम लेखक उत्तम प्रकारे करतो.सगळ्या भारतीयांचा पूजनीय आदर्श पुरुष राम आपल्या समोर लेखक उभा करतो आणि आपल्या मनातील रामायणाच्या कथेला छेद देतो.
अयोध्येच्या राजा आणि सम्राट दशरथ लंकेचा राजा कुबेर याच्याशी झालेल्या युद्धात पराभूत होतो.कुबेराचा सेनापती रावण याच्या कुशल युद्ध कौशल्यामुळे दशरथ राजाचा आयुष्यात पहिल्यांदा पराभूत होतो.या युद्धात दशरथाची पट्टराणी कैकयी आपलाजीव धोक्यात घालून त्याला वाचवते.
त्याचवेळी अयोध्येत पहिल्या पत्नीच्या पोटी रामाचा जन्म होतो.पण अयोध्येच्या पराभवामुळे राम अपशकुनी समजला जातो आणि दशरथाच्या तिरस्काराला कारणीभूत होतो.
आपल्या मनात रामानंद सागरचे रामायण असेल तर हे पुस्तक वाचताना आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतील. यातील नायक आणि इतर सहज सोपी भाषा बोलतात . ते  अंतर किलोमीटर मध्ये मोजतात आणि वेळेला तास मिनिट ही म्हणतात . यातील राम लक्ष्मण भरत एकमेकांना एकेरी नावाने हाक मारतात. 
रामाला चौदा वर्षे वनवास का भोगावा लागला याची कारणे वेगळी आहेत .तर मंथराची वेगळीच ओळख आहे . संपूर्ण पुस्तकात रामाला एका विशिष्ठ हेतूसाठी तयार केले आहे असे जाणवत राहते . यात ऋषी वशिष्ठ आणि ऋषी विश्वामित्र यांच्याही वेगळ्या भूमिका आहेत. 
लेखकाने  रामाला कायद्याचा आदर आणि कायदा कठोरपणे राबविणारा नगरप्रमुख बनविले आहे . कायद्यापुढे सगळे समान हेच त्यांचे प्रमुख सूत्र आहे .
दशरथाचे रावणाशी युद्ध येथून पुस्तकाची सुरवात होते आणि सीतेचे अपहरण येथे पुस्तकाचा शेवट होतो.
रामाचे प्रशिक्षण.. युद्धनीती.. कायद्याचे पालन करण्यासाठी कठोर भूमिका घेणारा राम ... सीतेचे स्वयंवर या सर्व प्रसंगाचे लेखकाने अतिशय बारकाईने वर्णन केले आहे. 
एक वेगळा राम आणि रामायण वाचताना आपल्याला कुठेही कंटाळा येत नाही .

No comments:

Post a Comment