Monday, April 26, 2021

रद्द_झालेल्या_परीक्षा

#संकल्पना
#रद्द_झालेल्या_परीक्षा
कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर म्हटली जाते. यावेळी तर तरुण आणि लहान मुलांना ही लागण झाली.एक प्रकारची नकारात्मकता सगळीकडे दिसून आली. सध्या  शासनाने मृत्युदर रोखण्यावर आणि कोरोना पेशंट बरे होण्यावर प्राथमिकता दिली.असे म्हणतात ना की जान सलामत तो पगडी पचास.
गेले वर्षभर विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे हाल चालू आहेत. ऑनलाईन शिक्षण सर्वानाच जमत नाही.योग्य मार्ग सापडत नाही. पण खरोखर इतकी परिस्थिती गंभीर आहे का ...??
 मागील पिढीचा अर्थात आपल्या पिढीचा विचार केला तर क्लास हा प्रकार जवळजवळ नव्हताच .शिक्षक जे काही शिकवतील त्यावरच अभ्यास करायचा.दहावीचे नवनीतचे 21 अपेक्षित प्रश्नसंच खूप फेमस . त्यावरच रट्टा मारून परीक्षेला जायचे . त्यावेळी क्लास ही फक्त तीन विषयांसाठी होते . दहावीतील प्रत्येक विद्यार्थी क्लास लावायचा असे नाही . काही जण तर शाळेतही हजेरीसाठी येत.स्वतः अभ्यास करण्यावर बहुतेक विद्यार्थ्यांचा कल होता.
हल्ली तशी परिस्थिती राहिली नाही. शाळा सुटली की क्लास सुरू ...त्यानंतर घरी आल्यावर क्लास आणि शाळेचा अभ्यास .सोळा ते सतरा तास विद्यार्थी अभ्यासात बिझी राहतोय .त्याला परीक्षेत नुसते पास व्हायचे नाही तर चांगले मार्क मिळवायचे आहेत.
विद्यार्थी  पूर्ण तयारीत आहे आणि अश्यावेळो परीक्षाच रद्द झाली तर ....??  मला माहितीय 100% विद्यार्थ्यांना हा निर्णय मान्य नाही .कोणालाच हा निर्णय पचनी पडणार नाही .परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन शासनाने आम्ही परिस्थितीपुढे हतबल आहोत हेच सिद्ध केले आहे . आज प्रत्येक विद्यार्थी दोन किलोमीटर च्या परिघात शाळेत जातो .जर त्याची शाळा हेच त्यांचे सेंटर ठेवले तर त्याला प्रवास करणे सोयीचे ठरेल.शासनाने परीक्षेसाठी वेगळी यंत्रणा राबवायला हवी. आरोग्य उपचार आणि नंतर शिक्षण या गोष्टीला प्राथमिकता द्यायला हवी.
प्रत्येक विद्यार्थ्यांची...शिक्षकाची..टेस्ट करूनच त्यांना परीक्षेसाठी सेंटरमध्ये येणाची परवानगी असावी . जास्त विद्यार्थी असतील तर दोन सत्रात परीक्षा घ्यावी . त्यासाठी पेपरसेट ही वेगळे असावे .प्रत्येक शाळेत दहावीचे किती विद्यार्थी असतील याचे नोंद करून त्याप्रमाणे आयोजन केले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील . प्रत्येक परीक्षेत रिस्क ही असतेच तशीच रिस्क इथेही आहे फक्त आपल्याला काळजी घ्यायला हवी .योग्य अंतर ,मास्क ,सॅनिटायझर ,वापरल्यास बरीचशी रिस्क कमी होईल .
शेवटी जो अभ्यास करतो त्यालाच यश मिळते .आणि त्याला आपले मूल्यमापन इतरांप्रमाणे समान व्हावे हे वाटणार नाही . परीक्षा ही झालीच पाहिजे त्यासाठी जबाबदार संस्थेने आपली पूर्ण ताकद  आणि वेळ यासाठी दिला पाहिजे . विद्यार्थ्यांकडे पेपर सोडविण्यासाठी तीन तास आहेत तर यंत्रणेकडे 24 तास आहेत . विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त दहा पेपर सोडवायचे आहेत आणि यंत्रणेकडे पूर्ण महिना आहे . जर विद्यार्थी वर्षभर दिवसरात्र अभ्यास करू शकतात तर यंत्रणा महिनाभर दिवसरात्र या परीक्षेसाठी योजना आखू शकत नाही का ??? 
आज प्रत्येक शाळेत दहावीचे किती विद्यार्थी आहेत ते कुठे राहतात याची नोंद आहे जर त्यांनी त्याप्रमाणे वेळापत्रक आखले तर नक्कीच यातून योग्य मार्ग निघेल .
शासन आणि संबंधित यंत्रणा यांनी मनावर घेतले तर नक्कीच परीक्षा होऊ शकतील
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment