Friday, April 30, 2021

द लास्ट डॉन.... मारिओ पुझो

द लास्ट डॉन.... मारिओ पुझो
अनुवाद....अनिल काळे
मेहता पब्लिशिंग हाऊस
१९६५  साल....आज  डॉन क्लेरिकुझिओ फॅमिलीत त्याच्या दोन नातवांचा बाप्तिस्मा समारंभ होता.बरोबर एका वर्षांपूर्वी सॅन्टाडिओ फॅमिलीशी झालेल्या युद्धात डॉनचा तरुण मुलगा आणि जावई मृत्युमुखी पडले होते.
आज डॉन आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेणार होता . आपली मुले अमेरिकेच्या उद्योगधंद्यात अधिकृतपणे सहभागी व्हावीत त्यांनी सभ्य जीवन जगावे अशी योजना आखली होती. 
त्याप्रमाणे त्याने मोठ्या मुलाला अमेरिकेतील वॉल स्ट्रीटमध्ये आणि आर्थिक क्षेत्रात तर दुसरया मुलाला हॉटेल व्यवसायात आणि तिसरा मुलगा बांधकाम क्षेत्रात जम बसवतील या दिशेने पाऊल टाकण्यास सुरवात केली .त्याचा भाचा वेगासमधील मोठे हॉटेल आणि कॅसिनो सांभाळेल अशीहि व्यवस्था केली होती.
त्याचा भाचा पिप्पी हा फॅमिलीचा प्रमुख हत्यारा राहील अशी घोषणाही केली.या पुढे क्लेरिकुझिओ फॅमिली कोणत्याही अनधिकृत धंद्यात न उतरता केवळ इतर फॅमिलीना संरक्षण देईल त्यांचे काळे पैसे पांढरे करतील असे ठरले.
भविष्यात अमेरिकेतील सभ्य समाजात वावरताना काही संघर्षाची बीजे आताच आपण रोवून ठेवलीय हे डॉनला कुठे माहीत होते.
१९९०.... आज क्लेरिकुझिओ फॅमिली बलाढ्य झालीय.डॉनच्या तिन्ही मुलांनी आपापल्या उद्योगधंद्यात जम बसविला आहे.तर पिप्पी वेगासमध्ये कॅसिनो संभाळतोय. बाप्तिस्मा झालेले डॉनचे दोन्ही नातू आता तरुण झालेत. पिप्पीचा मुलगा क्रॉस अतिशय शांत आणि बापासरखा हुशार आहे . तोही आता कॅसिनोमध्ये लक्ष देतोय तर डॉनचा दुसरा नातू दान्ते फॅमिलीत लक्ष देतोय पण गुन्हेगारी त्याच्या रक्तातच आहे .रक्तपात खून मारामारी त्याला आवडते .क्रॉसविषयी त्याच्या मनात असूया आहे.
अथेना हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री. ती कारकिर्दीतील महत्वाचा चित्रपट करतेय पण तिचा नवरा मध्येमध्ये त्रास देतोय. या त्रासातून तिला सुटका हवीय. क्रॉस आपल्या बहिणीच्या शब्दाखातर तिला या त्रासातून सोडवतो त्याच वेळी तो तिच्या प्रेमात ही पडतो.फॅमिलीना न कळवता तो तिच्या मार्गातील काटा दूर करतो.तिच्या चित्रपटाचा सहनिर्माता ही बनतो.फॅमिली या गोष्टींमुळे नाराज होते .क्रॉसचे फॅमिलीमधील स्थान ही धोक्यात येते.
सर्व व्यवस्थित सुरू असताना पिप्पीचा भर रस्त्यात खून होतो. एका भुरट्या चोराने पिप्पीची हत्या केलीय असे पसरविण्यात येते. पण फॅमिलीचा प्रमुख हत्यारा भुरट्या चोराकडून मारला जाईल हे क्रॉसला पटत नाही .फॅमिलीच्या रिवाजनुसार तो वडिलांच्या हत्येचा सूड घेण्याचे ठरवितो .
कोण आहे पिप्पीचा खरा मारेकरी...?? त्यामागे कोण सूत्रधार आहेत...?? कोण आहे लास्ट डॉन...?? यासर्वाची उत्तरे पूर्ण पुस्तक वाचून मिळतील.
माफिया फॅमिलीच्या कारभाराचे हुबेहूब वर्णन मारिया पुझोने केले आहे.अतिशय थंड रक्ताने निर्णय घेणारा डॉन आपल्या अंगावर काटा आणतो .

No comments:

Post a Comment