Friday, April 9, 2021

सीता रामायणाचे चित्रमय पुनर्कथन....देवदत्त पट्टनाइक

सीता रामायणाचे चित्रमय पुनर्कथन....देवदत्त पट्टनाइक
अनुवाद...विदुला टोकेकर
मंजुल पब्लिशिंग हाऊस
कोणत्याही अडीअडचणीच्या काळात..दुःखात..वादळी प्रसंगात अशी एक कथा सांगायला शक्तीदेवी शिवाला सांगते आणि रामायण या कथेचा जन्म होतो .
त्यानंतर अनेक भाषेत अनेक राज्यात त्यांच्या परंपरेनुसार रितिरिवाजानुसार ही कथा सांगितली जाते.कधी ती गद्य तर कधी पद्य तर कधी नुसत्या अभिनयातून ती सांगितली जाते.
कुठेतरी ती गोष्ट एक कावळा ऐकतो आणि ती जमेल तशी नारदमुनींना सांगतो.नारदमुनी ती वाल्मिकीना सांगतात,वाल्मिकी त्याचे एक संपूर्ण गीत तयार करतात  आणि लवकुशाना शिकवितात. लवकुश ते गीत रामासमोर गातात 
आपल्याला माहीत असलेले रामायण अपूर्ण आहे असे लेखक सांगतो. शिवाने सांगितलेले रामायण एक लाख श्लोकांचे आहे .हनुमान यातील साठ हजार श्लोक सांगतो तर वाल्मिकी चोवीस हजार सांगतात.तर इतर काही प्रांतात आणि विविध भाषेत ते कमीजास्त प्रमाणात सांगितले जाते.
लेखकाने यात अतिशय सरळ आणि सोपी कथा सांगितली आहे जी आपल्याला माहीत आहे पण त्यातील घडणाऱ्या घटनांचे विविध प्रांतात लिहिल्या गेलेल्या रामायणाचे संदर्भ दिले आहेत. एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविध रचनाकारांनी पाहिले आहे आणि त्याची मांडणी केली आहे.
भारतभर अनेक खेडी आहेत जी कोणत्या ना कोणत्या प्रसंगाने रामायणाशी जोडली गेली आहेत . मुंबईतील बाणगंगा तलाव हा रामायणाशी संबंधित आहे . रामाने जमिनीत बाण मारून हा तलाव निर्माण केला असे म्हटले जाते .
असे अनेक संदर्भ आणि वेगवेगळ्या प्रांतातील भाषेतील रामायणाच्या घटना आपण ही एक कथा वाचत जातो आणि रामायणातील इतर पैलूंचे दर्शन होते .

No comments:

Post a Comment