Wednesday, April 7, 2021

माझ्या आठवणीतील परीक्षा

माझ्या आठवणीतील परीक्षा 
मुलगा इंजिनियर डॉक्टर व्हावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. माझ्याही घरच्यांची तशी इच्छा होती.
 पण त्याकाळी मध्यमवर्गीयांना सायन्स.. आर्ट्स. कॉमर्स.. याव्यतिरिक्त दुसरे काहीच माहीत नव्हते. माझ्या चांगल्या नशिबाने दहावीत चांगले गुण मिळाले. पण इंजिनियर व्हायचे म्हणजे नक्की काय..?? याबाबत कोणतेही ज्ञान नव्हते. कोणतरी म्हणाले बारावी करून डायरेक्ट डिग्रीला ऍडमिशन घेऊ. मग मीही त्यांच्या पाठीमागे जाऊन पुन्हा शाळेच्याच ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.
पण नंतर लक्षात आले की हे सायन्स काही आपले क्षेत्र नाही.मग साम दाम दंड भेद या चारसूत्री कलमानुसार बारावीही पास झालो.
तोपर्यंत इंजिनियर म्हणजे काय..?? याचे बऱ्यापैकी ज्ञान मिळाले होते.डिग्रीला नाही पण डिप्लोमाला  शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे ऍडमिशन मिळाले आणि ठाण्यातील एका शांत... कोपऱ्यात असलेल्या त्या पवित्र वास्तूत माझ्या दादर ठाणे फेऱ्या चालू झाल्या.
बारावीचा अनुभव असल्यामुळे पाहिले वर्ष आनंदात गेले .पण दुसरे वर्ष कठीण असते असा समज होता . याचे मूळ कारण म्हणजे मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिटिक्स.भल्याभल्याना हा विषय पार करता येत नाही असा समज होता.अर्थात तो.. जे अभ्यास करीत नाहीत त्यांच्यासाठीच होता हे नंतर मोठे झाल्यावर कळले. त्यामुळे दुसरे वर्ष कसे पार पडेल या काळजीतच आम्ही होतो. आणि त्याप्रमाणे सेटिंग लावायला सुरवातही केली होती.
त्याचवर्षी माझ्या घरी ही गंभीर परिस्थिती होती . माझी मोठी बहीण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती . माझी हॉस्पिटलमध्ये एक फेरी व्हायची. त्यातच परीक्षा सुरू झाली . इंजिनियरिंगला एक बरे असते आपले कॉलेजचं परीक्षेचे सेंटर असते . त्यामुळे परीक्षेतही अगदी रोजचे वातावरण असते . पाहिले पेपर तसे सोपे गेले .सुपरवायझर कॉलेजचेच सर असल्यामुळे फार त्रास झाला नाही .पण आपण हुशार नसलो तरी आपल्या पुढेमागे...आजूबाजूला बसलेले.. आपले वर्गमित्र हुशारच असतील असे काही नसते ना ...?? तरीही पेपर आम्ही एकत्रितपणे सोडविले.
पण आता मुख्य विषय आला .मॅथेमॅटिक्समधील वीस मार्कचे स्टॅट मला येत होते पण बाकीच्या वीस मार्कचे काय.... ?? पास होण्यासाठी चाळीस मार्क लागतात. निदान पंधरा मार्कचे तरी कोणतरी दाखवू दे असे कॅक्युलेशन करून मी बेंचवर बसलो.
यावेळी माझ्या नशिबानेच आमच्या लायब्ररीयन सुपरवायझर म्हणून होत्या .त्यांनी प्रेमाने माझ्या घरच्यांची चौकशी केली.बहिणीची तब्बेत विचारली . आरामात पेपर सोडव म्हणून सल्ला ही दिला.
जसा पेपर हातात आला.. मी ताबडतोब शेवटचे पान उघडून स्टॅटेस्टिक सोडविण्यास सुरवात केली.पेपर हातात पडल्यावर तो आधी पूर्णपणे वाचवा या अंधश्रध्येला बळी पडलो नाही.
इथेही माझा कामचलाऊ अभ्यास कामी आला आणि वीस मार्काचा स्टॅट अर्ध्या तासात सोडवून झाला .पण नंतरचा पेपर पाहतच उरलेला अडीज तास कसा काढावा याची चिंता सुरू झाली.
आजूबाजूचा मित्रपरिवार पेपर सोडविण्यात दंग होता. पेपर कसा आहे याचे चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. काही घाम पुसत होते तर काही नुसतेच पेपरकडे पाहत बसून होते मध्येच माझ्याकडे पाहून हात हलवून कसेनुसे हसायचे .
शेवटी न राहवून शेजारी मन लावून पेपर सोडवत बसणाऱ्या माझ्या मित्राला हाक मारली .त्याने चेहऱ्यावर त्रासिक भाव आणून माझ्याकडे नजर टाकली आणि माझा केविलवाणा चेहरा पाहून शांत झाला.
पहिली उत्तरपत्रिका सोळा पानांची होती.त्याने पाच मिनिटे थांब असे खुणावून परत डोके खाली केले आणि पंधरा मिनिटाने ती सोळा पानांची उत्तरपत्रिका माझ्या हातात दिली. अल्लाउद्दीनचा खजिना सापडल्यागत माझा चेहरा झाला . कमीत कमी चाळीस मार्काचा ऐवज माझ्या हाती लागला होता. मी आनंदाने त्याचा पेपर कॉपी करण्यास सुरुवात केली.
 पण लिहिता लिहिता लक्षात आले की कुठेतरी काहीतरी चुकत होते. काही प्रश्न फक्त चार स्टेपमध्ये सुटत होते त्या प्रश्नाला आठ ते दहा स्टेप होत्या . काही प्रश्नाला आठ मार्क होते त्याच्याही स्टेप्स जुळत नव्हत्या.मरू दे .... आपली उत्तरपत्रिका भरतेय ना ...!! असा विचार करीत मी सर्व उत्तरपत्रिका उतरवून काढली. शेवटी इथून तिथून उत्तरपत्रिका गोळा करीत नव्वद मार्काचा पेपर सोडविला आणि हुश्श करीत बाहेर पडलो .
रिझल्टच्या दिवशी मॅथेमॅटिक्समध्ये केटी निश्चितच.. असे मनात ठरवून नोटीस बोर्डसमोर उभा राहिलो  आणि आनंदाने जोरात आरोळी ठोकली.
मी सर्व विषयात पास झालो होतो .मॅथेमॅटिक्समध्ये चाळीस मार्क मिळाले होते.पण दुःखाची गोष्ट ही होती की मला उत्तरपत्रिका देणाऱ्या मित्राला तीन विषयात केटी लागली होती त्यात मॅथेमॅटिक्स एक होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment