Thursday, September 30, 2021

नवी सुरवात

नवी सुरवात
आज सकाळीच बरीच कामे होती म्हणून ऑफिसला उशीराच निघालो होतो.जी मिळेल ती लोकल पकडून निघायचे असे ठरवून प्लॅटफॉर्मवर पोचलो.तसेही लॉकडाऊन अजून पूर्ण संपले नसल्यामुळे ट्रेनला गर्दी कमीच दिसत होती.
 मी जी लोकल आली त्यात चढलो आणि नेहमीसारखा पुस्तकात डोके घालून बसलो .ट्रेन विक्रोळीला थांबून निघाली आणि थोड्याच वेळात माझ्या बाजूला ती परिचित टाळी ऐकू आली .त्यानंतर भाऊ...!! करून ओळखीचा आवाज.तो आवाज ऐकून मी त्याच्याकडे मान वळवली तेव्हा तो हसत हसत बाजूला बसला आणि सोबत असलेल्या दोन लहान मुलांना समोरच्या सीटवर बसविले .
"भाऊ ... कसे आहात..?? ड्युटी बदलली का ..."?? त्याने आपल्या पुरुषी खर्जातील आवाजात विचारले .
"नाही ...आज लेट निघालोय .पण तू वेळ बदलली हे नक्की ...आणि हे काय ....?? या लहान मुलांनाही हे शिकवतोस का ...."?? मी थोड्या चढ्या आवाजात विचारले.
"बस काय भाऊ .....?? हीच किंमत का आपली ..."?? तो हात जोडत म्हणाला . "मी सर्व बंद केले आता . बघून वाटत नाही का ...."?? 
"खरेच की ... मी पूर्वीच्याच नजरेने त्याच्याकडे पाहत होतो. पण आता तो बदलला होता . छान साडी ,हलका मेकअप . व्यवस्थित बांधलेली एक वेणी . आणि विशेष म्हणजे बऱ्यापैकी स्त्री सारखे बोलणे .अर्थात तिच्यातील पुरुष लपत नव्हता पण ती स्त्री दिसण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होती.
"अरे वा.... हे छान आहे .." मी ताबडतोब कॉप्लिमेंट दिली. तसा तो हसला." पुरुषीपणा लपत नाही म्हणा पण मी प्रयत्न करतेय.."
"मग ही कोण..." ?? मी दोन्ही मुलांकडे बोट दाखवून विचारले .
"आहो हे अनाथाश्रमातील मुले आहेत .मी विक्रोळीला  एका म्हातारीच्या सोबतीला जाते. ती आजी छान बालसंस्कार वर्ग घेते . मग म्हटले महिनाभर याना घेऊन जाऊ . काहीतरी चांगले शिकतील .आमचाही वेळ जाईल. काही पैसे ही मिळतील .आता त्यांना सोडून घरी जाईन ..." तिने मुलांकडे हसून पाहिले.
" वा छान ...!! . पण तुझी कमाई बंद झाली .पूर्वीपेक्षा कमी पैसे मिळत असतील..." मी हसत विचारले .
" किती वर्षे लोकांपुढे टाळ्या वाजवत त्यांना धमकावत ..अचकट विचकट बोलून ..प्रसंगी शरीरावर हात फिरवायची संधी देऊन पैसे काढू भाऊ ...??  उद्या वय झाले की कोण विचारणार नाही आणि हेच जीवन का जगायचे आम्ही. आता चांगले वागायची सुरवात केली तर पुढच्या पिढ्यातरी समाजात ताठ मानेने वावरतील. मानवजातीतील तिसऱ्या वर्गाला आता कुठे हळू हळू सन्मान मिळू लागलाय तो अजून पुढे न्यायला आम्हीच काहीतरी केले पाहिजे...."त्याच्या बोलण्यात कळकळ दिसत होती.
"खरे आहे तुझे ...मग भीक मागणे बंद केले तर भागते कसे तुझे ....."?? मी कुतूहलाने विचारले .
" खूप कामे आहेत भाऊ... हल्ली सर्वाना ऑनलाईन कामे करायची सवय लागली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गरज भासते तिथे माणसेच उपलब्ध नसतात .उदा. हॉस्पिटलमध्ये आजारी माणसांची शुश्रूषा करायला .अनाथाश्रमातील वृद्धांची सेवा करायला . जेवणाचे डबे पोचवायला.  तसेच छोट्या मोठ्या डिलिव्हरीसाठी माणसे हवी असतात .तिथे मी जातो .,जे मिळतील ते पैसे घेतो.तुला माहितीय...मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा ही कोर्स केलाय .."तो मोठ्याने हसत म्हणाला .
"अच्छा …..म्हणून हा बदल आहे तर .…" मी त्याच्याकडे निरखून बघत म्हणालो . तसा तो लाजला आणि क्षणात गंभीर झाला .
"भाऊ... भीक मागण्यापेक्षा हे बरे नाही का ..?? समाजातील उपेक्षित समाज म्हणून आमची गणना होते. गेल्या कित्येक पिढ्या हेच भोगत जगतोय आम्ही.हळू हळू बदल घडतायत.आमच्यातील कित्येकजण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतायत.मग मी ही नव्यानं सुरवात का करू नये ...?? झिरो मिळण्यापेक्षा एक मिळवणे चांगले नाही का ..?? आणि एक मिळाला तरच दोन पुढे तीनचार मिळत जातील ..तो बोलताना हळवा झाला 
.आयुष्याच्या नवीन सुरवातीस माझ्या शुभेच्छा....असे म्हणत मी त्याचे हात प्रेमाने दाबले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment