Saturday, September 4, 2021

श्वास

श्वास
संतोष दिघेला हातात चिकूची पिशवी घेऊन घरात शिरलेले पाहताच मी उडालोच. सौ नेतर बाहेर जाऊन ह्याच्या मागे कोणी आले नाही ना याची खात्री करून आली.
मी मात्र या चिकूच्या बदल्यात मला कितीचा फटका पडेल...?? या चिंतेत पडलो.मुळात हे चिकू संतोषने माझ्यासाठी आणले का ..?? हा सर्वात मोठा गहन प्रश्न . मागच्या वेळी अननस आणला होता तेव्हा सुटे नाही म्हणून माझ्याकडून पैसे घेऊन त्या फळवाल्याला दिले आणि नंतर उपकार केल्यासारखे एक छोटा तुकडा मला देऊन उरलेला अननस एकट्याने संपविला होता .पुढे काही अघटित घडू नये म्हणून ही गोष्ट मी सौपासून लपवून ठेवली होती.
अरे हो ...!! हा संतोष दिघे कोण.. हे तुम्हाला माहीत असेलच . हो तोच.. जो स्वतःला लेखक समजतो . काही मराठी सिरियलचे लेखनही करतो असे आम्हाला सांगतो. सौ ला आणि तिच्या नातेवाईकांना  सिरीयलमध्ये काम करायची संधी देतो असे सांगून बऱ्याचवेळा भरपेट जेवून जातो . कधी कधी सौच्या शिव्या ही खातो.
लेखक असल्यामुळे त्याच्या शबनम बॅगेत दोन चार वह्या.. तीन पेन.. दोन पेन्सिली नेहमी असतात . मला नेहमी आपले लिखाण दाखवतो पण ते ऐकून माझे तोंड बघून ताबडतोब फाडून टाकतो आणि तो कचरा माझ्या हॉल मध्ये सोडून जातो.पण आज त्याच्या खांद्यावर बॅग नव्हती हे पाहून हायसे वाटले.
पण आता त्याने सौला चक्क हाक मारून तिच्या हातात ती चिकूची पिशवी दिली आणि आम्हाला एकदम सुचेनासे झाले .
"घ्या वहिनी ...दोन डझन आहेत.यापुढे तुम्ही चिकू कधीच बाहेरून विकत घ्यायचे नाहीत ..." दिघे हसत म्हणाला .
"म्हणजे या पुढे चिकू तुझ्याकडून विकत घ्यायचे का ..."? मी छद्मीपणे हसत विचारले.
"गप बसा हो...आपल्या माणसाला कोण पैसे देते का ...सौ त्याच्या हातातील पिशवी जवळजवळ हिसकावून घेत म्हणाली आणि संतोषचा विचार बदलायच्या आत ती आत पळाली.
"काय भाऊ ...कामाला जातोस की नाही …."त्याने माझ्या पाठीवर थाप मारून विचारले .
"तुझ्यासारख्या मित्राकडून त्या भयानक कथा ऐकण्यापेक्षा ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या खाल्लेल्या परवडल्या..." मी तिरकसपणे म्हणालो.
माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता  त्याने खिश्यातून स्मार्टफोन काढला आणि त्यातून एक फोल्डर ओपन करून त्यातील कथा मला वाचायला दिली.
"आयला हे काय...?? दिघ्या चक्क हायटेक झालाय.मोबाईलवर लिहितो.म्हणून त्याची ती सुप्रसिद्ध शबनम बॅग मला दिसली नव्हती.
" म्हणजे तू हल्ली कागद पेन वापरणे सोडून दिलेस तर....!! असा अचानक कोणता साक्षात्कार झाला तुला..?? मी कुतूहलाने विचारले .
ह्या माणसाने कथा लेखनाच्या नावाखाली किती कागद वाया घालवले असतील त्याची कल्पना फक्त मला आणि विक्रमला होती. त्या कागदाचा अर्धा फायनान्सर तर विक्रमच होता.
"मी हल्ली कागद वापरणे सोडून दिले भाऊ.."संतोष गंभीरपणे म्हणाला .
"फक्त कागद ...?? कथा नाही .."?? मी चिडून विचारले.पण त्याचा चेहरा पाहून गप बसलो.
"तुला माहितीय आपण आतापर्यंत किती रिम कागद वापरले असतील .…?? त्याने प्रश्न केला . 
"मी तुझ्यापेक्षा नक्कीच कमी वापरले आहेत..." मी मान उंचावून सांगितले .
" मान्य.. तुला माहितीय भाऊ एक झाड आपल्याला सतरा रिम कागद देते आणि एका रिममध्ये साधारण पाचशे कागद असतात...विचार कर भाऊ आपण आतापर्यंत किती झाडांची हत्या केलीय...." दिघे गंभीर होऊन म्हणाला .
"च्यायला ...मी हा विचारच केला नव्हता. दिघ्याला नक्कीच कोणतरी गुरू भेटलाय.
"काय झाले संतोष .."?? मी गंभीरपणे विचारले .
"काही महिन्यांपूर्वी ट्रेनमध्ये एक गृहस्थ भेटले . कणकवलीत एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहेत ते . माणूस हुशार .माझे पेपरवर चाललेले चाळे पाहून अस्वस्थ होत होते. शेवटी ते चिडलेच आणि हेच प्रश्न मला विचारले. माझे ही तुझ्यासारखेच झाले.मग त्याने ही थियरी सांगितली आणि मी गप्पच झालो. आपल्याला मिळणाऱ्या शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती ही झाडांकडून होते.आपल्याला ऑक्सिजनची किती गरज आहे ते करोनाने दाखवुनच दिलेय. मी आजारी असताना तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरसाठी किती धावपळ केलीत ते वहिनीने सांगितलंय मला.एका माणसाला रोज 550 लिटर ऑक्सिजन लागतो .एक पूर्ण वाढ झालेले झाड दोनजणांना आयुष्यभर पुरेल इतका ऑक्सिजन देते .पण ते झाड कोणी लावलेले असते .…?? आपण किती झाडे लावतो...? आपण झाडे लावत नाही मग आपल्या पुढच्या पिढीला कोण ऑक्सिजन देईल...?? मी त्यांचे बोलणे ऐकून हादरलो. खरेच किती विचार न करता वागतो आपण . असे कागद वापरून किती झाडांची हत्या केली असेंन मी ..किती लोकांचा श्वास हिरावून घेतला असेल . मी त्यांची माफी मागितली  आणि झाडे लावून ती जगविण्यासाठी काही उपाय आहे का ते विचारले .."
"मग .."?? आता माझीही उत्सुकता वाढली 
" त्यांनी सांगितले तू फक्त माझ्या जमिनीत एक झाड लाव.आणि वर्षाला एक ठराविक रक्कम दे .ते झाड मी जगविन . त्या झाडाला तुझे नाव देईन संतोष दिघेचा श्वास . तू कधीही ये त्या झाडाखाली बस सेल्फी काढ त्या झाडाला जितकी फळे /फुले लागतील  ती सर्व तुझी. तू सर्व घेऊन जा .मला फक्त ते झाड जगविण्यासाठी नाममात्र पैसे देत जा .त्या झाडावर तुझी आणि तुझ्या कुटुंबाची मालकी असेल . फक्त दोन झाडे लाव आणि आपल्या कुटुंबाचा श्वास निश्चित कर ...भाऊ मला ती कल्पना आवडली. अरे त्यांनी जी रक्कम सांगितली ती त्या कार्याच्या बदल्यात काहीच नव्हती.मग मी चिकुचे झाड लावले .आज पहिल्यांदा त्या झाडाला फळे लागली.ते घेऊनच मी पहिला तुझ्याकडे आलो.आणि हो मी हल्ली मोबाईलवरच टाईप करतो त्यामुळे कागद वाचतात  आणि माझ्या झाडांमुळे कमीतकमी दोन जणांना ऑक्सिजन मिळतोय याची जाणीव ही सतत होत असते..….हळवा होत दिघे म्हणाला.
"वा संतोष ....आज तू मलाही नवीन दृष्टी दिलीस.चल मी ही तुझ्या मित्राकडे जाऊन माझ्या आवडीचे एक झाड लावतो .पर्यावरणाची चर्चा करण्यापेक्षा पर्यवरणात वाढ कशी होईल याकडे लक्ष देऊ ..".मी संतोष दिघेला सलाम करीत म्हणालो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment