Thursday, September 23, 2021

पगारी मित्र "ह्या म्हाताऱ्याचे काय करावे तेच कळत नाही....." बाजूच्या खुर्चीवर धपकन बसत अव्या पुटपुटला. मी आणि विक्रमने चमकून त्याच्याकडे पाहिले. आम्ही बऱ्याच दिवसांनी अण्णाकडे बसलो होतो. "काय झाले अव्या...."?? बशीतले शेवटचे बिस्कीट त्याच्याकडे सरकवून विक्रमने विचारले .अर्थात म्हातारा म्हणजे अविचा बाबा हे सांगायची गरज नव्हती."भाऊ ...हल्ली बाबांची खूप चिडचिड चालू आहे . काय करावे कळत नाही.. सारखे समोर कोणतरी हवे असते. माझे ऐकत नाही कोणी हीच तक्रार ..."अवि चिडून म्हणाला ." म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात फेक..." विक्रम चहाचा घोट घेत म्हणाला ." गप रे...तुला माहितीय मी असे करणार नाही .... वृद्धाश्रमाची कल्पनाच आम्ही करू शकत नाही .पण तुम्हीच सांगा ..सकाळी आठला आम्ही घरातून बाहेर पडतो.ते रात्री सातनंतर घरी .आई होती तोपर्यंत चालत होते .आता घरात ते एकटे ..."अवि भावुक झाला ." माणूस ठेव ..." विक्रमकडे सल्ल्याची कमी नव्हती." माणूस काय करणार....?? तो पगारी नोकर ..जेवण औषधे वेळच्यावेळी देईल. पण ह्यांच्याशी गप्पा कोण मारेल...?? तुम्हाला माहितीय बाबांना राजकारणात किती इंटरेस्ट आहे .सगळ्या पक्षांच्या चार चुका काढल्याशिवाय जेवत नाही .आणि हो त्यांचे ते हार्मोनियम वादन कोण ऐकेल.तो माणूस पळून जाईल .." अवि माझ्या हातावर टाळी देत हसत म्हणाला."करू काहीतरी..." असे म्हणत विक्रम उठला तसे आम्हीही उठून बाहेर पडलो.त्यानंतरच्या रविवारी अव्याच्या घरची बेल वाजली .दारात आम्हाला पाहून अव्या उडाला .आमच्यासोबत एक तरुण होता. विक्रमने त्याची ओळख मुलाचा मित्र अशी करून दिली. बाबा खुर्चीत बसून पेपर वाचत होते." एक खाजगी काम आहे .."असे म्हणत आम्ही अव्याला गॅलरीत घेऊन आलो आणि तो तरुण बाबांशी गप्पा मारत बसला.अव्या आणि त्याची बायको अधूनमधून बाबांकडे नजर टाकत होते .पण कसे काय..कोण जाणे म्हातारा खूप खूष होऊन त्या तरुणाशी बोलत होता .मग आम्हीही निश्चित होऊन गप्पा मारत बसलो. दोन तासानी आम्ही उठलो जाता जाता बाबांनी त्या तरुणांच्या पाठीवर थाप मारून "उद्या ये..मी हार्मोनियम ऐकवतो तुला.." असे प्रेमाने आमंत्रण दिले तश्या अव्याच्या कपाळावर आठ्या पडल्या."कशाला त्याला त्रास ..."?? असे तो पुटपुटला. तसा तो तरुण म्हणाला " काही हरकत नाही ...फोन करा ..येईन मी .…"असे हसून म्हणताच अव्या उडालाच ."ही काय भानगड आहे विकी .."?? खाली येताच अव्याने कमरेवर हात ठेवून विचारले."दोनशे दे त्याला ..." तरुणांकडे बोट दाखवत विक्रम म्हणाला." म्हणजे ....."?? अव्या चिडलाच." तूच म्हणालास ना म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात ठेवणार नाही . मग वृद्धाश्रम तुझ्या घरी आले तर ...?? हा तरुण निखिल ..तुझ्या बाबांसोबत राहील . त्यांना पाहिजे तेव्हा तो हजर होईल. त्यांच्याशी पाहिजे त्या विषयावर गप्पा मारेल. त्यांचे सर्व काम करेल. त्यांना औषधांची आठवण करून देईल शक्य झाल्यास देईलसुद्धा . त्यांचे हार्मोनियम ऐकेल. पत्ते खेळेल .अगदी आतल्या गोष्टींवरही चर्चा करेल. त्यांना कंटाळा येईल तेव्हा निघून जाईल. पण संध्याकाळी तो जो चार्ज लावेल तो तुला द्यावा लागेल ...विक्रम अविकडे रोखून पाहत म्हणाला ." च्यायला विकी ...म्हातारा किती खडूस आहे ते तुला सांगायला नको...अरे चिडला तर शिव्या ही देईल त्याला .."अवि काळजीने म्हणाला ."खाईल तो शिव्या ... तो त्याचेच तर पैसे घेणार आहे .तो सगळे काही सहन करेल. आपण नाही का आपल्या साहेबांच्या शिव्या ऐकतो...तू फक्त त्याला वेळोवेळी पैसे देत जा ...जे वृद्धाश्रमात खर्च करणार ते याला दे ..." मी समजावले ."ठीक आहे ...पण हा उचललास कुठून ...?? अविने हसत विचारले . तसे मी आणि विक्रम एकमेकांकडे पाहून हसलो .काल संध्याकाळीच आम्ही कमलाकर अकॅडमीच्या कमलाकर कदम उर्फ केकेला जाऊन भेटलो होतो आणि आमची समस्या त्याच्यासमोर मांडली होती.नेहमी सारखे छद्मी हसत त्याने एक फोन फिरवला होता आणि त्या तरुणाला आमच्याकडे पाठवून दिले होते.त्याआधी त्याने अवीच्या बाबांची सगळी माहिती त्याला दिली होती . केके सहज म्हणाला बाबांना वृद्धाश्रमात जायचे नसेल तर आपणच वृद्धाश्रम घरी आणू.© श्री.किरण कृष्णा बोरकर

पगारी मित्र 
"ह्या म्हाताऱ्याचे काय करावे तेच कळत नाही....." बाजूच्या खुर्चीवर धपकन बसत अव्या पुटपुटला. मी आणि विक्रमने चमकून त्याच्याकडे पाहिले. 
आम्ही बऱ्याच दिवसांनी अण्णाकडे बसलो होतो. 
"काय झाले अव्या...."?? बशीतले शेवटचे बिस्कीट  त्याच्याकडे सरकवून विक्रमने विचारले .अर्थात म्हातारा म्हणजे अविचा बाबा हे सांगायची गरज नव्हती.
"भाऊ ...हल्ली बाबांची खूप चिडचिड चालू आहे . काय करावे कळत नाही.. सारखे समोर कोणतरी हवे असते. माझे ऐकत नाही कोणी हीच तक्रार ..."अवि चिडून म्हणाला .
" म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात फेक..." विक्रम चहाचा घोट घेत म्हणाला .
" गप रे...तुला माहितीय मी असे करणार नाही .... वृद्धाश्रमाची कल्पनाच आम्ही करू शकत नाही .पण तुम्हीच सांगा ..सकाळी आठला आम्ही घरातून बाहेर पडतो.ते रात्री सातनंतर घरी .आई होती तोपर्यंत चालत होते .आता घरात ते एकटे ..."अवि भावुक झाला .
" माणूस ठेव ..." विक्रमकडे सल्ल्याची कमी नव्हती.
" माणूस काय करणार....?? तो पगारी नोकर ..जेवण औषधे वेळच्यावेळी देईल. पण ह्यांच्याशी गप्पा कोण मारेल...?? तुम्हाला माहितीय बाबांना राजकारणात किती इंटरेस्ट आहे .सगळ्या पक्षांच्या चार चुका काढल्याशिवाय जेवत नाही .आणि हो त्यांचे ते हार्मोनियम वादन कोण ऐकेल.तो माणूस पळून जाईल .." अवि माझ्या हातावर टाळी देत हसत म्हणाला.
"करू काहीतरी..." असे म्हणत विक्रम उठला तसे आम्हीही उठून बाहेर पडलो.
त्यानंतरच्या रविवारी अव्याच्या घरची बेल वाजली .दारात आम्हाला पाहून अव्या उडाला .आमच्यासोबत एक तरुण होता. विक्रमने त्याची ओळख मुलाचा मित्र अशी करून दिली. बाबा खुर्चीत बसून पेपर वाचत होते.
" एक खाजगी काम आहे .."असे म्हणत आम्ही अव्याला गॅलरीत घेऊन आलो आणि तो तरुण बाबांशी गप्पा मारत बसला.
अव्या आणि त्याची बायको अधूनमधून बाबांकडे नजर टाकत होते .पण कसे काय..कोण जाणे म्हातारा खूप खूष होऊन त्या तरुणाशी बोलत होता .
मग आम्हीही निश्चित होऊन गप्पा मारत बसलो. दोन तासानी आम्ही उठलो जाता जाता बाबांनी त्या तरुणांच्या पाठीवर थाप मारून "उद्या ये..मी हार्मोनियम ऐकवतो तुला.." असे प्रेमाने आमंत्रण दिले तश्या अव्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"कशाला त्याला त्रास ..."?? असे तो पुटपुटला. तसा तो तरुण म्हणाला " काही हरकत नाही ...फोन करा ..येईन मी .…"असे हसून म्हणताच अव्या उडालाच .
"ही काय भानगड आहे विकी .."?? खाली येताच अव्याने कमरेवर हात ठेवून विचारले.
"दोनशे दे त्याला ..." तरुणांकडे बोट दाखवत विक्रम म्हणाला.
" म्हणजे ....."?? अव्या चिडलाच.
" तूच म्हणालास ना म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात ठेवणार नाही . मग वृद्धाश्रम तुझ्या घरी आले तर ...?? हा तरुण निखिल ..तुझ्या बाबांसोबत राहील . त्यांना पाहिजे तेव्हा तो हजर होईल. त्यांच्याशी पाहिजे त्या विषयावर गप्पा मारेल. त्यांचे सर्व काम करेल. त्यांना औषधांची आठवण करून देईल शक्य झाल्यास देईलसुद्धा . त्यांचे हार्मोनियम ऐकेल. पत्ते खेळेल .अगदी आतल्या गोष्टींवरही चर्चा करेल. त्यांना कंटाळा येईल तेव्हा निघून जाईल. पण संध्याकाळी तो जो चार्ज लावेल तो तुला द्यावा लागेल ...विक्रम अविकडे रोखून पाहत म्हणाला .
" च्यायला विकी ...म्हातारा किती खडूस आहे ते तुला सांगायला नको...अरे चिडला तर शिव्या ही देईल त्याला .."अवि काळजीने म्हणाला .
"खाईल तो शिव्या ... तो त्याचेच तर पैसे घेणार आहे .तो सगळे काही सहन करेल. आपण नाही का आपल्या साहेबांच्या शिव्या ऐकतो...तू फक्त त्याला वेळोवेळी पैसे देत जा ...जे वृद्धाश्रमात खर्च करणार ते याला दे ..." मी समजावले .
"ठीक आहे ...पण हा उचललास कुठून ...?? अविने हसत विचारले . तसे मी आणि विक्रम एकमेकांकडे पाहून हसलो .
काल संध्याकाळीच आम्ही कमलाकर अकॅडमीच्या कमलाकर कदम उर्फ केकेला जाऊन भेटलो होतो आणि आमची समस्या त्याच्यासमोर मांडली होती.नेहमी सारखे छद्मी हसत त्याने एक फोन फिरवला होता आणि त्या तरुणाला आमच्याकडे पाठवून दिले होते.त्याआधी त्याने अवीच्या बाबांची सगळी माहिती त्याला दिली होती . केके सहज म्हणाला बाबांना वृद्धाश्रमात जायचे नसेल तर आपणच वृद्धाश्रम  घरी आणू.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment