Sunday, September 5, 2021

शिक्षकदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

शिक्षकदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
इथे मी सर्वाना शुभेच्छा देतोय याचे कारण माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या व्यक्तींना मी शिक्षकच समजतो. मग ते लहान असो वा मोठे. ऑनलाईन भेटणारे असो की ऑफलाईन असोत. 
प्रत्येक व्यक्तीने मला नेहमीच काहीतरी शिकवले आहे . खरेतर शाळेतील शिक्षकांविषयी माझ्या मनात कधीच फारसा आदर नव्हता . कदाचित मी साधारण बुद्धीचा , शिक्षणात ,वक्तृत्वात फारशी चमक न दाखवणारा असेन.म्हणूनच शाळेतील शिक्षकांच्या मी फारसा स्मरणात राहिलो नाही.आजही कोण समोर आले तर ओळखणार नाही हे निश्चित. अर्थात ती त्यांची चूक नाही म्हणा पण त्यामुळे कोणाच्या लक्षात राहायचे असेल तर कशात तरी चमक दाखविणे गरजेचे आहे हे शिकलो. 
पण शाळेच्या मित्रांकडून बरेच काही शिकलो . चेहऱ्यावरची एकही रेषा न हलवता निर्विकारपणे समोरच्याची टेर खेचणे. त्याने दिलेल्या शिव्या सहजपणे झेलणे . त्यावर हसणे . जर आपण एखाद्याला टार्गेट करत असलो तरी आपणही कोणाचे टार्गेट होऊ शकतो याचे भान ठेवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोस्ती निभावणे हे शिकलो.
 पुढे कॉलेज जीवनात अनेक चांगले शिक्षक लाभले . त्या सर्वांनी आम्हास खूप मदत केली . काहीजण अजूनही व्यक्तीशः ओळखतात .त्या शिक्षकांनी आम्हा मित्रात एकजूट आणली. एकमेकांवर विश्वास ठेवणे शिकवले . एकमेकांना समजून घेणे शिकवले . त्यामुळेच अजूनही आम्ही सर्व मित्र एकत्र आहोत .कॉलेजमधील आमच्या मित्रांनी आम्हाला व्यसने शिकवली पण त्या व्यसनांपासून दूर कसे राहावे हे ही शिकवले .ते ही शिक्षकच असणार.चांगले शिक्षणच आपल्याला चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक बनवते हे आम्ही कॉलेजमधून शिकलो .
त्यानंतर व्यावहारिक विश्वात आम्ही पाऊल  ठेवले . तिथे आमचे सिनियर आमचे शिक्षकच होते. त्यातील काहींनी आम्हाला टाईमपास कसा करावा . पाट्या कश्या टाकाव्या ,आपले काम दुसऱ्यांवर कसे ढकलावे ते शिकवले तर काहींनी प्रामाणिकपणे काम कसे करावे. आपली जबाबदारी कशी पार पाडावी. वरिष्ठांचा आदर करावा ज्युनियर्सना कसे ट्रेनिंग द्यावे हे शिकवले. 
पण मुळात चांगली व्यक्ती घडविण्यासाठी संस्कार महत्वाचे असते आणि हे लहानपणापासूनच  मुलांवर बिंबवले पाहिजे आणि तेच कार्य शाळेतील शिक्षकांकडून घडते . यासाठीच शाळा असतात आणि शाळेत जाणे गरजेचे असते. आजही ग्रामीण भागात शाळेचे महत्व शहरांपेक्षा कमीच आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागातून फारच कमी मुले यशाच्या शिखरावर पोचतात .
आणि यावर अभ्यास आणि विचार विनियम करूनच स्टार्ट गिविंग फौंडेशनची स्थापना झाली . शहरातील अत्याधुनिक सोई ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाल्या तर त्यांना शाळेत येण्यात उत्साह वाटेल ही मूळ संकल्पना घेऊन आम्ही मित्रांनी या क्षेत्रात पाऊल टाकले. एकमेकांना विचारून दुसऱ्यांच्या सूचनेचा आदर करून कोणाला न दुखावता आपल्या योजना यशस्वी होतील यावर आम्ही भर दिला . लाल फितीचा कारभार वगळून लवकरात लवकर कशी मदत गरजू कडे कशी पोचेल यावर भर दिला .आम्हाला वाटत नव्हते की यात फार काळ टिकून राहू पण विश्वास ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला आत्मविश्वास देते. त्याच विश्वासावर आज आठ वर्षे स्टार्ट गिविंग फौंडेशन डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात काम करतेय . गेल्या आठ वर्षात साधारण  25च्यावर शाळा आम्ही डिजिटल केल्या . त्याशिवाय पाणी फौंडेशन ,अनाथाश्रमात मेडिकल कॅम्प ,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, नाम फौंडेशन सारख्या संस्थेला मदत यासारखी छोटी मोठी कार्य केलीत. होय आमच्यासाठी ही कार्य छोटीच आहेत. कारण शैक्षणिक क्षेत्रात कराल तितके कमीच आहेत . पण आज काही केले नसते तर जे काही केले ते झालेच नसते .शून्य मिळविण्यापेक्षा एक मिळवा बडबड नको कृती करा हेच आमचे ध्येय .आम्हाला माहीत नाही यामुळे कोणाचा किती फायदा होईल पण सुरवात तरी केली हे महत्वाचे आहे.पण हे सर्व कशामुळे झाले ....?? आम्हाला का सुचले ...?? का आम्ही आमच्या खिशातील पैसे काढून या कार्यास देतो ...?? कारण आमच्यावर तसे संस्कार करणारेच आमचे गुरू आमचे शिक्षक आहेत मग ते आमचे  आमचे आईवडील असो ,मित्र असो .आमच्या आयुष्यात आलेला आणि पाठिंबा देणारा हा आमचा शिक्षक आहे .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment