Tuesday, August 30, 2022

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया
1
सुपरस्टार विनयकुमार उर्फ विनायक सुर्वे उर्फ विन्या आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शांतपणे बसून होता.त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.गेली दोन वर्षे करोनामुळे गावी गणपतीला गेला नव्हता. यावर्षी नक्की जायचे हे ठरविले होते.
 पण अचानक साऊथच्या बिग बजेट फिल्मसाठी त्याला बोलाविण्यात आले होते.तसेही करोनामध्ये दोन वर्षे त्याच्याकडे फारसे काम नव्हते. त्याचे स्टेटस पाहून छोटे निर्मातेही त्याला काम देत नव्हते.
 त्याचवेळी साऊथच्या निर्मात्याने त्याला भरपूर मानधन देऊन हा चित्रपट ऑफर केला होता. त्याच्यासोबत साउथचा सुपरस्टार  मेन रोलमध्ये होता. चित्रपट तुफान चालणार याविषयी शंकाच नव्हती. गणपतीच्या दिवसातच शुटिंगचे शेड्युल होते.अश्यावेळी शूटिंग अर्धवट सोडून गणपतीला जाणे परवडणार नव्हते.त्याने मनोमन बाप्पाची माफी मागितली .
इतक्यात दार उघडून त्याचा निर्माता आत आला.
    " विनयजी अपने हिरोने कहा है एक गाना गणपती के सामने हो जाय. आप मराठी है और गणपती के सामने गाना रहेगा तो महाराष्ट्र के लोगभी सिनेमा देखने आएंगे. अगर आपके पास कोई लोकेशन होगा तो बताइये,  वही शूट करेंगे." ते ऐकून विनयकुमार खुश झाला . आपल्या गावाजवळचे लोकेशन फिक्स करण्यासाठी त्याने सेक्रेटरीला फोन केला आणि डायरेक्ट घरी जाऊनच सुदाम दादाला चकित करायचे ठरविले.गणपती बाप्पा मोरया म्हणत त्याने हात जोडले.
2
केरळच्या त्या कार्पोरेट ऑफिसमधील मिटिंग आज भलतीच वादळी ठरली होती. एका मोठ्या कंपनीशी होणारे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले होते.अपयशाचे सर्व खापर  श्री.नामदेव सुर्वे उर्फ नाम्यावर फोडण्यात आले होते. नामदेव खूप चिडला होता.यावर्षी कोणत्याही परिस्थितीत गणपतीला गावी जायचे ठरविले होते. तिकीट्स ही बुक झाल्या होत्या . 
दोन वर्षांनी त्याला  सर्व  भाऊ आणि कुटुंब भेटणार होते.करोनामुळे दोन वर्षे अशीच गेली होती.त्याला गावी जाता आले नव्हते उलट नोकरीतही  त्रास झाला होता.एक मोठे डिल कॅन्सल झाले आणि त्याचे खापर नामदेववर फुटले होते. कोर्टकचेऱ्या होणार हे नक्की.
 आता फक्त नोटीस कधी येणार याची वाट पहायची होती.केरळ कोर्टाने त्याला राज्यातून बाहेर जाण्यास मनाई केली होती. नाईलाजाने  तिकीट रद्द करण्यासाठी फोन करणार इतक्यात त्याचा सेक्रेटरी धावत केबिनमध्ये शिरला . त्याने हातातील पाकीट नामदेवला दिले. त्या कंपनीने वेगवेगळ्या राज्यात असणारे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते आणि खटले त्यात्या राज्यात न चालविता मुंबईत चालविण्याचे ठरविले होते.त्यासाठी त्याने मुंबईत यावे अशी सूचना केली होती.
ते वाचून नामदेव खुश झाला . खटल्याच्या निमित्ताने का होईना मुंबईत तर जायला  मिळेल.तिथून गावी काय कसे ही जाऊ .गणपती बाप्पा मोरया असे मनात म्हणत त्याने हात जोडले .
3
शंकर सुर्वेचे लिव्हकार्ड अजूनही माझ्या टेबलवर आले नाही हे पाहून मला थोडे आश्चर्यच वाटले.दरवर्षी गणपतीला हक्काने गावी जाणारा शंकर यावेळी रजेसाठी अजूनही समोर आला नव्हता. 
मी त्याला केबिनमध्ये बोलाविले तेव्हा तो नाखुषीनेच आत शिरला. "काय मिस्त्री ? अजून रजेचा अर्ज आला नाही तुमचा .गणपतीला जाणार आहे की नाही ?"
 तो केविलवाणे हसला ." करोनामध्ये फॅक्टरी बंद होती.म्हणून बायको पोरांना घेऊन गावी राहिलो .पण तिथेही हालच झाले . दादाची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे .स्वतःचे कसे तरी भागते त्यात आमची भर.पण एकमेकांच्या मदतीने आम्ही सावरले. .फॅक्टरी चालू झाली पण घेतलेली कर्जे अजूनही फेडतोय.त्यात हल्ली पगार ही वेळेवर होत नाही .जायची तर खूप इच्छा आहे .पण सगळी सोंग करता येतात पैश्याची नाही . जायला यायला ही खूप पैसे लागतात .दादाला सांगितले आहे यावर्षी जमणार नाही यायला." असे बोलून तो निघाला .
मी ही कोकणाचाच असल्यामुळे शंकरशी चांगले संबंध होते.त्याची घरची परिस्थितीही माहीत होती.यावेळी शंकर गावी जाणार नाही हे ऐकून वाईट वाटले . 
माझे तर गावी जाणे नक्की झाले होते .खाजगी गाडीचे तिकीट्सही काढले होते.आज रात्रीच निघणार होतो. तितक्यात मोठ्या भावाची सून बाळंत झाल्याची बातमी आली .झाले !  आता सुयेरात गणपतीजवळ कोण जाईल.? शिवाय सुनबाई आणि नातवाची काळजी घ्यायला हवी .आमचे जाणे कॅन्सल झाले . 
मी शंकरला फोन केला.माझ्या तिकीट्स आहे जाणार का ? असे विचारले.
पैश्याचे काय ? त्याचा प्रश्न .
तो किती मानी आहे हे माहीत होते मला .म्हटले दे सावकाश आधी सण तर पार पडू दे. तो घरी आला तोच पेढे घेऊन .भरल्या डोळ्याने त्याने हात जोडले मी त्याच्या हातात परतीची तिकीट्स ही दिले.गणपती बाप्पा मोरया .म्हणत त्याने हात जोडले.
4
कॅनडातील आपल्या ऑफिसमध्ये अरविंद सुर्वे उर्फ अव्या फोनवरून आपल्या सहकार्याला झापत होता.
करोनानंतर आता कुठे त्याचा बिझनेस सावरत होता.गेली दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये बसून काढली होती. विमान प्रवास कठीण झाल्यामुळे कोकणात गावी ही जाऊ शकला नव्हता.
 यावर्षी सगळे सुरळीत चालू झाले होते. गावी जाणार हे पक्के ठरविले होते पण अचानक जेनीच्या वडिलांची म्हणजे त्याच्या सासऱ्यांची तब्बेत बिघडली .एक तातडीची सर्जरी करावी लागणार होती. बहुतेक त्याचे जाणे कॅन्सल होणार हे जवळजवळ निश्चित होते.
आज त्याला पुन्हा डॉक्टरांकडे जायचे होते.सुदाम दादाला फोन करून यावर्षी जमणार नाही असे सांगायचे नक्की करून तो डॉक्टरांच्या क्लीनिकमध्ये शिरला. 
अरे देवा ! जे डॉक्टर सर्जरी  करणार होते ते सुट्टीसाठी भारतात गेले होते आणि आता गणपती विसर्जनानंतरच येणार होते.
भारताचे नाव ऐकताच अव्याचे डोळे चमकले.त्याने भारतात कुठे गेलेत याची चौकशी केली तर ते योगायोगाने मुंबईतच राहणार होते.
अरविंदने ताबडतोब त्यांना कॉन्टॅक्ट केला.आपण भारतीय आणि त्यातही मुंबईकर असल्याची ओळख करून दिली. डॉक्टर ही खुश झाले. त्यांनी मुंबईतच सर्जरी करायची तयारी दर्शवली . अव्याने खुश होऊन गणपती बाप्पा मोरया अशी आरोळी ठोकली. यावेळी कुटुंबासोबत त्याचे सासरेही कोकणात गणेशोत्सव  साजरा करणार होते.
5
 कोकणातील त्या छोट्या गावात सुदाम सुर्वेच्या घरी गणपती उत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. गेली दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला होता.सुदाम दादांच्या चार भावांपैकी एकही गावी आला नव्हता. पण यावेळी कोणतरी येईल याची खात्री वाटत होती.
 घरात डेकोरेशन चालू होती. त्याच्या हातात चहाचा पेला देत बायकोने विचारले " ह्या वर्षी तरी भाऊजी येतील ना ? सुदामाने हसत देव्हाऱ्यात बसलेल्या गणपतीकडे बोट दाखविले.
"तो हाय ना ? कित्याक काळजी करतस.बघात तो.त्याका काळजी हा सगळ्यांची. "असे म्हणून हसला.
देव्हाऱ्यात बसलेला तो आपली सोंड हलवत गालात हसत होता.
" हे बरे आहे बाप्पा .म्हणजे तुझी पूजा करायला तुलाच माणसे बोलवावी लागतात.सर्व तुझ्यावर सोपवून मोकळे होतात हे भक्त. " शेजारचा उंदीर शेपटी हलवत म्हणाला.
" खरे आहे मूषका अरे मलाच आहे भक्तांची काळजी.म्हणूनच सर्व सुर्वेंची इथे येण्याची सोय करून आलोय मी.भरल्या घरात सर्वांच्या हातून निस्वार्थी सेवा करून घेण्याचा आनंद वेगळाच असतो .उद्या बघ कसे एक एक करीत सर्व सुर्वे हजर होतील माझी सेवा करायला." सोंडेने पुढ्यातील मोदक उचलत त्याने उत्तर दिले.
गणपती बाप्पा मोरया
© श्री .किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment