Friday, August 26, 2022

नाते

नाते
संतोष दिघेला सौ.सोबत येताना पाहून मी उडालोच. ते नुसते एकत्रच येत नव्हते तर सौ.कडील दोन किलो पिठाची आणि भाजीची पिशवी दिघेच्या हातात होती.तर एखाद्या सापाला गुंडाळून घ्यावे तशी दिघेची शबनम बॅग सौ.च्या गळ्यात होती.
आता आमच्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल हा संतोष दिघे कोण आहे तो ? नाही ? मग खरोखरच तुम्ही चाणाक्ष आहात म्हणून दिघेला लक्षात ठेवले नाही. बरे सौ.तरी लक्षात असेलच . हुश्शह... 
तर हा संतोष दिघे आमचा बालमित्र. तो स्वतःला लेखक समजतो .नाही.. नाही ..त्याविषयी आमची तक्रार नाही हो. फक्त तो कथा सांगायच्या निमित्ताने घरात शिरतो आणि पोटभर खाऊन जातो याचे दुःख आहे. शिवाय तो आला की आमच्या किचनमध्ये जो गोंधळ चालतो तो वेगळाच.
तर हा दिघ्या आज सौ.सोबत हमाली करत घराच्या दिशेने येताना पाहूनच मी आज जेवण जास्त करावे लागणार हे समजून गेलो.पण सौ.च्या चेहऱ्यावर त्याची फिकीर दिसत नव्हती.
शिवाय ती ज्यातऱ्हेने त्याची शबनम बॅग हाताळत होती त्यावरून कळून चुकत होते की बॅग रिकामी आहे. नाहीतर त्या दिघ्याची काय बिशाद बॅग सौ.च्या हाती द्यायची . आहो दादर स्टेशनला रात्री पुलाखाली अजूनही पिवळ्या कव्हर्सची पुस्तके मिळतात याचा पुरावा याच्या बॅगेत  सापडतो.
दोघेही हसतच घरात शिरले.मला पाहताच दिघेच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरले.पण ते क्षणभंगुर ठरणार आहे याची मला खात्री होती.
" ये संतोष ये " मी सहजपणे म्हणालो .पाणी आण ग"
" ह्या, पाणी काय.. भावोजीना सरबत करून देते. बघा किती दमलेत ते.आणि तुम्ही महाबळेश्वरवरून आणलेले सरबत तसेच पडून आहे कित्येक दिवस.आता दोनचार दिवसात फेकूनच देणार होते.भावोजीना तेच देते" असे म्हणत किचनमध्ये गेली.
मी महाबळेश्वरला कधी गेलो होतो असा विचार करेपर्यंत ती सरबताचा ग्लास घेऊनसुद्धा आली. देवा ! दोन वर्षांपूर्वी गेट टू गेदरसाठी महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हाचे सरबत ही बाई अजून ठेवून होती.
"भाऊ.तू ही घे ..." इतक्या प्रेमाने स्वागत पाहून दिघे भारावून गेला.
"नको.त्यांच्यासाठी चहा गरम केलाय.उगाच असल्या सवयी नको." सौ माझ्याकडे पाहून ठसक्यात म्हणाली.
आज दिघ्याची कत्तल होणार हे निश्चित होतेच.सगळी सूत्रे सौ.च्या हाती देऊन मी फक्त प्रेक्षकांची भूमिका घेतली.
"भावोजी आलाच आहेत तर जेवूनच जा.." किचनमधून आज्ञा झाली.
आतामात्र हद्द झाली.मित्राचा इतका अपमान कोण सहन करेल ? मी उठलो ." दिघ्या, चल बाहेर जाऊन बोलू." एक मस्कापाव आणि चहावर भागेल हाच माझा प्रामाणिक हेतू होता .
"अरे वाहिनीनेच बोलावले आहे" 
हे ऐकताच माझा आवेश गळून पडला .
"आहो मीच घेऊन आले त्यांना घरी.मला पाहून वाट वाकडी करून पळत होते.पण मी सोडतेय होय. जाग्यावरूनच जोरात हाक मारून त्यांना बोलावले.आख्या बाजाराने वळून पाहिले माझ्याकडे .मग भाऊजी काय चीज आहे."सौ. हसत म्हणाली.
माझ्यासमोर  एका हातात पिठाची आणि दुसऱ्या हातात  भाजीची पिशवी घेऊन ओरडणारी सौ.उभी राहिली. याची जाहिरात होऊन आता  सौ.ला कोणीच टाळून जाऊ शकणार नाही याची खात्रीही पटली.
" पण तुला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायची का इच्छा झाली.? पडेल स्वरात माझा प्रश्न .
"आहो ,सणवार सुरू झालेत.प्रत्येक सिरीयलमध्ये सण साजरे होत असतात.वट पौर्णिमा झाली , दहीहंडी झाली,सध्या मंगळागौर चालू आहेत. पुढे गणपती येतील . भाऊजी बऱ्याच सिरीयल लिहितात ,त्यांच्या खूप ओळखी आहेत . कुठेतरी मलाही त्यात संधी देतील.म्हणून बोलावले   त्यांना. " सौ लाजत म्हणाली.
तिचे लाजणे पाहून मी ताबडतोब विरघळतो हे तिला माहीत आहे म्हणूनच ती मोजक्याच प्रसंगी लाजते.आताही तसेच झाले आणि तिचा दिघेला घरी घेऊन येण्याचा हेतू स्पष्ट झालं.
"अग त्यासाठी नाचता यायला हवे .थोडा अभिनय यायला हवा .असे कोणीही जाऊ शकत नाही " मी जरा आवाज चढवून म्हटले.
" मी नाचत नाही का? त्या दिवशी भाचीच्या हळदीत किती वेळ नाचत होते. ते ही पूर्ण शुद्धीत .तुमच्यासारखे हे घेऊन नाही ."अंगठा दाखवत ती ओरडली.
"अभिनयही करावा लागतो थोडा.".मी प्रयत्न चालूच ठेवले.
"आतापर्यंत किती अन्याय सहन केले मी, पण कधी चेहऱ्यावर येऊ दिले नाहीत. नेहमी हसतमुखाने सर्वांची सेवा केली.शेजाऱ्यांना विचारा ते म्हणतात तू आहेस म्हणून सहन करतेस हो .."ती रागाने चेहरा फुलवत म्हणाली.
"भाऊ , बघ तिचा अभिनय बघ ." किचनमधून येणाऱ्या खमंग वासाकडे डोळे मोठे करीत दिघे म्हणाला .
" दिघ्या हा तिचा अभिनय नक्कीच नाहिय " मी मनात म्हणालो.
" ठीक आहे ,पण संतोषलाही मर्यादा आहेत.." मी हळू आवाजात म्हणालो.
" कसल्या मर्यादा ..चार मराठी चॅनल ,प्रत्येक चॅनेलवर पाच मराठी मालिका  आणि प्रत्येक मालिकेत पंधराजणी तरी असतात नाचायला.त्यात मी एकटी कुठेही ऍडजस्ट होईन .तुम्ही हो म्हणा मी ताटे वाढते..."सौ.ने शेवटची निर्वाणीची धमकी दिली.तशी संतोषने मान डोलावली .
भरपेट जेवण झाल्यावर मी संतोषसोबत बाहेर पडलो.टपरीवरून त्याने सिगारेट शिलगावली..
" संतोष, तिचे बोलणे मनावर घेऊ नकोस .तुझ्याकडून काही होणार नाही हे माहितीय मला .पण येत जा रे अधूनमधून .बरे वाटते तुझ्याशी बोलून " मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो.
"भाऊ ,वहिनी मला बहीण म्हणून जास्त जवळची आहे रे. तिचे बोलणे कधीच मनावर घेत नाही मी. मला करोना झाला होता तेव्हा तिने सहा महिने मला जेवण दिले होते हे विसरणार नाही मी कधी .आताही तीच मला खेचत घरी घेऊन आली.म्हणाली आमच्या गल्लीतून जाता पण घरी येत नाही. बहिणीची आठवण येत नाही का ..?? भाग्यवान आहेस अशी बायको मिळाली तुला आणि आम्ही ही भाग्यवान अशी वहिनी आहे म्हणून." संतोष डोळे टिपत म्हणाला.
घरी आलो तेव्हा सौ.वाट बघत असल्याप्रमाणे पुढे आली.
"काय ग तू ? काय हे नवीन खूळ काढलेस सिरीयलचे ? त्या दिघ्याचे जेवणाचे वांधे आणि तू तुझ्याविषयी बोलतेस. " मी चिडून म्हटले.
" माहितीय मला.पण भाऊजी रस्त्यावरून जातात पण घरी येत नाहीत असे कळले म्हणून आज मुद्दाम त्याची वाट पाहत उभी राहिले आणि घरी घेऊन आले.आहो आपल्याशिवाय कोण आहे त्यांना.बरे वाटते त्यांनाही आपल्याशी बोलून आणि आपल्याला ही आनंद होतोच.म्हणूनच जेवल्याशिवाय कधीच जाऊ देत नाही त्यांना. यापुढे पंधरा दिवसातून एकदा तरी घरी फेरी मारायची आणि जेवल्याशिवाय जायचे नाही असाच दम दिलाय त्यांना .भले तुमचे मित्र असतील पण मलाही लहान भावासारखे आहेत ते."
"आणि ते सरबत दे फेकून किती दिवस वापरशील" मी ओरडलो.
आहो ,ते केव्हाच संपले.आता पुन्हा बाहेर गेल्याशिवाय नवीन बाटली घरात येणार नाही हे माहितीय मला.म्हणूनच त्या दिवशी नवीन बाटली आणून ठेवली.जरा घरातही लक्ष द्या काय हवे काय नको ते विचारत जा "असे म्हणून फणकार्याने आत निघून गेली.
मी  काही न बोलता  हात जोडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment