Friday, August 19, 2022

श्रीकृष्ण जन्म

श्रीकृष्ण जन्म 
"आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे .लक्षात आहे ना ? रात्री बारा वाजता पूजा करायची आहे त्यानंतर भजन ."सासूने बाहेरून आवाज दिला आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
रात्री एक वाजेपर्यंत ती ऑनलाइन काम करत होती.हल्ली आयटीवाले ही हुशार झालेत . सतत वॉच ठेवून असतात.काम संपायला दीड वाजला आणि नंतर नवऱ्याने बेडवर आपला हक्क गाजवलाच. ह्याचे बरे असते इच्छा झाली की काळवेळ बघणार नाही पण आमची इच्छा झाली की याना कामे असतात.
सकाळी सातला जाग आली.डोळे चोळत ती बेडरूममधून बाहेर आली तेव्हा सासूच्या कपाळावरच्या आठ्या अधिक स्पष्ट झाल्या. सासर्याने हातातील पेपर बाजूला करून फक्त घडाळ्याकडे पाहिले.ती किचनमध्ये चहा पीत असतानाच सासूबाईनी जन्माष्टमीची आठवण करून दिली .
"अरे देवा, म्हणजे आजही जागरण का ? कशाला हा श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्माला आला ? ती मनोमन चरफडली. 
म्हणजे आज साग्रसंगीत जागरण.पैठणी नेसा,दागिने घाला ,नथ घाला. मग नवऱ्याची कौतुकाची नजर पहा .सोसायटीतील इतर बायकांच्या मत्सरी तर पुरुषांच्या वासनेच्या नजरा सहन करा.त्यानंतर भजन ,गाणी ,रात्री बेडरूममध्ये पुन्हा जागरण .देवा का आलास तू रात्री जन्माला ? तिने मनात पुटपुटत हताश नजरेने श्रीकृष्णाच्या फोटोकडे पाहिले. फोटोत तो नेहमीसारखा बासरी वाजवत उभा होता. पण यावेळी अचानक तिला त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटलेले दिसले.फारसा विचार न करता तिने आवरायला घेतले.
ती एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होती.कंपनीचे बरेचसे काम परदेशी कंपन्यांसोबत असल्याने तिला दिवसरात्र मिटिंग कराव्या लागत.मोठ्या महत्वाकांक्षा असल्याने तिने सगळे लक्ष कामावरच केंद्रित केले होते.घरी सासुसासरे होते .थोडे जुन्या वळणाचे रीतीभाती,परंपरा, संस्कार  धरून वागणारे. कधी कधी छोट्या कुरबुरी व्हायच्या पण ती फारसे लक्ष देत नव्हती.घरी सणवार असले की हमखास छोटे वाद व्हायचे.
 ही फारशी धार्मिक नव्हती .जमेल तेव्हाच अश्या सण समारंभात भाग घ्यायची .पण रात्र म्हटली की अंगावर काटा यायचा .
शेवटी तिला जे वाटले होते तसेच झाले. मनासारखे झाल्यामुळे सासूबाई खुश होत्या .रात्री नवरा ही खुश. पहाटेचे तीन वाजले झोपायला. उद्याच्या  गोविंदाची सरकारने सुट्टी जाहीर केली होती.त्यामुळे नवऱ्याला उठायची घाई नव्हती पण हिला लोळत राहून कसे चालेल ? घरातली कर्ती गृहलक्ष्मी अशी वागली तर कसे चालेल ? तिला ऑफिस असल्यामुळे सकाळी सहाला उठून तयारी करावीच लागणार होती. रात्री झोपताना देवघरातील बाळकृष्णाकडे नजर टाकून ती झोपायला गेली.पण बाळकृष्ण  मिश्किलपणे हसतोय असे क्षणभर तिला वाटून गेले.
सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये शिरली तेव्हा थोडासा थकवा तिला जाणवत होता.आल्याआल्या बॉसने तिची  नवीन क्लायंटबरोबर मिटिंग फिक्स केली.
"अरे देवा ! आहेच का मिटिंग "? का रे बाबा ह्या श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला .सर्व श्येड्युलची वाट लावली याने.समोर तीन लाखाची हंडी आहे तीही पाहायला मुकणार मी ..असे मनात म्हणत तिने लॅपटॉप ऑन केला .
थोड्या वेळाने तिला मिटिंगची नोटिफिकेशन आली.ती क्लीक करताच कॅमेरा ऑन झाला आणि त्या क्लायंटचा चेहरा समोर आला .
तो चेहरा पाहताच ती स्तब्ध झाली. हा चेहरा तिला ओळखीचा वाटू लागला. तो दिसायला सुंदर होता. डोळ्यात एक मिस्कील हास्य होते पण चेहरा आश्वासक होता.हातात फिगेट स्पिनर घेऊन मधेमधे बोटावर फिरवत होता.ती तो कोणत्या देशाचा आहे ते विचारायलाच विसरली.
"सॉरी, आज तुमचा मोठा सण आहे. तरीही मिटिंग फिक्स करावी लागली".त्याने दिलगिरी व्यक्त करत मिटिंगला सुरवात केली. चेहऱ्याप्रमाणे त्याचा स्वरही मधुर होता.
महत्वाचे मुद्दे फायनल होताच त्याने तिची चौकशी करण्यास सुरुवात केली."आज मोठा सण आहे तुमच्या महाराष्ट्रात .बरेच लोक दहीहंडी फोडायला बाहेर पडतात असे ऐकून आहे मी "त्याने विचारले .
"हो आणि मोठमोठे थर लावायच्या उत्साहात हातपाय तोडून घेतात आणि जन्मभर अपंग बनून राहतात. बायकांना त्यांची आयुष्यभर सेवा करत राहावी लागते .खेळ त्यांचा शिक्षा स्त्रियांना. आदल्या दिवशी रात्रीपासूनच घरातील स्त्रीची धावपळ असते ती वेगळीच."ती पटकन रागात बोलून गेली.
"हो हो ..शांत व्हा "तो हसत म्हणाला .सण आहेत तर हे सर्व होणारच .भारतातील बहुसंख्य सणात स्त्रियांना मोठा सहभाग असतो .त्यांचा उत्साह प्रचंड असतो .शिवाय नटण्यामुरडण्याची हौस भागते. 
"सर ,अजूनही इथे स्त्री फक्त शोभेची बाहुली म्हणूनच ओळखली जाते.छान सुंदर दिसावी . नवऱ्याची सेवा करावी.घरच्यांची काळजी घ्यावी यासाठीच स्त्री हवीय.अजूनही स्त्रीकडे समानतेचा दर्जा नाही .मुलगी झाली की घरातील  कमीतकमी एका व्यक्तीचे नाक मुरडले जाते. आता तर काय तिने बाहेरही काम करून पैसे आणावेत आणि घरातली कामे ही करावी अशी अपेक्षा करतात.कालचेच बघा हे आमचे भगवान श्रीकृष्ण रात्री बारा वाजता जन्माला आले म्हणून त्याच वेळी त्यांची पूजा केली जाते शिवाय दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून त्याचा वाढदिवस साजरा केला जातो " ती चिडून म्हणाली तसा समोरचा चपापला.
"आहो, हल्ली बरेचजण रात्री बारा वाजता वाढदिवस साजरे करतात."तो हळुवारपणे म्हणाला.
"हो, पण ते सगळ्यांना वेठीस धरत नाहीत.केक कापतात झोपून जातात."ती अजून चिडली.
"नशिब काल रात्री माझी मिटिंग नव्हती.म्हटले लवकर झोपू तर या देवाचा रात्री बारा वाजता जन्म मग त्यासाठी जागरण. त्यानंतर इतर कामे.असे बोलून ती थांबली .रात्रीच्या आठवणीने तिचा चेहरा गुलाबी झाला.
"ओके ओके कळलं "तो हसून म्हणाला."म्हणजे आता तुमच्या सोयीनुसार सण साजरे करावे का ?"
"होय..काही गोष्टींमुळे आमच्या आयुष्यावर बरे वाईट परिणाम होत असतील तर त्याचा विचार  स्त्रियांनी नक्कीच केला पाहिजे. नाहीतर स्त्रियाना समानतेचा संदेश देऊ नका ."ती चिडून म्हणाली.
"तुमचे विचार फारच वादग्रस्त आहेत.पण बोलून छान वाटले.असे म्हणून तो हसला आणि कॅमेरा बंद केला.त्याचे ते हास्य पाहून ती चमकली.हे हास्य तिने काल पाहिले होते.
इथे लॅपटॉप बंद करून तो उठला.त्याने शेजारी बसलेल्या आपल्या मित्रांकडे पाहिले आणि म्हणाला "खरोखर बारा वाजता मी  जन्म घेऊन आताच्या पिढीला त्रास देतोय का "?
तो मित्र खुर्चीतून उठला आणि  आपल्या अधू पायाने लंगडत त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला "काळाबरोबर काही गोष्टी बदलायला हव्या हे खरे आहे.चल आपण लोणी खाऊ."
दोघेही काही न बोलता एकमेकांच्या गळ्यात हात टाकून ऑफिस मधून बाहेर पडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment