Monday, May 1, 2023

फोटोशूट

फोटोशूट
अवंती घरातून चिडचिड करीतच बाहेर पडली.अर्थात चुकी तिचीच होती.नेहमीप्रमाणे रात्री दोनपर्यंत जागायचे आणि सकाळी आरामात उठायचे हेच तिचे सूत्र.
पण आजची गोष्ट वेगळीच होती.आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता.सकाळी उठायला थोडा उशीर झाला .उठली तेव्हा घरातील इतर मेम्बरची तयारी चालू होती त्यात तिला ऍडजस्ट करणे थोडे त्रासदायक ठरले.शेवटी तयार होऊन ऑफिसला पोचली तेव्हा दहा मिनिटे उशीरच झाला. सिक्युरिटी गार्ड पासून सर्वच तिच्याकडे रोखून पाहत होते.अवंती एमबीए होती.शिवाय घरात मोठी त्यामुळे असल्या नजरांची सवय नव्हती.
आज केदारलाही थोडा उशीरच झाला.नेहमीप्रमाणे ट्रॅफिक त्याच्या साथीला होताच .पण तरीही त्याला उशीर होत नव्हता. ऑफिसमध्ये शिरताना त्याने समोर धावत आत शिरत असलेली ती तरुणी पाहिली आणि इतरांच्या नजरासुद्धा. 
"नवीन आहे वाटतं," स्वतःशी पुटपुटत त्याने कार्ड पंच केले. केदारला जॉईन होऊन तीन वर्षे झाली होती.हसतमुख स्वभावामुळे तो लोकप्रिय होता .शिवाय अविवाहित असल्यामुळे बरेचजण त्याच्यावर लक्ष ठेवून होते.काहीजण स्वतःची मुलगी, भाची, पुतणी, त्याच्या नकळत सुचवीत असायचे.
कॉफीब्रेक झाला आणि अवंतीला घेऊन एचआर मॅनेजर केदारच्या डेस्कजवळ येऊन उभे राहिले.
"केदार, ह्या मिस अवंती आजच जॉईन झाल्यात फायनान्सला "हसून केदारने हात मिळवला आणि स्वतःची ओळख करून दिली. 
"नशीब तुम्ही रोखून नाही पाहिले."अवंती हसत म्हणाली.तसा सकाळची आठवण होऊन केदार हसला.
"नाही हो ,पहिला दिवस आणि उशिरा आलात म्हणून सगळे रोखून पाहत होते." तशी अवंती हसली.
खरे तर केदारला अवंती पाहताच क्षणी आवडली होती. ऑफिसमध्ये तिचे वागणे आदबशीर होते.सगळ्यां ऍक्टिव्हिटीत पुढे असायची .केदारशीही ती संधी मिळेल तेव्हा बोलायची .एक दोनदा बाहेर कॉफीशॉपमध्येही ते भेटले होते. 
शेवटी केदारने तिला प्रपोज केले. नाकारण्यासारखे काहीच नव्हते त्याच्यात ,त्यामुळे तिने पटकन होकार दिला.
लवकरच दोघांच्या घरातून लग्नाची परवानगी मिळाली आणि लग्नाची तारीखही पक्की झाली. लग्न एकदाच होते त्यामुळे ते यादगार व्हायला हवे असे अवंतीचे म्हणणे.पैश्याचा प्रश्न नव्हता आणि अवंतीच्या प्रेमाखातर केदार तिच्या प्रत्येक गोष्टीला मान देत होता..
प्री वेडिंग फोटोशूट करायची अवंतीची इच्छाही त्याने मान्य केली . एक चांगला फोटोग्राफर  ठरविला गेला . पहिल्यावेळी घराच्या टेरेसवर गार्डनजवळ फोटो काढले .पण तरीही अवंती खुश नव्हती .तिला बाहेर जायचे होते.कुठल्यातरी रिसॉर्टवर ,नैसर्गिक वातावरणात ,ओढ्याजवळ वेगवेगळे ड्रेस घालून फोटोशूट करायचे होते.केदारला मान्य नव्हते पण हे एकदाच होणार म्हणून त्याने होकार दिला.दोघेही लोणावळ्याला एका रिसॉर्टवर पोचले. फोटोग्राफर आधीच पोचला होता .वेळ न दवडता त्यांनी फोटोशूटला सुरवात केली.
सकाळीसकाळी कानाजवळचा फोन वाजला आणि बंड्याची झोप उडाली.शिव्या देतच त्याने फोन उचलला तर पलीकडून केदार बोलत होता.
"च्यायला ,बायकोसोबत फोटो काढायचे सोडून मला का फोन करतोस तू "? चिडून बंड्या म्हणाला.
केदार काही काळ बंड्याच्याच ऑफिसमध्ये होता.त्यामुळे बंड्याची आणि त्याची खास मैत्री होती.
"अरे बंड्या, फोटोग्राफर पाहिजे. जो होता तो निघून गेला आणि बाईसाहेबांना अजून फोटो काढायचे आहेत.कोण असेल तर पाठव ताबडतोब .अड्रेस वॉट्स अप करतो."असे म्हणून फोन कट केला .
"अरे देवा, सुट्टीतही हे लोक झोपू देत नाही .आता ताबडतोब फोटोग्राफर कुठून आणू "?  मनात चरफडत तो उठला .
अश्यावेळी एकच व्यक्ती त्याच्या डोळ्यासमोर होती आणि ती म्हणजे केके उर्फ कमलाकर कदम .केकेकडे सगळ्याच अडचणींवर सोल्युशन होते. बंड्याने फोन करून केकेला प्रॉब्लेम सांगितला आणि हसून केकेने नो प्रॉब्लेम फोटोग्राफर दिलेल्या अड्रेसवर पोचेल अशी खात्री दिली .
"केके काम होईल ना" ? बंड्याने साशंक स्वरात विचारले .
"केकेकडे आलेले काम पूर्ण केले नाही असे आतापर्यंत घडलंय का ? भाऊचा माणूस आहे म्हणून चिडत नाही तुझ्यावर."केकेने एका शब्दात बंड्याची लायकी काढली .
दुसऱ्या दिवशी सकाळी केकेचा माणूस बंड्याच्या घरात येऊन पेनड्राईव्ह देऊन गेला.
सर्वप्रथम फोटो बघायचा मान त्या दोघांचाच असे मनात म्हणत बंड्याने तो पेनड्राईव्ह पॉकेटमध्ये ठेवला आणि विसरून गेला .दोन दिवसांनी त्याला केदारचा फोन आला ."बंड्या कामानिमित्त बाहेर आहे .भेटायला जमणार नाही तू तो पेनड्राईव्ह घरी नेऊन दे "
"अरे किती काम कराल ? लग्नाला तरी घरी राहा "असे हसतहसत बोलून बंड्याने फोन ठेवला.
दुपारी तो केदारच्या घराजवळ येताच एक विचित्र शांतता जाणवली .बिल्डिंगमध्ये कोण गेला वाटते .स्वतःशी पुटपुटत त्याने बेल दाबली तेव्हा केदारच्या बाबांनीच दरवाजा उघडला .त्यांच्या चेहऱ्यावर एक ताण स्पष्ट दिसत होता.
"बंड्या, केदार अजून आला नाही रे "त्यांनी काळजीने सांगितले.
"हो काही अर्जंट काम निघाले म्हणून बाहेर गेलाय ,हा पेनड्राईव्ह त्यानेच तुम्हाला द्यायला सांगितला आहे."असे म्हणून त्याने तो बाबांच्या हातात दिला.
"अरे नाही ,तो प्री वेडिंग शूट करायला गेलाय तो आलाच नाही अजून.अवंतीही घरी नाही आलीय अजून.."त्यांनी बंड्याला मोठा धक्काच दिला.
"नाही हो, आजच सकाळी फोन आला त्याचा .म्हणून तर हा पेनड्राईव्ह घेऊन आलो "असे म्हणत त्याने पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला आणि स्क्रिनवरील फोटो पाहून हादरून गेला .
लॅपटॉपच्या स्क्रिनवर केदार आणि अवंतीच्या निष्प्राण देहाचे वेगवेगळ्या अवस्थेतील छिन्नविच्छिन्न अवस्थेतील फोटो होते..
"हे कसे शक्य आहे "? बंड्या ओरडला .त्याने ताबडतोब केकेला फोन केला. 
"केके तो फोटोग्राफर कुठेय" ? 
"अरे तो ऑर्डरला गेलाय .काय झाले ? थांब मी त्याला कॉन्फरन्स कॉलवर घेतो "असे म्हणून त्याने कॉल केला.थोड्या वेळाने त्या फोटोग्राफरचा आवाज ऐकू आला .
"साहेब बोला" ?
"अरे काय हे ? कसे फोटो काढलेस तू ? असे फोटो काढतो का कोण" ? बंड्या चिडून म्हणाला.
"साहेब त्यांनी सांगितले तसेच फोटो काढले मी .काहीतरी वेगळेपणा हवा म्हणून अश्या पोज दिल्या त्यांनी "तो फोटोग्राफर सहज स्वरात म्हणाला. 
"म्हणून अश्या पोज "? बंड्याने पुन्हा आवाज चढविला .
"काय करू साहेब ? असे फोटो काढायची माझी खासीयतच आहे.मी अपघातात ,दगवलेल्या आणि खून झालेल्या व्यक्तींचे फोटो काढतो .मी त्यातच एक्सपर्ट आहे.पोलिसांसोबतच काम करतो मी" 
बंड्या ताबडतोब केदारच्या बाबांना घेऊन लोणावळा पोलिसस्टेशनमध्ये गेला .पोलसानी फोटोवरून जागा निश्चित केली आणि तिथे पोचले. त्या दरीत अवंती आणि केदारचे छिन्नविच्छिन्न मृतदेह पडले होते.
© श्री .किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment