Saturday, October 7, 2023

मिशन रानीगंज

मिशन रानीगंज
पश्चिम बंगाल येथील रानीगंज येथे कोळशाची खाण आहे. त्या खाणीत अडकलेल्या 65 कामगारांच्या सुटकेची ही सत्यघटना.
ही गोष्ट 1989 ची आहे. खाणीत काम करताना एका सुरूंगाच्या स्फोटात भुयारातील भिंतींना तडे जातात आणि नदीचे पाणी प्रचंड वेगाने आत घुसते.बहुसंख्य कामगार बाहेर पडतात पण साधारण 65 कामगार आत अडकतात .
यशवंतसिंह गिल हा तरुण इंजिनियर जो रेस्क्यू स्पेशालिस्ट आहे.तो त्या कामगारांच्या मदतीसाठी पुढे सरसावतो. खाणीच्या सर्वात उंच पॉईंटला कामगार जमा होतील आणि तिथे ड्रिल करून त्यांना कॅप्सूलद्वारे बाहेर काढू अशी त्याची योजना असते.
त्यासाठी आवश्यक असतो एक सर्व्हे सुपरवायझर आणि ड्रीलिंग इंजिनियर . खाणीचा हेड  उज्ज्वल त्याला सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवितो. बिंदल हा हुशार तरुण ड्रीलिंग इंजिनियर ताबडतोब आपली वाहने घेऊन येतो तर तपन घोष हा सर्व्हे इंजिनियर संपूर्ण सिस्टीमवर चिडलेला असतो .त्याची नोकरी गेलेली असते .सर्व पैसे अडकलेले असतात.जसवंतसिंह त्याच्या हातापाया पडून घेऊन येतो.
या रिस्क्यू मिशनमध्येही राजकारण सुरू आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्याना त्या खाण कामगारांना बाहेर काढायचे नाही .त्यासाठी ते प्रयत्न करत असतात .
पण यशवंतसिंह गिल आपल्या मतावर ठाम असतो .एक माणूस उभा राहील अशी कॅप्सूल बनवायची . ती ड्रिल केलेल्या होलमधून खाली सोडायची आणि एकेकाला वर घ्यायचे अशी गिलची योजना आहे .यात तो यशस्वी कसा होतो हे बघण्यासारखे आहे.
संपूर्ण चित्रपटात गिल आणि त्याची टीम खूप सकारात्मक आहे .अक्षयकुमार ने तरुण तडफदार यशवंतसिंह गिल नेहमीप्रमाणेच उभा केला आहे .सतत सिगारेट ओढत टेन्शनमध्ये असलेला उज्ज्वल कुमुद मिश्राने रंगविला आहे .सतत टेन्शनमध्ये असणारा कामगारांना आपले मानणारा आणि गिलवर प्रचंड विश्वास ठेवणारा उज्जवल मनाला भिडतो .कमी बोलणारा पण कामात वाघ असणारा प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला बिंदलच्या भूमिकेत पवन मल्होत्रा आहे .  शेवट माहीत असूनही आपल्याला श्वास रोखून पाहायला लावणारा मिशन रानीगंज आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे .

No comments:

Post a Comment