Thursday, October 19, 2023

THIRUCHITRAMBALAM

THIRUCHITRAMBALAM
थिरुचित्रामबालम
थिरुचित्रामबालम उर्फ डरपोक डोनिकमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करतोय. तो स्वभावाने शांत आणि भित्रा आहे, म्हणूनच त्याला डरपोक नाव पडलेय. घरी त्याचे वडील आणि आजोबा आहेत.घरात स्त्री कोणीच नाही. डरपोकचे वडील इन्स्पेक्टर आहेत .पण त्याचे आणि डरपोकचे पटत नाही .दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. दोघांच्यात आजोबाच एकमेव दुवा आहेत.
डरपोकची फक्त एकच मैत्रीण आहे .शोभना लहानपणापासूनच डरपोकसोबत आहेत.दोघेही एकाच बिल्डिंगमध्ये राहतात.शोभना खाली तर डरपोक वरच्या मजल्यावर.दोघांच्या कुटुंबाचेही खूप चांगले संबंध आहेत.
डरपोकला जी तरुणी आवडते ते तो शोभनाशी शेयर करीत असतो . एक दिवस लहान मुले पळविणार्या टोळीची माहिती डरपोक पोलिसांना देतो आणि डरपोकचा बाप त्या गुंडांना पकडतो. 
काही दिवसांनी डरपोकच्या बापाला पॅरॅलीसिसचा अटॅक येतो. त्यातून त्यांचे संबंध चांगले होतात. पण डरपोकचा घाबरट स्वभाव काही जात नाही .ते आजोळी एका लग्नाला जातात तिथेही डरपोक एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि ते शोभनाला सांगतो .पण तिथेही फेल होतो. 
आजोबा डरपोकला एक सल्ला देतो . पण त्या सल्लाचे परिणाम वाईट होतात आणि शोभनाशी असलेले संबंध दुरावतात .शोभना कॅनडाला जॉबसाठी निघून जाते. असे काय घडते की इतकी सुंदर निखळ मैत्री तुटायला येते. 
फक्त डरपोकच आहे जो पुढाकार घेऊन शोभनाबरोबर पूर्वीसारखी मैत्री जुळवू शकतो .पण डरपोक पुढाकार घेईल का ?
एक अतिशय सुंदर ,निखळ मैत्री कशी असते हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे पहावा.
धनुषने डरपोक उत्तम सादर केलाय.त्याचे बुजरेपण ,मुलीला प्रपोज करणे,शोभनाशी निखळ स्वच्छ मैत्री.,आजोबांसोबत मित्रांसारखे वागणे तर बापाशी फटकून बोलणे सुरेख सादर केलंय. प्रकाशराजने डरपोकचा बाप आणि इन्स्पेक्टर सादर केलाय.पॅरालिसिस अटॅक आल्यावर आलेली हतबलता .आपल्या बापावर अवलंबून रहाणे, डरपोकची माफी मागणे पाहून हलायला होते.
नित्या मेननने शोभना बनून धमाल उडवली आहे.डरपोकबरोबर भांडणारी , त्याची टेर खेचणारी पण त्यासाठी इतरांशी भांडणारी, काळजी करणारी शोभना. आपलीही मैत्रीण अशी असावी असे वाटते.
सगळ्यात धमाल केली आहे ते डरपोकचा आजोबा बनलेल्या भारतीराजाने. आपला मुलगा आणि नातू यांच्यामधील दुवा बनलेला. नातवासोबत दारू पिणारा तर मुलाची सेवा करणारा बाप सुरेख रंगविला आहे. तो जीवनाकडे खूपच सकारात्मक नजरेने पाहतो आणि आनंदाने दिवसाचे स्वागत करतो .
एक छान कौटुंबिक चित्रपट धनुषने आपल्याला दिला आहे.
चित्रपट प्राईमवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment