Sunday, October 1, 2023

पाट

पाट
"चला, यावर्षीही सगळे पाट संपले बघ.गजानना तुझीच रे ही कृपा " राम मार्केटमधील आपले दुकान आवरीत गजा पावसकर मुलाला पाठीवर धपाटा मारीत म्हणाले. 
"बाबा दरवर्षी आपले पाट संपतात .गणपती दरवर्षी नवीन पाटावर बसून येतो का ?" समीर पाठ चोळत म्हणाला .
"छे रे ,त्याला काय फरक पडतो पाटाचा .अरे साधी मातीची मूर्ती ती.आपल्याला धंदा करायचा असतो .त्यामुळे पाट हलकेच बनवावे लागतात .नाहीतर दरवर्षी विकत कोण घेईल आपले पाट. दोन वर्षात पाट बदलावे लागतील असेच पाट बनवितो आपण.आणि काहीकाही इतके हलके असतात की गणपती त्या पाटासकट वाहून जातो "खो खो हसत गजा म्हणाला.
हा आमचा गजा पावसकर म्हणजे पक्का व्यवहारी .ह्याचा व्यवहार पाहून हा कोकणातला आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
आहो स्वतःच्या मुलांकडून ही पैसे घेईल ,फुकट देणार नाही.राम मार्केटमध्ये त्याचे लाकडी वस्तूंचे दुकान होते.म्हणजे टेबल ,चौरंग ,पोळीपाट लाटणे वगैरे. आपल्या वस्तू कश्या संपवायच्या याचे नेमके ज्ञान होते त्याला .
"बाबा आपण ही यावर्षी पाट बदलायचा का ?"चार हात लांब होत समीरने विचारले.
" वेडा झालास का ? घोडेने गवताशी दोस्ती केली तो खायेगा क्या ?"कुठेतरी वाचलेला एक डायलॉग त्याच्या तोंडावर फेकून गजाने त्याला जवळ बोलावले.
पण समीरला परिणामांची कल्पना होती .तो अजून दूर सरकला.
गजाच्या खिशातून दहा रुपयांची नोट काढणे ही दिव्यच होते. भलेभले तो प्रयत्न करून थकले होते. त्या भल्याभल्यात त्याची पत्नी ,समीर, आणि बाबा इतकीच माणसे येत होती.शेजारीपाजारी तर याला हाय हॅलो म्हणायचेही पैसे घेईल या भीतीने शांतच राहत होते.
"बाळा आपल्याकडे गणपती एक जुनी परंपरा म्हणून येतो.आपण कोकणवासी एकदम रूढी परंपरा संस्कृती पाळणारे म्हणून जगात आपल्या गणपतीला मान आहे." 
"मुंबईत आल्यापासून परत कधी गावी गेलात का ?" हा प्रश्न समीरने गाडीवरच्या पाणीपुरी खाणाऱ्या मुलीकडे पाहत गिळून टाकला.
"आपण सर्व वर्षानुवर्षे वापरत असलेल्या वस्तूच वापरतो . त्यामुळे गणपती खुश असतो आपल्यावर. आपला  चौरंग साधारण ऐंशी वर्ष जुना आहे .आजोबांनी तेव्हा मधल्या आळीतून घेतला होता .तिथेच बाजूला टिळक राहायचे म्हणे." गजा शून्यात नजर ठेवून म्हणाला.
बाबांनी इतकी नजर कुठे लावली आहे हे समीरने पाहिले आणि तो चमकला .लाकडी चाळीतील सुनंदा पारकर आपले दुकान बंद करत होती.
"चौरंगाचे ठीक आहे पण निदान पाट तरी बदलू."समीर आता बिनधास्तपणे म्हणाला.सुनंदा पारकरसमोर तरी बाप धपाटा मारणार नाही याची खात्री होती त्याला .
" आपण काही बदलायचे नाही .गणपतीला आवडणार नाही." निर्वाणीचा इशारा नजरेतून देत गजा समीरकडे रोखून बघत म्हणाला .
"पण कितीतरी लोक दरवर्षी पाट बदलतात ,डेकोरेशन बदलतात काहीजण मूर्तीही बदलतात " आपण सुनंदा पारकरच्या जवळ आलोत याचा फायदा घेत समीर म्हणाला .
गजा चिडून समीरकडे सरकणार  इतक्यात सुनंदा पारकरची मधुर हाक त्याच्या कानावर पडली.
"काय गजाशेठ आज लवकर दुकान बंद केलेत "
तो स्वर ऐकताच गजा पाघळला .
"गजासेठ नका बोलू हो ,गजानन किंवा गजाननराव बोला " तो ही हळुवार आवाजात उत्तरला .
आख्खे मार्केट याला गजा नावाने ओळखते आणि याला गजाननराव बोलायचे .च्यायला माझे मित्र ही यांना गजाच बोलतात .नशीब माझा बाप आहे नाहीतर मलाही गजाच बोलावे लागले असते " समीर मनातल्या मनात पुटपुटला.
आज गणपती येणार .गजाच्या घरात गडबड उडाली होती. म्हणजे बाकी सर्व शांत होते फक्त गजाचाच आवाज ऐकू येत होता.मखर तर रेडी होता. बाकी डेकोरेशनही तयार होते. आता फक्त बाप्पाच्या आगमनाची सर्व वाट पाहत होते.
गजाच्या हातावर बसून तो घरात आला आणि थोड्या नाराजीनेच मखरात बसला .
"तुम्ही का येता यांच्याकडे ?" पाटाच्या भेगेतून आपली शेपटी सोडवत उंदीर म्हणाला." माझी शेपटी बघा काय हालत झालीय. गेली कित्येक वर्षे या पाटावर बसून येतोय आता भेगा पडल्यात त्याला .तो बदलायची तरी बुद्धी द्या."
" माझीही हालत फारशी चांगली नाहीय.चौरंग कसा डुगडुगतोय बघ " समीर आधी मला बसवितो मगच चौरंगाचा बॅलन्स सेट करतो .
खरेच बाप्पाला बसविल्यावर समीरने चौरंग सेट केला .योग्य ठिकाणी पॅकिंग दिले.
"तुझी शेपटीच अडकली नाही , तर माझाही शालू त्या फटीत अडकून फाटलाय."आपला शालू दाखवत तो म्हणाला.
"देवा त्याला मखर आणि बाजूचे डेकोरेशन तरी बदलायची बुद्धी दे.दरवर्षी तेच तेच .आपण इथेच कायम राहतो असे वाटते बघ " उंदीर चिडून म्हणाला.
" यावर्षी थर्माकोल वापरायचे शेवटचे वर्ष अशी ऑर्डर काढायला लावली आहे मी त्यामुळे पुढच्या वर्षी नवीन मखर असेल अशी आशा करू. हळू हळू प्लास्टिकवर ही बंदी आणू म्हणजे हा प्लास्टिक वापरायचे ही बंद होईल."तो हसतहसत उंदराला म्हणाला .
"पण तुम्ही कधीही त्याच्याविषयी तक्रारीचा सूर काढत नाही . ते बघा, गेली पाच वर्षे मी त्याचा तोच ड्रेस बघतोय." पूजेला बसणाऱ्या गजाकडे पाहत उंदीर म्हणाला ."तरी नशीब बाबांचा ड्रेस मागच्या वर्षी आरती करताना थोडा जाळलात , नाहीतर त्यांच्याही अंगावर नवे कपडे दिसले नसते.
"अरे ती तर गंमतच झाली .ती सुनंदा पारकर आरती संपल्यावर याच्या घरात शिरली आणि हा वेड्यासारखा तिच्याकडे पाहत बसला तीच संधी घेऊन मी बाबांचा ड्रेस खराब केला. नाहीतर आपल्याला कुठे अशी जादू करायला जमतेय"जुन्या आठवणीत तो रमून गेला .
" पण इतके असूनही दरवर्षी उत्साहाने त्याच्या घरी येता" उंदीर आश्चर्याने म्हणाला 
" हो ,गजा व्यवहारी आहे .इतरांच्या भाषेत कंजूस आहे.पण तो प्रामाणिक आहे.कष्टाळू आहे.घरी खाण्यापिण्यात कोणाचे हाल करत नाही ." समोरच्या मिक्स ड्रायफ्रुटच्या प्रसादकडे हात दाखवीत तो म्हणाला .
"पण उगाच वस्तू घ्यावी आणि जुनी चांगली वस्तू फेकून द्यावी हे पटत नाही त्याला .त्याचा धंदा चोख आहे. मुलांवर चांगले संस्कार आहेत .वहिनींवर मनापासून प्रेम करतो .अर्थात इतर स्त्रियांकडे पाहणे हा पुरुष स्वभावाचा एक भाग आहे म्हणा."तो हळूच डोळा मारीत उंदराला म्हणाला .
"पण या वस्तू बदलायला हव्या.हल्ली लोकांनाच काय पण आपल्याला ही चेंज आवडतो " उंदराने आपले म्हणणे पुढे रेटले 
" हो पण काहीजणांना समजवायला वेळ लागतो.हा चौरंग जुना असला तरी गेली ऐंशी वर्ष यावर बसतोय मी आणि याच्या आजोबांनी यासाठी किती मेहनत घेतली तेही पाहिलंय मी.नवीन चौरंग पाहून गजाच्या बापाचा चेहरा कसा हरकून गेला होता ते आठवतंय का ? त्यावेळी तू ह्याच चौरंगावर माझ्याभोवती प्रदक्षिणा घालायचाच. पण आता मी ही तोच आहे, चौरंग ही तोच, फक्त तूच आळशी झालास " रागाने उंदराकडे नजर टाकून तो म्हणाला.
" देवा हल्ली वेळ कुठय आणि प्रदक्षिणा  मारायला जागा ही नाहीय.त्यादिवशी चुकून खाली उतरलो आणि एका भक्तांच्या पायाखालीच आलो. नशिबाने वाचलो बघ " उंदीर शहारून म्हणाला .
"सोड , प्रत्येक गोष्टीची वेळ येते .याची ही येईल ,डोळे मिटून तो म्हणाला आणि शांतपणे घोरू लागला.
हे सहा दिवस  त्याचे मोठ्या आनंदात गेले. विसर्जनाला गाडीत बसून तो समुद्रावर आला .भरतीची वेळ आणि विसर्जनासाठी खूप गर्दी.आपल्या मित्रांना हात दाखवून त्यांचा निरोप घेत होता.सर्वांचे डोळे पाणावले होते.या दहा दिवसांत त्यांना जो आनंद मिळत होता तो वर्षभर पुरणार होता.
समुद्राला भरती आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे कोणाला समुद्रात जाऊ देत नव्हते.काही पट्टीच्या पोहणार्यांनी गणेश विसर्जनाची जबाबदारी अंगावर घेतली होती.
त्याला पाहून दोन माणसे पुढे झाली.पाटासकट त्याला उचलले आणि समुद्राकडे निघाले.डोळे पुसत गजाने हात हलवीत त्याला निरोप दिला आणि पाटाची वाट पाहू लागले.
पण हे काय ? ती माणसे रिकामीच हात हलवीत परत आली.
"पाट कुठेय ?" गजाने काळजीने विचारले .
"माफ करा साहेब.पण गणपती पाण्यात बुडवला आणि अचानक हाताला फटका बसला , त्यात पाट हातातून निसटला आणि बाप्पा सोबत वाहून गेला " दोन्ही हात जोडत ते दोघे म्हणाले.
"म्हणजे बाबा पुढच्या वर्षी नवीन पाट आणावा लागेल " समीर खुश होऊन म्हणाला ."पण यावेळी पाट मी आणेन माझ्या पैशांनी ,मला पाहिजे तसा.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या "
© श्री .किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment