Tuesday, July 30, 2024

आवेशम

Aavesham
आवेशम
जे फहाद फासीलचे फॅन आहेत त्यांनी हा चित्रपट जरूर पहावा. यावेळी तो विनोदी भूमिकेत आहे. 
अजू, बीबी, आणि शांतहन ही तरुण मुले केरळहून इंजिनियरिंग करायला बंगलोरला येतात.होस्टेलमध्ये मजा करायला मिळणार नाही म्हणून खाजगी हॉस्टेलमध्ये राहतात. ते ज्युनियर असल्यामुळे रॅगिंग होणारच. तिकडच्या स्थानिक गुंडांचे पाठबळ असलेली सिनियर विद्यार्थ्यांची टीम त्यांचे रॅगिंग करते. आता त्यांना विरोध करायचा तर त्यांच्यापेक्षा मोठे गुंड शोधायचे असे तिघेही ठरवितात . मग वेगवेगळ्या बार मध्ये त्यांना पाहिजे तसल्या गुंडांचा शोध सुरू करतात .
एका बारमध्ये रंगा अजूकडून सिगारेट पेटवितो आणि हसून त्याच्या डोक्यावर टपली मारून निघून जातो.रंगा सोन्याने मढलेला, पांढरे शुभ्र कपडे घातलेला ,डोळ्यावर गॉगल चढविलेला  एक सडपातळ माणूस आहे. तो कुठल्याही नजरेने गुंड वाटत नाही .त्याला रिल्स बघण्यातच इंटरेस्ट आहे. पण पूर्ण भरलेल्या बारमध्ये त्याच्यासाठी एक टेबल राखून ठेवले जाते.त्याची ही वट पाहून तिघेही त्याच्याशी मैत्री करायला जातात आणि रंगालाही ते तिघे आवडतात. तो आणि त्याचे साथीदार त्यांना दारू पाजतात.त्यांना हॉस्टेलमधून काढल्यावर रंगा आपल्या घरी घेऊन येतो.
रंगाविषयी बऱ्याच अफवा आहेत.तो स्वतः कुणावर हात उचलत नाही .त्याने आपल्या बॉसला फसविले होते.भावाचा खून करून घरच्या किचनमध्ये गाडले आहे.अश्या बऱ्याच काही.
तिघेही रंगाच्या पाठिंब्यामुळे वाहवत जातात आणि प्रायमरी परीक्षेत नापास होतात. आता त्यांना रंगापासून सुटका हवीय. रंगाच्या वाढदिवसाला त्यांना रंगाविषयी ज्या ज्या अफवा आहेत त्या खऱ्या आहेत हे त्यांना कळते. आता रंगापासून आपली कशी सुटका होईल याचाच विचार ते करतात.
त्यांची रंगापासून सुटका होईल का ?? रंगाच्या विरुद्ध जो जाईल त्याचा जीव जाणार हे नक्की.
एक थ्रिलर कॉमेडी म्हणून आणि फहाद फासील साठी आवेशम हिंदी मध्ये हॉटस्टार वर पाहायला हरकत नाही. 

Friday, July 26, 2024

सावी

सावी 
नकुल सचदेवा आणि त्याची फॅमिली मूळ भारतीय.पंजाबमध्ये त्याचे वडील राहतात. सावी सचदेवा नकुलची बायको.त्यांना आदिल त्यांचा लहान मुलगा.तिघेही आता लिव्हरपूरला सुखाने राहातायत. सावी गृहिणी आहे तर नकुलला चांगला जॉब आहे.
त्या दिवशी ते व्हिडिओ कॉलवर वडिलांशी बोलले आणि भारतात सुट्टीवर जाण्याचे नक्की केले.इतक्यात दरवाजावर पोलीस आले आणि नकुलला अटक करून घेऊन गेले.नकुलवर एका खुनाचा आरोप आहे. सर्व पुरावे त्याच्या विरुद्ध असल्यामुळे वकिलानेही हार मानली आहे.शेवटी अपेक्षित आहे तेच घडते.नकुलला बारा वर्षांनी शिक्षा होते.
आपला नवरा निरपराधी आहे याची सावीला पक्की खात्री आहे. तिची बारा वर्षे वाट पहायची तयारी नाही.ती त्याला तुरुंगातून पळवून न्यायचे ठरविते. त्यासाठी ती प्रचंड अभ्यास करते. यासाठी ती जॉयदीप पॉलची मदत घेते.जॉयदीप पॉलने आतापर्यंत सात वेळा तुरुंगातून यशस्वीपणे पलायन केलेले असते.त्याचे पुस्तक ही खूप प्रसिद्ध आहे.
सावी आपल्या प्रयत्नात यशस्वी होईल का ? त्यासाठी तिला खूपच कष्ट करावे लागतील ज्याची ती कल्पनाही करू शकत नाही.
आताच्या काळात तुरुंगातून पलायन करणे सोपे असले तरी बाहेर राहणे अशक्य आहे.नेमक्या याच गोष्टीचा विचार सावीला करायचा आहे.
दिव्या खोसलाने सावीची प्रमुख भूमिका केलीय.हर्षवर्धन राणे नकुलच्या भूमिकेत आहे.पण चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे जॉयदीप पॉल बनलेला अनिल कपूर. त्याचा सहज अभिनय भुरळ पाडून जातो.चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनय देव आहे.
एक रहस्यमय आणि उत्कंठा वाढवणारी पलायन कथा नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Thursday, July 25, 2024

द गोट लाईफ

आदुजीविथम
द गोट लाईफ
Aadujeevitham :The Goat Life
नजीब मुहंमद आणि हाकीम हे दोन मल्याळी युवक  आपल्या छोट्याश्या गावातून नोकरीसाठी आखाती देशात जातात.
तिथल्या भाषेची ,वातावरणाची ,संस्कृतीची त्यांना काहीच माहिती नाही .विमान प्रवासही पहिलाच.आखाती देशात पोचताच क्षणी त्यांना भाषेची अडचण सुरू होते.खूप वेळ होऊन जातो तरी त्यांना न्यायला कोणीच येत नाही .शेवटी उशिरा संध्याकाळी एक अरब येतो आणि त्यांना  जनावरासारखे ओढत घेऊन जातो.
व्हॅनच्या मागे बसून  त्याचा रात्रभर प्रवास सुरु राहतो.एका ठिकाणी त्यांना वेगळे केले जाते.नजीब एका ठिकाणी आणि हाकीम वेगळ्या ठिकाणी जातो.दोघेही  त्या ओसाड रखरखीत वाळवंटात शेळ्या ,बकऱ्या ,उंट पाळण्याचा कुरणात नोकर बनून राहतात.दिवसभर शेळ्या मेंढ्या ,उंटाचे रक्षण करायचे ,त्यांची काळजी घ्यायची ,त्यांचे दूध काढायचे , हेच त्यांचे काम.
कुरणाचा अरब मालक नजीबला गुलामसारखे वागवतो.चूक झाली तर चाबकाने फोडून काढतो.जरुरी पुरते पाणी आणि कोरडी रोटी हेच त्यांचे अन्न. 
असे कित्येक दिवस निघून जातात .आता नजीबला आपल्याला इथे येऊन किती काळ गेला हेच माहीत नाही. मालकाने पायावर मारल्यामुळे तो अधू झालाय. कित्येक वेळा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण दरवेळी अयशस्वी होऊन प्रचंड मार खाल्ला. ते वाळवंट इतके प्रचंड आहे की त्यांना रस्ताच दिसत नाही.
अचानक एक दिवशी त्याची गाठ हाकीमशी  होते. हाकीमचा मालक बदलल्यामुळे तो नजीबच्या जवळ आलाय. हाकीम सोबत एक आफ्रिकन माणूस आहे ज्याला इथल्या वातावरणाची आणि परिसराची माहीती आहे. तो दोघांना  हायवेवर घेऊन जाण्याचे आश्वासन देतो.
संधी साधून तिघेही पळून जातात.पण त्या भयंकर वाळवंटातून चालणे इतके सोपे नाही. मैलोनमैल रस्ता दिसत नाही .वर रखरखीत भाजून काढणारे ऊन, पाणी नाही .मनुष्यवस्ती नाही . ते  शहरात येण्यात यशस्वी होतात का ?
संपूर्ण चित्रपट वाळवंटात चित्रित आहे. खरे तर त्या वातावरणात जिवंत राहणे हे आश्चर्यकारक आहे.
पृथ्वीराज सुकुमारनने नजीबच्या भूमिकेत जीव ओतलाय. त्याचा अभिनय अंगावर काटा आणतो. के. आर. गोकुलने हाकीमच्या भूमिकेत छान साथ दिलीय.
ए. आर.रहमानचे संगीत आहे. चित्रपटाचे छायाचित्रण अप्रतिम आहे.जॉर्डनच्या वाळवंटात चित्रपट चित्रित केला आहे.
काही ठिकाणी चित्रपट खटकतो.वातावरणाची माहिती असूनही नजीब ,हाकीम ,आणि तो आफ्रिकन माणूस पिण्याचे पाणी न घेताच का बाहेर पडतात. दूरवर एकही माणूस दिसत नसतानाही नजीब आपल्या मालकाचे अत्याचार का सहन करतो .त्याला विरोध कधीच करत नाही.त्याचा मालक ही एकटाच असतो.
आपल्याला इथून बाहेर पडायचे आहे हे मनाशी ठरवलेले असताना नजीब आपल्या शरीराची काळजी का घेत नाही .त्यांची परिस्थिती इतकी वाईट दाखवली आहे की तो या वाळवंटात  जिवंत कसा राहिला याचेच आश्चर्य वाटते.
सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, July 20, 2024

pill

Pill
पील
फॉरेवर क्युअर फार्मा भारतातील सर्वात मोठी औषध उत्पादन करणारी कंपनी.पंजाब त्यांचा मूळ बेस. ब्रम्हा गील त्याचा मालक. पंजाबचे मुख्यमंत्री त्याचे मित्र . डायबेटीसवर  त्यांची औषधे प्रसिद्ध आहेत.
डॉ. गुलसिमरीत कौर नव्यानेच सरकारच्या ड्रग इन्स्पेशन संस्थेत जॉईन झाली.ती तरुण आणि तडफदार आहे.आपल्या  टीमसोबत ती फॉरेवर क्युअरच्या प्लांटमध्ये इन्स्पेशनला जाते . तेव्हा तिथला एक अधिकारी एक फाईल नाल्यात टाकून देतो.
नूर खान एक तरुण पत्रकार.अडगळीत असलेल्या एका छोट्या सच नावाच्या पेपरसाठी  पत्रकारीता करतो. त्याला ती फाईल कचऱ्यात सापडते.कंपनीचे नाव पाहून तो त्या फाईलची अधिक खोलवर चौकशी करू लागतो.
डॉ .प्रकाश चौहान प्रमोशनवर डॉ.गुलसिमरीत कौरचा बॉस बनून आलाय. डॉ. गुलसिमरीत कौरला फॉरेवर फार्मा विषयी संशय येऊ लागला आणि तिने तो डॉ. प्रकाशला बोलून दाखविला.डॉ. प्रकाश खूप सरळ साधे पण प्रामाणिक तत्वांचे आहेत. डॉ.गुलसिमरीत कौरला ते पूर्ण पाठिंबा देतात.
त्या फाईलमधील माहिती नूरला कळते तेव्हा तो चक्रावून जातो आणि डॉ. प्रकाश आणि डॉ. कौरला भेटून फाईल त्यांच्या ताब्यात देतो.
डॉ. आशिष फॉरेवर फार्मामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट हेड आहे.आपल्या कंपनीत काहीतरी गडबड चालू आहे हे त्याच्या लक्षात येते पण त्याचे वरिष्ठ त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.
एक प्रामाणिक साधा सरळ डॉ. प्रकाश डॉ. कौर आणि नूर खान सारख्या तरुणांना सोबत घेऊन बनावट औषध तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीविरुद्ध कसा लढा देतो हे पाहणे खूपच रोमांचक आहे.
पील ह्या मालिकेत मारहाण ,रक्तपात , अश्लील दृश्ये ,अश्लील संवाद अजिबात नाहीत.यातील हिरो खूप साधे आहेत .तर व्हिलनही कोणाला मारत नाहीत.ही लढाई वरच्या पातळीवर चालते.
डॉ. प्रकाश चौहानच्या भूमिकेत रितेश देखमुखने कमाल केली आहे.मनातले बोलून न दाखवणारा पण चेहऱ्यावर आणणारा डॉ.प्रकाश अफलातून आहे.ककूडामध्ये जितका तो विनोदी भूमिकेत आहे त्याच्या अगदी विरुद्ध यात आहे.
पवन मल्होत्राचा गील फार्मा कंपनीचा मालक शोभतो.
एक संथ पण उत्सुकता ताणून धरणारी ही सिरीज जिओ सिनेमावर हिंदीत आहे.

pill

Pill
पील
फॉरेवर क्युअर फार्मा भारतातील सर्वात मोठी औषध उत्पादन करणारी कंपनी.पंजाब त्यांचा मूळ बेस. ब्रम्हा गील त्याचा मालक. पंजाबचे मुख्यमंत्री त्याचे मित्र . डायबेटीसवर  त्यांची औषधे प्रसिद्ध आहेत.
डॉ. गुलसिमरीत कौर नव्यानेच सरकारच्या ड्रग इन्स्पेशन संस्थेत जॉईन झाली.ती तरुण आणि तडफदार आहे.आपल्या  टीमसोबत ती फॉरेवर क्युअरच्या प्लांटमध्ये इन्स्पेशनला जाते . तेव्हा तिथला एक अधिकारी एक फाईल नाल्यात टाकून देतो.
नूर खान एक तरुण पत्रकार.अडगळीत असलेल्या एका छोट्या सच नावाच्या पेपरसाठी  पत्रकारीता करतो. त्याला ती फाईल कचऱ्यात सापडते.कंपनीचे नाव पाहून तो त्या फाईलची अधिक खोलवर चौकशी करू लागतो.
डॉ .प्रकाश चौहान प्रमोशनवर डॉ.गुलसिमरीत कौरचा बॉस बनून आलाय. डॉ. गुलसिमरीत कौरला फॉरेवर फार्मा विषयी संशय येऊ लागला आणि तिने तो डॉ. प्रकाशला बोलून दाखविला.डॉ. प्रकाश खूप सरळ साधे पण प्रामाणिक तत्वांचे आहेत. डॉ.गुलसिमरीत कौरला ते पूर्ण पाठिंबा देतात.
त्या फाईलमधील माहिती नूरला कळते तेव्हा तो चक्रावून जातो आणि डॉ. प्रकाश आणि डॉ. कौरला भेटून फाईल त्यांच्या ताब्यात देतो.
डॉ. आशिष फॉरेवर फार्मामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट हेड आहे.आपल्या कंपनीत काहीतरी गडबड चालू आहे हे त्याच्या लक्षात येते पण त्याचे वरिष्ठ त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.
एक प्रामाणिक साधा सरळ डॉ. प्रकाश डॉ. कौर आणि नूर खान सारख्या तरुणांना सोबत घेऊन बनावट औषध तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीविरुद्ध कसा लढा देतो हे पाहणे खूपच रोमांचक आहे.
पील ह्या मालिकेत मारहाण ,रक्तपात , अश्लील दृश्ये ,अश्लील संवाद अजिबात नाहीत.यातील हिरो खूप साधे आहेत .तर व्हिलनही कोणाला मारत नाहीत.ही लढाई वरच्या पातळीवर चालते.
डॉ. प्रकाश चौहानच्या भूमिकेत रितेश देखमुखने कमाल केली आहे.मनातले बोलून न दाखवणारा पण चेहऱ्यावर आणणारा डॉ.प्रकाश अफलातून आहे.ककूडामध्ये जितका तो विनोदी भूमिकेत आहे त्याच्या अगदी विरुद्ध यात आहे.
पवन मल्होत्राचा गील फार्मा कंपनीचा मालक शोभतो.
एक संथ पण उत्सुकता ताणून धरणारी ही सिरीज जिओ सिनेमावर हिंदीत आहे.

Thursday, July 18, 2024

ककूडा

Kakuda
ककूडा
राथोडी गावात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सगळे व्यवहार ठप्प होतात. गावकरी घरी जाऊन मुख्य दरवाजा बंद करतात आणि छोटा दिंडी दरवाजा उघडून ठेवतात. 
सव्वा सात वाजता ककूडा गावात फेरी मारतो .ज्या घराचा दिंडी दरवाजा बंद असेल त्या घरात शिरून पुरुषाच्या पाठीत लाथ मारतो.
दुसऱ्या दिवशी त्या पुरुषाच्या पाठीवर एक कुबड येते आणि तेराव्या दिवशी तो मरण पावतो. हे गेली अनेक वर्षे चालू आहे .ककूडा नावाच्या बुटक्या भुताचा शाप गावाला आहे असे वयोवृद्ध सांगतात.
सनी त्या गावातील एक तरुण. त्याचे इंदिरावर प्रेम आहे. घरच्या विरोधामुळे इंदिरा त्याच्याशी देवळात लग्न करते. तो दिवस नेमका मंगळवार असतो.
सनीचे वडील बाहेरगावी गेलेले असतात त्यामुळे दरवाजा उघडायला सनीला जावेच लागणार आहे. सनी धावत जाऊन दरवाजा उघडतो पण आता उशीर झालेला आहे.ककूडाने घरात शिरून सनीच्या पाठीवर लाथ मारली .
इंदिरा दुसऱ्या दिवशी सनीच्या घरी पोचली तेव्हा सर्व प्रकार कळला. तिचा भूतप्रेतवर विश्वास नव्हता. ती सनीला घेऊन दिल्लीला हॉस्पिटलमध्ये आली आणि ऑपरेशन करून सनीचे कुबड काढले.पण दुसऱ्या दिवशी कुबड पुन्हा उगवले. हॉस्पिटलच्या सिक्युरिटी गार्डने इंदिराला एक कार्ड देऊन त्या माणसाशी बोलायला सांगितले.
व्हिक्टर स्वतःला घोस्टहंटर समजतो.तो भुतांना मुक्ती देतो. इंदिरा त्याला सनीला वाचविण्यासाठी गावी बोलावते.
व्हिक्टर ककूडापासून सनीला वाचवेल का ?? गावाला त्याच्या शापातून मुक्ती मिळेल का ?
आदित्य सरपोतदार हॉरर चित्रपट बनविण्यात एक्सपर्ट समजले जातात. चित्रपटाची कथा चांगली आहे .चित्रपट कॉमेडी का बनविला ते कळत नाही. धड कॉमेडी नाही धड हॉरर नाही अश्या अर्धवट अवस्थेत हा चित्रपट अडकला आहे .त्यामुळे हसूही येत नाही आणि भीतीही वाटत नाही .
इंदिराच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा तर सनीच्या भूमिकेत सकीब सलीम आहे.रितेश देशमुखने व्हिक्टरची भूमिका नेहमीच्या विनोदी ढंगात सादर केली आहे.
टाईमपास म्हणून झी5 वर हा हिंदी चित्रपट पाहायला हरकत नाही .

Tuesday, July 16, 2024

साकीनी डाकीनी

Saakini Daakini
साकीनी डाकीनी
तेलंगणा पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये नवीन बॅच ट्रेनिंगसाठी आली. दामिनीचे वडील आणि भाऊ पोलीस ऑफिसर होते. ती उच्चभ्रू वर्गातील होती.आणि तिला प्रवेशही कोट्यातून मिळाला होता. तर शालिनी स्पोर्ट्स कोट्यातून गरीब वर्गातून आली होती. 
शालिनी मजा म्हणून ट्रेनिंगला आली तर दामिनी अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी सिलेक्ट झाली होती. तिला फक्त काही काळ अकॅडमीमध्ये काढायचा होता. सुरवातीलाच दोघींमध्ये खटके उडू लागले . त्यात दोघीही रूममेट झाल्या. मग एकमेकींवर कुरघोडी करणे चालू झाले. अकॅडमीमध्ये त्या साकीनी डाकीनी म्हणून फेमस  होत्या. एका प्रसंगाने दोघी एकत्र आल्या आणि घट्ट मैत्रिणी बनल्या.
अकॅडमीचे निरस आयुष्य त्यांना मानवत नव्हते म्हणून एके रात्री त्या पबमध्ये गेल्या . रात्री उशिरा दारू पिऊन बाहेर पडल्या. रस्त्यातून चालताना अचानक काही बाईकवाले त्यांच्या अंगावर आले .पण नशिबाने एका तरुणीने त्यांना वाचविले.
तिचे आभार मानून त्या दोघी पुढे निघाल्या इतक्यात एका कारमधून त्या तरुणीचे अपहरण झाले. त्यांनी गाडीचा पाठलाग केला पण ते निसटले. दोघीही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेल्या पण त्यांचे कोणीच ऐकले नाही .उलट त्यांनी ताबडतोब अकॅडमीमध्ये परत यावे असा आदेश आला.
आपला जीव वाचविणार्या तरुणीला आपण वाचविले पाहिजे असा त्यांनी निश्चय केला. पण त्यांना तिच्याबद्दल काहीच माहिती नाही .मग ती कोण ? कुठे राहते ? हे शोधणार कसे ? 
तरीही त्या दोघी हळूहळू एकएक कडी जोडत वेगळ्याच रहस्याकडे पोचतात आणि हादरून जातात .
सुरवातीला विनोदी वाटणारा हा चित्रपट पुढे पुढे गंभीर आणि थरारक होत जातो. 
रेजिना कॅसेन्द्रा दामिनी आणि निवेथा थॉमस शालिनीच्या भूमिकेत आहे.
चित्रपट नेटफ्लिक्सवर तेलगू ,मल्याळम भाषेत आहे .हिंदी सबटायटल्स असल्यामुळे चित्रपट समजण्यास अडचण येत नाही .

Sunday, July 14, 2024

महाराजा

MAHARAJA
महाराजा
एखाद्या व्यक्तीचे नाव आणि त्याचा स्वभाव यात जमीनअस्मानचा फरक असतो. महाराजाचे तसेच आहे.महाराजा हे नाव असले तरी तो स्वभावाने गरीब आहे.खाली मान घालून काम करणारा ,मक्ख चेहऱ्याचा, कमी बोलणारा.
तो एका सलूनमध्ये केस कापायचे काम करतो. त्या दिवशी त्याने मालकाकडे सुट्टी मागितली.आपल्या लहान मुलींसाठी आणि बायकोसाठी खरेदी करायला बाजारात जायचे आहे असे मक्ख चेहऱ्याने मालकाला सांगितले. 
मुलीला आणि बायकोला त्याने एका घरात बसवून समोरच्या दुकानात खरेदी करत असतानाच एक ट्रक त्या घरात घुसला त्यात त्याची बायको ठार झाली.पण वरून एक स्टीलचा कचऱ्याचा डब्बा त्याच्या मुलीच्या अंगावर पडला आणि ती वाचली.
या घटनेला साधारण तेरा वर्ष झालीत. महाराजा आता त्या सलूनचा मालक झालाय. त्याची मुलगी ज्योती  दहावीला आहे .ती अभ्यासात हुशार नाही पण स्पोर्टमध्ये हुशार आहे. घरात महाराजा ,ज्योती आणि लक्ष्मी असे तीन सदस्य राहतात.. लक्ष्मी त्या कचऱ्याच्या डब्ब्याचे नाव आहे ज्याने ज्योतीचे प्राण वाचले होते.
ज्योतीची शाळेतून स्पोर्टसाठी निवड होते आणि ती आठवड्यासाठी बाहेरगावी जाते.जाताना ती महाराजाला लक्ष्मीची काळजी घ्यायला सांगते.
एक दिवशी महाराज पोलीस स्टेशनला येतो आणि लक्ष्मीची चोरी झाल्याचे सांगतो.त्याचा कान जखमी झालेला असतो. तीन माणसांनी आपल्यावर हल्ला करून लक्ष्मीला घेऊन गेले असे सांगतो.लक्ष्मी कोणी स्त्री नसून कचऱ्याचा डब्बा आहे असे कळताच सगळे पोलीस चिडतात आणि त्याला मारहाण करतात.पण तो चिवटपणे तेच सांगत राहतो. 
इन्स्पेक्टर वरदाराजनही ही गोष्ट हसण्यावारी नेतो.पण महाराजा लक्ष्मीला शोधण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवतो नंतर रक्कम वाढवून सात लाख करतो. पैश्याच्या लालचेने वरदाराजन आणि त्याचा स्टाफ लक्ष्मीला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तसाच अगदी हुबेहूब डब्बा बनविण्याचे ठरवितात.
महाराजा रोज पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतो.सर्व पोलीस त्याचा नोकराप्रमाणे वागवितात.त्याची थोडी चूक झाली तरी कानाखाली आवाज काढतात.त्याच्याच पैशाने बिर्याणी खातात तर घरचा भाजीपाला ही त्याच्याच पैशाने त्याच्याकडूनच आणून घेतात.त्याला सर्व कचऱ्याचा डब्बा म्हणतात.
आता नकली कचऱ्याचा डब्बा बनवून झालाय .नकली चोरही पोलिसांकडे आहे .फक्त महाराजाने तो डब्बा ओळखून सात लाख वरदाराजनला द्यायचे आहेत. पुन्हा एकदा पोलीस महाराजाला सगळी घटना सांगायला लावतात .महाराजा पुन्हा ती घटना सांगतो आणि खरी गोष्ट ऐकून पोलीस सुन्न होतात.
काय आहे त्या स्टीलच्या कचऱ्याच्या डब्ब्याचे रहस्य ?? असे काय घडलंय की त्या डब्ब्यासाठी महाराजा सात लाख रुपये मोजायला तयार आहे ? तो पोलिसांचा नोकर बनलाय ,त्यांचा मार खातोय. तरीही रोज पोलीस स्टेशनला जाऊन बसतोय.
शेवटी हे रहस्य उलगडते पण दुसरेच अनपेक्षित सत्य आपल्यासमोर उभे राहते आणि आपण हादरून जातो.
विजय सेतुपतीने महाराजाची भूमिका नेहमीसारखी सुरेख रंगवली आहे. महाराजाचा मक्खपणा ,निरागसता त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तर अनुराग कश्यप एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
चित्रपट विनोदी वळणाने जाणार असे वाटत असतानाच एका रहस्याकडे गंभीरपणे झुकतो आणि पुढे प्रेक्षकांना सावरून बसायला भाग पाडतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, July 13, 2024

द ट्रिप

The Trip
द ट्रिप
लार्स एक डायरेक्टर आहे .त्याची बायको लिसा अभिनेत्री . खरे तर लार्स आपल्या बायकोपासून खुश नाही.तरीही ते एका जंगलात त्यांच्या खाजगी फार्म हाऊसवर सहलीसाठी जातात.लार्स तिथेच लिसाला ठार मारायचे ठरवितो .पण त्याचा प्लॅन फसतो आणि तोच लिसाच्या तावडीत सापडतो. आता लिसा त्याला ठार मारायचे ठरविते .तितक्यात लार्सचा मदतनीस तिथे पोचतो आणि तो लिसाला बंदी बनवितो. लिसा त्याला भरपूर पैश्याची ऑफर करते आणि त्याचे मन विचलित करते. तो द्विधा मनस्थितीत सापडतो आणि तिघांची झटापट होते त्यात लार्सच्या हातून तो मारला जातो.
पुन्हा लार्स आणि लिसाची झटापट होते आणि बंदुकीच्या गोळ्या लाकडी छतावर लागतात. छत कोसळून त्यातून तीन माणसे त्या दोघांच्या अंगावर पडतात . कोण आहेत ती तीन माणसे ??
आता ते तिघेही लिसा आणि लार्सला ताब्यात घेतात .लिसा त्यांनाही पैश्याची ऑफर देते. मधून मधून दोघेही सुटकेचा प्रयत्न करत असतात पण दरवेळी अपयशी ठरतात.
लिसा आणि लार्स त्यांच्या तावडीतून सुटतील का ?? 
कोण आहेत ती तीन माणसे ? 
 द ट्रिप नार्वेचा चित्रपट आहे.यातील काही दृश्य अतिरंजित आहे. पहिल्याप्रथम विनोदी वाटणारा हा चित्रपट त्या तीन व्यक्तींचा प्रवेश होताच गंभीर बनतो .भरपूर प्रमाणात रक्तपात या चित्रपटात आहे.
शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणारा हा चित्रपट इंग्रजी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

Friday, July 12, 2024

seven

Seven
सेवन 
पोलीस ऑफिसर विलियम्स सॉमरसेटला निवृत्त होण्यासाठी फक्त सात दिवस बाकी राहिलेत .त्याच्या जागी  डेव्हिड मिल्स आला आहे. पण त्या शहरात अतिशय क्रूरपणे एका व्यक्तीचा खून झालाय. कोणीतरी जबरदस्तीने त्या व्यक्तीला अति खायला दिलंय आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय. तिथे फक्त एक  gluttony हा शब्द लिहिलाय. दुसऱ्या दिवशी एका वकिलाचा क्रूरपणे खून होतो आणि तिथे greed लिहिलेले आहे.मिल्स उतावळा तरुण आहे तर सॉमरसेट अनुभवी .दोघेही आपल्या परीने या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. 
सॉमरसेटच्या मते हे सर्व सात भयानक पाप ची कल्पना आहे. हा पिसाट खुनी सात खून केल्याशिवाय थांबणार नाही अशी खात्री सॉमरसेटला आहे. शेवटी ते शोध घेत एका संशयितापर्यंत पोचतात पण तो त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो.
सॉमरसेट आपली शेवटची केस यशस्वीपणे सोडवून निवृत्त होईल का ? ते दोघेही खऱ्या खुन्याला पकडतील ? आणि त्यासाठी त्यांना काय किंमत मोजावी लागेल.
1995 साली हा चित्रपट  प्रदर्शित झाला. मॉर्गन फ्रिमन आणि ब्रॅड पिट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संपूर्ण चित्रपट पावसात चित्रित केला आहे त्यामुळे एक उदासीनता चित्रपटभर व्यापून राहते.चित्रपटातील खून फारच क्रूरपणे दाखविले आहेत.
ज्यांना थ्रिलर क्राईम चित्रपट आवडतात त्यांच्यासाठी नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, July 10, 2024

srikanth

Srikanth
श्रीकांत 
सीतारामपुरम नावाच्या छोट्या गावात श्रीकांतचा जन्म झाला तेव्हा त्याचे वडील शेतात मजुरी करत होते.मुलाची बातमी ऐकून ते दारूच्या दुकानात धावले एक बाटली पूर्ण पिऊन मुलाचे तोंड पाहायला घरात शिरले.पण जन्माला आलेला श्रीकांत जन्मतः अंध असल्याचे कळताच त्याला मारण्याचा निर्णय घेतला .आईने हातापाया पडून मुलाला वाचविले.
श्रीकांत अंध होता पण हुशार होता.सर्वांसोबत शाळेत जायचा .शिक्षक सांगतील ते नीट ऐकून घ्यायचा .त्याला सर्व पाठ होते.पण गावात त्याच्या बुद्धीला मर्यादा होत्या हे ओळखून त्याला हैद्राबादला अंध मुलांच्या शाळेत पाठविले.
तिथे त्याला देविका टीचर भेटली.देविका त्याच्या पाठीमागे उभी राहिली .त्याला हॉस्टेलमधून काढून टाकले तेव्हाही देविका त्याला घरी घेऊन आली .दहावीला त्याला 96% मिळाले . पण अंधाना विज्ञान शाखेत प्रवेश नव्हता .श्रीकांत कोर्टात गेला आणि तिथे जिंकून विज्ञान शाखेत प्रवेश मिळविला.
बारावीतही तो टॉपला होता.पण आयआयटीतही तीच अट होती.त्याने पुन्हा  कोर्टात जाण्यास नकार दिला आणि स्वतःच्या हिकामतीवर एमआयटी बोस्टनला प्रवेश मिळविला .त्यासाठी त्याने भारतीय विकलांग  क्रिकेट संघातील संधीही नाकारली.
पदवी मिळाल्यावर त्याने अमेरिकेतच राहण्याचे ठरविले . भारताने मला नाकारले आता मलाही भारताची गरज नाही असे त्याचे म्हणणे.ते ऐकून देविका टीचर नाराज झाली.पण त्याच्या मैत्रिणीने वीराने त्याचे मन वळविले आणि तो भारतात परत आला .
भारतात येऊन त्याने स्वतःचा उद्योग चालू केला .पण हे सर्व इतके सोपे आहे का ?? त्याला यात किती अडचणी आल्या ,त्याला कोणी मदत केली , तो यशस्वी झाला का ?? हे सर्व पहायचे असेल तर श्रीकांत पाहायला हवाच.
या चित्रपटाद्वारे अंध उद्योगपती श्रीकांत बोलाचा जीवनपट आपल्यासमोर सादर केला आहे.
राजकुमार राव श्रीकांतची भूमिका अक्षरशः जगलाय. तर ज्योतिकाने देविका टीचर बनून त्याला योग्य साथ दिलीय.शरद केळकर रवीच्या भूमिकेत आहे. भरत जाधव जजच्या छोट्या भूमिकेत आहे.
अंधाना पैसे देऊ नका त्यांना काम द्या. त्यांना समाजात समानतेने वागवा. हेच श्रीकांत सर्वाना सांगतो. तो क्रिकेट खेळतो ,बेसबॉल खेळतो.माझी राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम श्रीकांतच्या पाठी नेहमीच उभे राहिले होते.
श्रीकांतची जीवनगाथा देशातील तरुणांना नेहमीच प्रोत्साहन देईल.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .कोणीही चुकवू नये असा हा प्रेरणादायी चित्रपट आहे.

Tuesday, July 9, 2024

टाईपरायटर

Typewriter
टाईपरायटर
समीरा उर्फ सॅम ,सत्यजीत उर्फ गबलू, देवराज उर्फ बंटी  हे शाळेत जाणारे त्रिकुट. सॅम मुलगी आहे .तिचे वडील आनंद एक पोलीस ऑफिसर आहेत.
 गोव्यातील बारडेझ नावाच्या छोट्या गावात त्यांनी तिघांचा मिळून घोस्ट क्लब बनविला आहे.ते तिघेही नेहमी भुताच्या शोधात असतात. बारडेझ गावात एक जुनी हवेली आहे. तिला भुताची हवेली म्हणतात.
साधारण चाळीस वर्षांपूर्वी जेनी त्या घरातून निघून गेली तेव्हा ती लहान होती. आईचा अपघाती मृत्यू झाला होता आणि तिला सतत त्या खोलीत लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता.
तिचे आजोबा माधव मॅथ्यू प्रसिद्ध भूतकथा लेखक होते. त्यांची घोस्ट ऑफ सुल्तानपूर नावाची कादंबरी  प्रसिद्ध आहे. घोस्ट क्लबला ती कादंबरी पाठ आहे.
जेनी तिचा नवरा आणि अन्या निक मुलांसह  त्या हवेलीत राहायला आलीय.  निकही आता घोस्ट क्लबमध्ये सामील झालाय.
 हवेलीतील जुन्या सामानात अन्याला जुना टाईपरायटर सापडतो. तो टाईपरायटर जेनीच्या आजोबांचा आहे. अमित रॉय उर्फ मुन्ना त्या टाईपरायटरच्या मागावर आहे .त्या टाईपरायटरसाठी तो खूनही करायला मागेपुढे पाहत नाही.
जेनीच्या संपर्कात येणारे काही लोक अचानक मत्यूमुखी पडतात.पोस्टमार्टेममध्ये त्यांचे हृदय एकदम सुकलेले  आढळते. 
माधव मॅथ्यूच्या काळात फकीर नावाच्या सिरीयल किलरला पकडून फासावर लटकविलेले असते.फकीर लोकांच्या शरीरातून आत्मा काढून घेतो आणि शक्तिशाली बनतो असा समज असतो.फाशी जाण्यापूर्वी तो आपली सगळी कथा माधव मॅथ्यूला सांगतो आणि  त्यावरूनच घोस्ट ऑफ सुल्तानपूर लिहिली जाते.
आता काही दिवसांनी ब्लड ऑफ मून येणार आहे.या दिवशी पौर्णिमेला काही काळ चंद्र लाल रंगात बदलणार आहे आणि त्याचवेळी फकीर जिवंत होणार असा समज आहे.घोस्ट क्लबला याची जाणीव आहे .त्यांना कोणत्याही परिस्थिती टाईपरायटर ताब्यात घ्यायचा आहे .
अतिशय गूढ ,रहस्यमय , सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.यात चार बाल कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत .
टाईमपास म्हणून बघायला हरकत नाही .दुसरा सिझन येणार याची कल्पना शेवटच्या भागात येते.

Saturday, July 6, 2024

मिर्झापुर 3

Mirzapur 3
मिर्झापुर 3
तुम्हाला जर मिर्झापुर १ आणि २च्या  दहशतीतून बाहेर पडायचे असेल तर मिर्झापुर 3 बघावा लागेल.कारण आधीच्या दोन्ही सिझनच्या मानाने हा तिसरा सिझन खूपच हलका सॉफ्ट आणि बऱ्याच दडपणातून मुक्त करणारा आहे.
अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीनभय्या आता जखमी होऊन गायब झालेला आहे तर मुन्ना मारला गेलाय.गजगामीनी उर्फ गोलू दीदी आणि गोविंद पंडित उर्फ गुड्डू भैय्या या दोघांच्या ताब्यात मिर्झापुर आले आहे.कालीनभय्याची पत्नी बिना आपल्या छोट्या मुलीसह त्या दोघांच्या आश्रयाखाली  त्रिपाठी भवनमध्येच राहतेय . तर मुन्नाची पत्नी माधुरी मुख्यमंत्री झालीय.
आता मिर्झापुरच्या गादीवर अधिकृतपणे कोण बसणार यावर चर्चा आहे. जौनपूरचा शरद शुक्लाही या स्पर्धेत आहे. गुड्डू पंडितने भर बाजारात शरद शुक्लाच्या वडिलांची हत्या केली होती . त्याचा रागही शरदच्या डोक्यात आहे. शरदनेच कालीनभैय्याला गुडडूच्या गोळीबारातून वाचवून स्वतःच्या घरी आणून ठेवले आहे .
बहुबलीच्या बैठकीत पूर्वांचलची सत्ता कोणाला मिळणार हे बहुमताने ठरेल .मुख्यमंत्री माधुरीने उत्तर प्रदेश भयमुक्त करण्याची योजना आखली आहे यासाठी गुड्डू आणि गोलूला ठार करायाची तिची प्राथमिकता  आहे .याकामी शरद शुक्ला तिला मदत करतोय.
अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीनभय्या याला संपूर्ण सिझनमध्ये काहीच भूमिका नाही . तो चौथ्या भागात येतो आणि नंतर प्रत्येक भागात काही मिनिटे दिसतो .तो फक्त शेवटच्या भागात शेवटची काही मिनिटे आपले खरे रूप दाखवतो .
ज्यांनी पाहिले दोन सिझन पाहिले आहेत त्यांना हा सिझन फारसा पचनी पडणार नाही. कारण दोन्ही सिझनमध्ये कालीनभय्या आपल्या फुल पॉवरमध्ये होते.ते थंड रक्ताने अतिशय शांतपणे आपला डाव खेळत होते. त्याचा पडद्यावरचा वावर आपला श्वास रोखत होता.तितकीच टक्कर त्यांना गोलू आणि गुड्डूने दिली होती.
पहिल्या दोन्ही सिझनमध्ये  भरपूर रक्तपात , हिंसाचार होता. पण तिसऱ्या सिझनमध्ये राजकारणाचे खेळ आहेत.सर्वच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात .उत्तर प्रदेशची सत्ता आणि बाहुबली आपल्या हातात ठेवायचे प्रयत्न सर्वच राजकारणी नेते करतायत.
तिसऱ्या सिझनमध्ये सगळेच गोंधळल्यासारखे वाटतात .गुड्डूकडे प्लॅन्स नाहीत.तर शरद शुक्लाचे डावपेच फसतात. मुख्यमंत्रीही गुड्डूला ताब्यात घेऊ शकत नाहीत .
या सीझनमध्ये पहिल्या दोन सिझनचेच प्रमुख  कलाकार आहेत. पंकज त्रिपाठी ,अली फझल, श्वेता त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत .तर लिलीपुट ,विजय वर्मा, अंजुम शर्मा, इशा तलवार यांनी योग्य साथ दिलीय.
पहिल्या दोन सिझनची भीती तिसरा सिझन कमी करतो हे नक्की .बघू पुढच्या सीझनमध्ये काय घडेल ??
प्राईम व्हिडिओवर हिंदीमध्ये आहे.

Thursday, July 4, 2024

मुमताज

" अरे मुमताज यहा किधर ?? कितने सालों बाद आज दिखाई दि
"माफ कीजिये मैं मुमताज नही हु,माझे नाव अनघा आहे. आपण मुमताज का म्हणालात?
"ओ हो ,सॉरी, मला वाटले तुम्ही मुमताज आहात,
" पण का असे वाटले, सांगा तर, मी रागावणार नाही "
"खरे म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी पनवेलच्या night queen बार मध्ये एक डान्सर होती ती तुमच्यासारखी दिसायची, मला वाटले त्या तुम्हीच ,माफ करा मला "
"हरकत नाही, खरे तर तीच आहे मी ,पण खूप वर्षे झाली, हे नाव आता विसरते मी" पण तुम्ही कोण, आता तेव्हडे आठवत नाही !"
"बरोबर आहे, खूप जणांशी रोज तुमचा संबंध, पण फाटक्या नोटा फेकल्या तरी तुम्ही मला किस द्यायचा ..आठवले का आता ???
"अरे हो, आता आठवले, हा! हा! हा !तूच तो, फटी नोटवाला, आम्ही तुला नाव ठेवले होत े"निर्लज्ज माणूस"
"आता काय चालू आहे ,???
"काही नाही, अचानक डान्स बार बंदी झाली, आम्हाला तर तेव्हढेच येत होते ,एका रात्रीच रस्त्यावर आलो, पैसा कमावला भरपूर पण साठवायची अक्कल नव्हती. ऐश आरामाची चटक लागलेली, आठवड्यात कंगाल झालो ,"
"मग त्या नंतर काय केलेस??
"अरे त्या वेटर अनिल बरोबर लग्न केले होते, दुसरा कोण स्वीकारणार आम्हाला, जो तो रात्री पुरता मागायचा  ,पण मी तेव्हा कधीच कोणाबरोबर गेले नाही, संसार करावा, मुलेबाळे असावीत इतकेच स्वप्न होते माझे "पण या बंदीमुळे जमिनीवर आपटले मी, नशीब डोक्यावर छप्पर होते ,सगळे माहित असणारा समजून घेणारा  नवरा आहे , एक मुलगी आहे"
"अरे वा ! छान !"
"मग काय पुढे पैसे मिळवण्यासाठी कष्ट करायला सुरवात केली , मिळेल ते काम केले , हळू हळू सावरले, पैशाचे महत्त्व कळले, तेव्हा नको त्या वयात नको इतका पैसा कमावला पण अक्कल नव्हती, तुझ्या महिन्याच्या पगराइतके पैसे एका रात्री कमवायचे मी , असो तू काय करतोस आता ???
"मी? ओके ,नोकरी करतोय , संसार आहे , बाकी सगळे बंद"
"छान, माझी मुलगी आता आर्किटेकच्या लास्ट वर्षात आहे ,कदाचित पुढे अच्छे दिन आयेंगे, खूप भोगले मी आयुष्यात ,लोकांची पैसे कामांवण्याची धडपड पहिली , खूप घृणा येते मला माझी , त्याच्या कष्टाचे पैसे ते आमच्यावर उडवायचे , आज खूप बरे वाटते , गरिबीत का होईना माझ्या मुलीला कष्टाच्या पैशाने वाढवतेय" पण एक सांग तू नेहमी फाटक्या नोटा कुठून आणायचास"?? मालक खूप चिडायचा आमच्यावर कोणी आणल्या ह्या नोटा म्हणून "??
"मग तू कधी बोललि नाहीस त्याला ??माझे नाव सांगितले नाहीस.??
नाही सांगितले?? माहित नाही का ? कुठेतरी तरी मनाने खूप मोकळा आणि चांगला वाटलास , तुझे तिथे येणेही इतरांसारखे नव्हते , खूप व्यवहारी  वाटलास तू, गुंतत नव्हतास तू कशात , नाही दारू नाही समोरची बाई," आताही तुझ्याशी बोलताना मोकळेपणा वाटतो , मनापासून ऐकून घेतोस तू माझी गोष्ट"
"अरे ,?? थँक्स , असे काही नाही ,त्यावेळी तरुणपणाचा जोश होता , पण खीश्यात पैसे नसायचे , म्हणून कंट्रोल करत जास्त मज्जा कुठे मिळेल ते पाहायचो , दुसऱ्यांदाही फाटक्या नोटा काही न बोलता तू घेतल्यास त्यावेळी थोडे फील झाले ,आणि ती आठवण अजूनही आहे ,म्हणून अचानक दिसलीस आणि राहवले नाही. ठीक आहे. भेटू पुन्हा कधी .
नाही सॉरी.... आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, मागील भूतकाळातील वाईट पान पलटून मी खूप पुढे निघून आले आहे. माझ्या भूतकाळाची काळी छाया आता माझ्या मुलीच्या भविष्यावर नको , त्यामुळे आपली हि शेवटची भेट आहे. राग मानू नकोस. पण तू समजून घेऊ शकतोस. मी माझ्या भूतकाळाला ओळख देत  नाही आणि कोणाशीही या विषयावर बोलत नाही ".
"अगं ठीक आहे, मी नक्कीच समजू शकतो. राग धरण्याचा तर प्रश्नच नाही. कारण काही असो पण त्या नरकातून तुझी सुटका झाली आणि आज ताठ मानेनी तू जगत्येस हे बघून खरंच खूप बरं वाटलं."..... बाय 



इन्स्पेक्टर ऋषी

इन्स्पेक्टर ऋषी
Inspector Rishi
दक्षिणेतील घनदाट जंगलात एका वन्यजीव फोटोग्राफरची रहस्यमय हत्या होते. त्याच्या संपूर्ण देहावर जाळे विणले गेलेले असते.इन्स्पेक्टर ऋषीची या हत्येचा तपास करण्याची जबाबदारी येते. इन्स्पेक्टर ऋषी धाडसी ऑफिसर आहे.एका चकमकीत त्याने आपला एक डोळा आणि बायको गमावली आहे.
इन्स्पेक्टर ऋषीला मदतीसाठी चित्रा आणि अय्यंगार दिले जातात.जंगलातील वनराची नावाच्या देवीने ही हत्या केलीय असा सर्वांचा समज झालाय.पुढे अश्याच पद्धतीने काही हत्या होतात.आता ऋषींच्या मदतीला फॉरेस्ट ऑफिसरची टीमही आलीय. सत्या हा तरुण फॉरेस्ट ऑफिसर आणि त्याची सहकारी कॅथी  ऋषींच्या मदतीला तयार आहे.
असा कोणता किडा आहे जो पटकन मृतदेहाभोवती जाळे विणतो हे ऋषीला शोधून काढायचे आहे आणि ज्या हत्या झाल्या त्याचा परस्परांशी काय संबंध आहे याचा ही तपास करायचा आहे.
वनराची रात्रीच्या अंधारात बऱ्याच लोकांना दिसते त्यामुळे गावकरी रात्री घराबाहेर पडत नाहीत.
इन्स्पेक्टर ऋषी या प्रकरणाच्या मुळाशी जाईल का ? वनराची तर त्याच्याही मागे आहे. 
ह्या हत्यांच्या मागे कोण आहेत ??
प्राईम व्हिडिओवर ही दहा भागांची हिंदी मालिका आपला श्वास रोखून धरते.

बेव्हरली हिल्स कॉप एक्सेल

Beverly Hills Cop : Axel F
बेव्हरली हिल्स कॉप : एक्सेल एफ
बेव्हरली हिल्सचा तिसरा भाग 1994 ला प्रदर्शित झाला . त्यानंतर हा आता 2024 ला प्रदर्शित झालाय . पण अजूनही सर्व काही तेच आहे.फक्त यातील डिटेक्टिव्ह एक्सेल फोलि ,बिली रोसवूड,  जॉन टॅगर आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत.एक्सेलची कामात झोकून देण्याची वृत्ती बदलली नाहीय.आणि मुख्य म्हणजे याची फेमस थीम अजूनही आपल्याला तरुणपणीची आठवण करून देते.
एक्सेलची मुलगी जेन बेव्हरली हिल्सला वकिली करतेय.पण तिचा वडिलांवर राग आहे.बिली रोसवूडला डिपार्टमेंटमधील पोलीस अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यामुळे बडतर्फ करण्यात आले आहे. ड्रग माफियांच्या भानगडीत एक पोलीस अधिकारी मारला जातो आणि त्याच्या खुनाचा आरोप एका तरुणावर येतो.त्या तरुणाला तुरुंगातून निर्दोष सुटका करायची आणि सत्य समोर आणायची जबाबदारी बिली जेनवर टाकतो. पण पुरावे शोधताना तो पकडला जातो .इथे त्या तरुणाचे आरोप पत्र घेतल्यामुळे जेनवर प्राणघातक हल्ला होतो .
एक्सेल फोगीला हे कळताच तो बेव्हरली हिलला येतो .त्याचे आणि जेनचे संबंध थोडे बिघडलेले आहेत.पण तरीही तो जेनचा विरोध डावलून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो .त्यात त्याला जेनचा मित्र आणि पोलीस अधिकारी बॉबी अब्बोट मदत करतो.
याचे हिंदी डबिंग चित्रपटाला साजेशे आहे. एडी मर्फीचा अभिनय भन्नाट आहे.इतक्या वर्षानंतरही एक्सेल फोलीच्या विनोदी स्वभावात काहीही फरक पडला नाहीय.चित्रपट नेहमीसारखा एक्शन कॉमेडी आहे.
बेव्हरली हिल्सच्या सिरीजने एडी मर्फीला अफाट लोकप्रियता मिळवून दिली .चित्रपट पाहताना हसू आवरत नाही .
हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, July 3, 2024

माय नेम इज श्रुती

My Name Is Shruthi
माय नेम इज श्रुती
एका प्रसिद्ध उद्योगपतींच्या पत्नीला त्वचेचा आजार होतो. एक सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जरी करणारी तरुण स्त्री डॉक्टर त्यांना त्वचा बदलायचा सल्ला देते. ब्लॅक मार्केटमध्ये त्वचेची किंमत सध्या एका इंचाला दहा लाख रुपये आहे .तो उद्योगपती आपले सोर्सेस वापरून करोडो किमतीला त्वचेची व्यवस्था करतो .
श्रुती जॉबसाठी छोट्या गावातून  हैद्राबादला आलीय.प्रथम ती आपल्या बहिणीकडे राहते पण आपल्यामुळे तिच्या संसारात अडचण होतेय हे पाहून एका फ्लॅटमध्ये शिफ्ट होते.चरण तिचा बॉयफ्रेंड आहे.
एके दिवशी अचानक एक व्यक्ती तिच्या घरात घुसून हल्ला करते.  प्रतिकार करताना तिच्या हातून त्याचा खून होतो.ती त्याचे हातपाय बांधून टबमध्ये टाकते आणि घर लॉक करून गावी निघून जाते. तीन दिवसांनी ती गावावरून परत येते तेव्हा तिच्या सोसायटीत पोलीस तिचीच वाट पाहत असतात .ती दरवाजा उघडून आत येते आणि टबमधील दृश्य पाहून हादरते. टबमध्ये  तरुणाच्या जागी एका तरुणीचे प्रेत असते.
एसीपी रणजितकडे या तपासाची जबाबदारी आहे .तो प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहे. श्रुतीला तो ताब्यात घेतो तेव्हा ती जबाबात सर्व काही सांगते .पण आता श्रुतीच्या मागावर काही लोक आहेत.
कोण आहेत ते लोक ?? त्वचेची तस्करी नेमका काय प्रकार आहे ? यात गुंतलेल्या व्यक्तींचे हात फार वरपर्यंत पोचले आहेत.
हा चित्रपट आपल्याला नावापासून ते शेवटपर्यंत आपल्याला धक्के देत राहतो .चित्रपटाच्या शेवटपर्यंत हे  सगळे काय चालले आहे हे कळत नाही .
कमालीचा उत्कंठावर्धक आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.
हंसिका मोटवानी श्रुतीच्या प्रमुख भूमिकेत आहे.तर साई तेज ,मुरली शर्मा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Tuesday, July 2, 2024

वारी

वारी
"मला वारीला जायचंय." तिने त्यादिवशी घरात जाहीर केले.अर्थात विचारणे तिच्या स्वभावात नव्हतेच. ती निर्णय घ्यायची.
"अग, पण अचानक वारीचे खूळ कसे डोक्यात शिरले तुझ्या.."? तिच्या आईने आश्चर्याने विचारले.
"मला त्यांचा अभ्यास करायचा आहे . त्यांचे मॅनेजमेंट पहायचे आहे. शिकायचे आहे.कशी एव्हडी माणसे डोक्यावर तुळस घेऊन  दूरवर चालत येत विठ्ठलाला भेटायला येतात..? काय असते त्यांच्या मनात..? कसली भक्ती आहे ही .? सर्व ठिकाणी ऍडजस्ट करत राहतात .कोणावर राग नाही नि कसला  निषेध नाही..." तिने आईला उत्तर दिले.
" हो ग.!! मलाही पंढरपूरला वारीतून जायची खूप इच्छा आहे .पण तुझ्या आजीचे कोण करेल याची काळजी. पण तू जा... संधी सोडू नकोस ".आईने थोड्या दुःखी स्वरात तिला म्हटले.
दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरून फोन आला . भावाची तब्बेत बिघडली आहे येऊन जा .गेली दोन वर्षे ती सासूबाईंना सोडून गेली नव्हती आज अचानक असे झाले म्हटल्यावर थोडी घाबरली.
ईतक्यात ती म्हणाली "आई ...जा तू मामाकडे . मी पाहीन एक दिवस आजीकडे . पण एक दिवस फक्त .
हिने काळजीने म्हटले "अग पण तिचे करणे जमेल का तुला.?  तिच्या सवयी ...खाणे , पथ्य ,औषध करशील का ग तू ?
"तू काही काळजी करू नकोस.. मी पाहीन तिला व्यवस्थित . तिने आईला आश्वासन दिले.तशी ही तिला घेऊन सासूबाईंच्या खोलीत शिरली. 
खरे तर तीही थोडी घाबरलीच होती .आजीच्या खोलीत ती सहसा जात नसे, किंबहुना टाळतच असे. पण आता अंगावर आले तर करावेच लागणारच ना . 
आजी पलंगावर झोपून होती . तिने दोघींकडे पाहिले . बऱ्याच दिवसांनी नातीला पाहून तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य फुलले .तिने सवयीप्रमाणे आजीला हाय केले तर आजीनेही नातीला थंप्सअप करून उत्तर दिले . आईने  दोघीना जरुरीच्या सूचना केल्या आणि बाहेर पडली.
 सकाळी नेहमीप्रमाणे तिला जाग आली. आईला हाक मारताच ओ आली नाही तेव्हा तिला कालचे आठवले.
आजीची आठवण येताच ती घाईघाईने अंथरुणातून उठली आणि धावत आजीच्या खोलीत शिरली . घाणीचा वास येताच ती समजून गेली.बिछान्यात आजी ओशाळवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती . लाजेने तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.
हिने ते पहिले "अरे आजी.. सॉरी ...मी उठलेच नाही. पण आता आलेय ना.... चल मस्तपैकी फ्रेश होऊ . आज तुझी केयर टेकर बदलली आहे थोडे ऍडजस्ट करून घे .असे म्हणत तिला बहुलीसारखे उचलून घेतले आणि बाथरूममध्ये घेऊन गेली .
"चल आज मस्तपैकी शॉवर घे तू ...मी तुझ्यासाठी गाणे म्हणते" असे म्हणत शॉवर चालू करून गाणे गुणगुणत तिला आंघोळ घातली.नेहमी बिछान्यावर स्पंज घेतलेल्या आजीला हे सर्व आवडले. गरम पाण्याच्या धारा तिच्या चित्तवृत्ती आनंदी करून गेल्या . छानपैकी आंघोळ झाल्यावर हिने परत तिला उचलून बाहेर आणले ."किती बारीक झालीस तू ..काहीतरी खात जा चमचमीत... अजिबात वजन नाही तुला .डायटिंग करते  का या वयात...?? की सून काही देत नाही ..." असे काही बडबडत तिने खुर्चीत बसवले आणि तिला तयार केले .यावेळी आजीही खुश होती . बऱ्याच वर्षांनी पावडर आणि परफ्युम वापरला होता. मग बिछाना बदलून खोली स्वछ करून तिने तिला बेडवर ठेवले .
"चल आता आपण नाश्ता करू ..मी तुझ्यासाठी पास्ता करते.. असे म्हणतात आजीने खट्याळपणे डोळे मिचकावून होकार दिला .  तिनेही आपल्या पद्धतीचा पास्ता बनवून आजीला भरविला . आजीने तिला पेपर वाचून दाखवायची खूण केली.हिला बऱ्याच वर्षांनी पेपर वाचायची संधी मिळाली.अडखळत का होईना तिने महत्वाच्या बातम्या आजीला वाचून दाखविल्या मग तिला औषधें देऊन स्वतःची तयारी करायला गेली . बाहेर आली तेव्हा आजी शांतपणे झोपली होती.
 इतक्यात आईचा फोन आला. पास्ता दिला म्हटल्यावर ती रागावली पण नंतर हसू लागली . जेवण साधे दे असे बजावून फोन ठेवला . मग हिनेही साधे वरण भात केले पापड तळले, आणि आजीला भरवत स्वतःही तिच्या बरोबर जेवली .पहिल्यांदाच केलेल्या वरण भाताची चव तिला छानच वाटत होती .हसत आजीला विचारले कसे आहे जेवण तर तिने अंगठा आणि बोट एकत्र करून छानची खूण केली आणि आ वासला. दोघींनी हसत खेळत जेवण संपविले . परत औषधें देऊन ती बाहेर आली .शारीरिक कष्टाची सवय नसल्याने ती थकली होती . सहज मोबाइल बघितला तेव्हा पाचशे मेसेज दिसत होते .अरे देवा ....!! इतके मेसेज..? सकाळपासून मोबाईल हातातही घेतला नाही याची तिला आठवण झाली .  मग मेसेज वाचता वाचता कधी झोपून गेली तिला कळलेच नाही .
संध्याकाळी आजीच्या बेलनी तिला जाग आली.आजीने हळूच चहाची खूण केली.तिचा तो निरागस चेहरा पाहून ती हसली "नो चाय आजी .आज मिल्क शेक "असे म्हणत ती किचनमध्ये शिरली.मस्तपैकी दोन मिल्कशेक घेऊन आजीच्या समोर बसली .चियर्स करीत दोघींही मिल्कशेक पियाल्या. आजी आज खुश दिसत होती.
रात्री आई घाईघाईत घरात शिरली आणि सासूबाईंना हसताना पाहून तिचा जीव भांड्यात पडला.रात्रीचे जेवण काय असे विचारताच तिने सकाळचा वरण भट आईसमोर ठेवला . आज तिघीही एकत्रच जेवायला बसल्या . पहिला घास खाताच आई पटकन म्हणाली "अग बाई किती मीठ टाकलेस ..?आजीला सहन होत नाही आणि मिरच्याही आहेत वरणात.."तिने ओशाळून आजीकडे पाहिले ,आजी डोळे मिचकावत हसत होती . मस्त मस्त अशी खूण करत तिने नातीला प्रोत्साहन दिले  आणि ते पाहून सर्व हसू लागले.
" हे बघ ...आता मी आलेय तू आनंदाने वारीला जा .मी बघते सासूबाईना "तिने मुलीला ऑर्डर सोडली.
" कशाला जायचे वारीला..? जे तिथे जाऊन शिकायचे जो आनंद मिळवायचा तो इथेच तर मिळाला मला..विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचा आनंद इथेच पहिला मी. तूही घर सांभाळायचे मॅनेजमेंट करतेस ना ते मी बाहेर वारकऱ्यांकडे का शिकू ..? आज खूप काही शिकले मी आजीच्या सोबत . तूच जाऊन ये वारीला मी संभाळीन आजीला.आजपासून तू एकटी नाहीस मीही आहे तुझ्या मदतीला"असे बोलून आजीला घट्ट मिठी मारली.
आजीने उशी खालून जुन्या चांदोबाचे पुस्तक काढून तिच्या हाती दिले. ते पुस्तक पाहताना डोळ्यातील अश्रू कधी त्यावर पडले हे तिलाच कळले नाही .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

क्रॅक

CRAKK
क्रॅक 
आपण अनेक तरुणांना रेल्वेतून उड्या मारताना ,पर्वतावरून ,जंगलातील दऱ्याखोऱ्यातून सायकल चालवतानाचे जीवघेणे स्टंट पाहतो .कधी कधी प्रश्न पडतो की का ते हे स्टंट करतायत .ती एक नशा असते .परदेशात असे  स्टंट खूप प्रसिद्ध आहेत.अश्या जीवघेण्या स्टंटच्या स्पर्धा ही घेतल्या जातात.
पोलंडमध्ये अशीच एक स्पर्धा घेतली जाते. त्या स्पर्धेला मैदान असे नाव आहे.जगभरातून जीवघेणे स्टंटचे व्हिडिओ पाहून त्यातील उत्तम स्पर्धक निवडले जातात आणि त्यांना चोरट्या मार्गाने पोलंड येथे एका अनोळखी जागेत आणले जाते.मग ही स्पर्धा संपूर्ण जगात लाईव्ह दाखवली जाते.करोडो रुपयांचे बेटिंग लावले जाते. तीन भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या रेस यात आहेंत .अंतिम विजेता करोडपती होईल.पुन्हा जो ही स्पर्धा जिंकेल त्याला देवसोबत अजून एक रेस खेळावी लागेल .देव या स्पर्धेचा आयोजक आहे आणि अपराजित आहे.
निहाल दिक्षित आणि सिद्धार्थ दिक्षित दोघे भाऊ या  जीवघेण्या स्टंटमध्ये एक्सपर्ट आहेत.निहालची मैदान स्पर्धेत निवड झालेली असते पण अंतिम फेरीत तो देव विरुद्ध हरतो .त्याच्या मृत्यूचे कारण शोधायला सिद्धार्थ मैदान स्पर्धेत भाग घेतो .जगभरातून एकूण बत्तीस खेळाडू या मैदानात आहेत .पण तिसऱ्या रेसमध्ये फक्त एकच राहणार आहे .
सिध्दार्थ दिक्षित ही रेस जिंकून देवला मात देईल का ?
चित्रपटाचा निर्माता विद्युत जांमवाल आहे आणि  तोच सिद्धार्थच्या प्रमुख भूमिकेत आहे .त्यामुळे चित्रपटात अंगावर काटा आणणारे स्टंट आहेत.चित्रपटाची फोटोग्राफी उत्तम आहे .लोकेशनही सुंदर आहे.पण मुख्य आकर्षण आहे स्पर्धा.ही स्पर्धा अंगावर काटा आणणारी आणि श्वास रोखून धरणारी आहे .
देवच्या भूमिकेत अर्जुन रामपालने ही विद्युतच्या तोडीस तोड स्टंट दिले आहेत.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Monday, July 1, 2024

द बीकिपर

The Beekeeper
द बीकिपर
ऍडम क्लेचा मधमाशी पाळण्याचा धंदा आहे.तो त्यातून मध गोळा करून विकतो. तो एकटाच राहतो आणि फार कमी बोलतो.त्याच्या शेजारीच एक  निवृत्त स्कूल टीचर एलॉइस पार्कर राहते.पार्कर एक चॅरिटी फंड ही चालवते.फंडाचे बरेच पैसे तिच्या अकाउंटमध्ये आहेत . क्लेचे तिच्याशी चांगलेच जमते.
एके दिवशी लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करायचा तिला मेसेज येतो .ती कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करते आणि काही मिनिटातच तिच्या अकाउंटमधून सर्व पैसे गायब होतात.या घटनेचा धक्का बसून ती आत्महत्या करते.
तिची मुलगी वरोना पार्कर एफबीआय एजंट आहे.तिला आईने आत्महत्या का केलीय याचे कारण कळते आणि ते क्लेला सांगते.
क्ले त्या कॉल सेंटरचा अड्रेस शोधून काढतो .ते  कॉल सेंटर एका प्रसिद्ध राजकारणी स्त्री चा मुलगा मिकी गारनेट चालवतो . आता त्याची आई अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर बसली आहे.पण क्लेला या गोष्टीचा फरक पडत नाही.तो मिकीचे कॉल सेंटर उध्वस्त करतो .आता मिकीची माणसेही क्लेच्या मागे लागतात .अमेरिकेची सर्वोच्च यंत्रणाही क्लेच्या मागे लागली आहे.क्ले या सर्वांचा सामना करेल का ?? 
ऍक्शन स्टार जेसन स्टेथाम ऍडम क्लेच्या भूमिकेत आहे.चित्रपट वेगवान असून जेसनच्या भूमिकेला साजेल असाच आहे.