Thursday, July 25, 2024

द गोट लाईफ

आदुजीविथम
द गोट लाईफ
Aadujeevitham :The Goat Life
नजीब मुहंमद आणि हाकीम हे दोन मल्याळी युवक  आपल्या छोट्याश्या गावातून नोकरीसाठी आखाती देशात जातात.
तिथल्या भाषेची ,वातावरणाची ,संस्कृतीची त्यांना काहीच माहिती नाही .विमान प्रवासही पहिलाच.आखाती देशात पोचताच क्षणी त्यांना भाषेची अडचण सुरू होते.खूप वेळ होऊन जातो तरी त्यांना न्यायला कोणीच येत नाही .शेवटी उशिरा संध्याकाळी एक अरब येतो आणि त्यांना  जनावरासारखे ओढत घेऊन जातो.
व्हॅनच्या मागे बसून  त्याचा रात्रभर प्रवास सुरु राहतो.एका ठिकाणी त्यांना वेगळे केले जाते.नजीब एका ठिकाणी आणि हाकीम वेगळ्या ठिकाणी जातो.दोघेही  त्या ओसाड रखरखीत वाळवंटात शेळ्या ,बकऱ्या ,उंट पाळण्याचा कुरणात नोकर बनून राहतात.दिवसभर शेळ्या मेंढ्या ,उंटाचे रक्षण करायचे ,त्यांची काळजी घ्यायची ,त्यांचे दूध काढायचे , हेच त्यांचे काम.
कुरणाचा अरब मालक नजीबला गुलामसारखे वागवतो.चूक झाली तर चाबकाने फोडून काढतो.जरुरी पुरते पाणी आणि कोरडी रोटी हेच त्यांचे अन्न. 
असे कित्येक दिवस निघून जातात .आता नजीबला आपल्याला इथे येऊन किती काळ गेला हेच माहीत नाही. मालकाने पायावर मारल्यामुळे तो अधू झालाय. कित्येक वेळा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण दरवेळी अयशस्वी होऊन प्रचंड मार खाल्ला. ते वाळवंट इतके प्रचंड आहे की त्यांना रस्ताच दिसत नाही.
अचानक एक दिवशी त्याची गाठ हाकीमशी  होते. हाकीमचा मालक बदलल्यामुळे तो नजीबच्या जवळ आलाय. हाकीम सोबत एक आफ्रिकन माणूस आहे ज्याला इथल्या वातावरणाची आणि परिसराची माहीती आहे. तो दोघांना  हायवेवर घेऊन जाण्याचे आश्वासन देतो.
संधी साधून तिघेही पळून जातात.पण त्या भयंकर वाळवंटातून चालणे इतके सोपे नाही. मैलोनमैल रस्ता दिसत नाही .वर रखरखीत भाजून काढणारे ऊन, पाणी नाही .मनुष्यवस्ती नाही . ते  शहरात येण्यात यशस्वी होतात का ?
संपूर्ण चित्रपट वाळवंटात चित्रित आहे. खरे तर त्या वातावरणात जिवंत राहणे हे आश्चर्यकारक आहे.
पृथ्वीराज सुकुमारनने नजीबच्या भूमिकेत जीव ओतलाय. त्याचा अभिनय अंगावर काटा आणतो. के. आर. गोकुलने हाकीमच्या भूमिकेत छान साथ दिलीय.
ए. आर.रहमानचे संगीत आहे. चित्रपटाचे छायाचित्रण अप्रतिम आहे.जॉर्डनच्या वाळवंटात चित्रपट चित्रित केला आहे.
काही ठिकाणी चित्रपट खटकतो.वातावरणाची माहिती असूनही नजीब ,हाकीम ,आणि तो आफ्रिकन माणूस पिण्याचे पाणी न घेताच का बाहेर पडतात. दूरवर एकही माणूस दिसत नसतानाही नजीब आपल्या मालकाचे अत्याचार का सहन करतो .त्याला विरोध कधीच करत नाही.त्याचा मालक ही एकटाच असतो.
आपल्याला इथून बाहेर पडायचे आहे हे मनाशी ठरवलेले असताना नजीब आपल्या शरीराची काळजी का घेत नाही .त्यांची परिस्थिती इतकी वाईट दाखवली आहे की तो या वाळवंटात  जिवंत कसा राहिला याचेच आश्चर्य वाटते.
सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment