Sunday, July 14, 2024

महाराजा

MAHARAJA
महाराजा
एखाद्या व्यक्तीचे नाव आणि त्याचा स्वभाव यात जमीनअस्मानचा फरक असतो. महाराजाचे तसेच आहे.महाराजा हे नाव असले तरी तो स्वभावाने गरीब आहे.खाली मान घालून काम करणारा ,मक्ख चेहऱ्याचा, कमी बोलणारा.
तो एका सलूनमध्ये केस कापायचे काम करतो. त्या दिवशी त्याने मालकाकडे सुट्टी मागितली.आपल्या लहान मुलींसाठी आणि बायकोसाठी खरेदी करायला बाजारात जायचे आहे असे मक्ख चेहऱ्याने मालकाला सांगितले. 
मुलीला आणि बायकोला त्याने एका घरात बसवून समोरच्या दुकानात खरेदी करत असतानाच एक ट्रक त्या घरात घुसला त्यात त्याची बायको ठार झाली.पण वरून एक स्टीलचा कचऱ्याचा डब्बा त्याच्या मुलीच्या अंगावर पडला आणि ती वाचली.
या घटनेला साधारण तेरा वर्ष झालीत. महाराजा आता त्या सलूनचा मालक झालाय. त्याची मुलगी ज्योती  दहावीला आहे .ती अभ्यासात हुशार नाही पण स्पोर्टमध्ये हुशार आहे. घरात महाराजा ,ज्योती आणि लक्ष्मी असे तीन सदस्य राहतात.. लक्ष्मी त्या कचऱ्याच्या डब्ब्याचे नाव आहे ज्याने ज्योतीचे प्राण वाचले होते.
ज्योतीची शाळेतून स्पोर्टसाठी निवड होते आणि ती आठवड्यासाठी बाहेरगावी जाते.जाताना ती महाराजाला लक्ष्मीची काळजी घ्यायला सांगते.
एक दिवशी महाराज पोलीस स्टेशनला येतो आणि लक्ष्मीची चोरी झाल्याचे सांगतो.त्याचा कान जखमी झालेला असतो. तीन माणसांनी आपल्यावर हल्ला करून लक्ष्मीला घेऊन गेले असे सांगतो.लक्ष्मी कोणी स्त्री नसून कचऱ्याचा डब्बा आहे असे कळताच सगळे पोलीस चिडतात आणि त्याला मारहाण करतात.पण तो चिवटपणे तेच सांगत राहतो. 
इन्स्पेक्टर वरदाराजनही ही गोष्ट हसण्यावारी नेतो.पण महाराजा लक्ष्मीला शोधण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवतो नंतर रक्कम वाढवून सात लाख करतो. पैश्याच्या लालचेने वरदाराजन आणि त्याचा स्टाफ लक्ष्मीला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तसाच अगदी हुबेहूब डब्बा बनविण्याचे ठरवितात.
महाराजा रोज पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतो.सर्व पोलीस त्याचा नोकराप्रमाणे वागवितात.त्याची थोडी चूक झाली तरी कानाखाली आवाज काढतात.त्याच्याच पैशाने बिर्याणी खातात तर घरचा भाजीपाला ही त्याच्याच पैशाने त्याच्याकडूनच आणून घेतात.त्याला सर्व कचऱ्याचा डब्बा म्हणतात.
आता नकली कचऱ्याचा डब्बा बनवून झालाय .नकली चोरही पोलिसांकडे आहे .फक्त महाराजाने तो डब्बा ओळखून सात लाख वरदाराजनला द्यायचे आहेत. पुन्हा एकदा पोलीस महाराजाला सगळी घटना सांगायला लावतात .महाराजा पुन्हा ती घटना सांगतो आणि खरी गोष्ट ऐकून पोलीस सुन्न होतात.
काय आहे त्या स्टीलच्या कचऱ्याच्या डब्ब्याचे रहस्य ?? असे काय घडलंय की त्या डब्ब्यासाठी महाराजा सात लाख रुपये मोजायला तयार आहे ? तो पोलिसांचा नोकर बनलाय ,त्यांचा मार खातोय. तरीही रोज पोलीस स्टेशनला जाऊन बसतोय.
शेवटी हे रहस्य उलगडते पण दुसरेच अनपेक्षित सत्य आपल्यासमोर उभे राहते आणि आपण हादरून जातो.
विजय सेतुपतीने महाराजाची भूमिका नेहमीसारखी सुरेख रंगवली आहे. महाराजाचा मक्खपणा ,निरागसता त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तर अनुराग कश्यप एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
चित्रपट विनोदी वळणाने जाणार असे वाटत असतानाच एका रहस्याकडे गंभीरपणे झुकतो आणि पुढे प्रेक्षकांना सावरून बसायला भाग पाडतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment