Tuesday, July 2, 2024

वारी

वारी
"मला वारीला जायचंय." तिने त्यादिवशी घरात जाहीर केले.अर्थात विचारणे तिच्या स्वभावात नव्हतेच. ती निर्णय घ्यायची.
"अग, पण अचानक वारीचे खूळ कसे डोक्यात शिरले तुझ्या.."? तिच्या आईने आश्चर्याने विचारले.
"मला त्यांचा अभ्यास करायचा आहे . त्यांचे मॅनेजमेंट पहायचे आहे. शिकायचे आहे.कशी एव्हडी माणसे डोक्यावर तुळस घेऊन  दूरवर चालत येत विठ्ठलाला भेटायला येतात..? काय असते त्यांच्या मनात..? कसली भक्ती आहे ही .? सर्व ठिकाणी ऍडजस्ट करत राहतात .कोणावर राग नाही नि कसला  निषेध नाही..." तिने आईला उत्तर दिले.
" हो ग.!! मलाही पंढरपूरला वारीतून जायची खूप इच्छा आहे .पण तुझ्या आजीचे कोण करेल याची काळजी. पण तू जा... संधी सोडू नकोस ".आईने थोड्या दुःखी स्वरात तिला म्हटले.
दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरून फोन आला . भावाची तब्बेत बिघडली आहे येऊन जा .गेली दोन वर्षे ती सासूबाईंना सोडून गेली नव्हती आज अचानक असे झाले म्हटल्यावर थोडी घाबरली.
ईतक्यात ती म्हणाली "आई ...जा तू मामाकडे . मी पाहीन एक दिवस आजीकडे . पण एक दिवस फक्त .
हिने काळजीने म्हटले "अग पण तिचे करणे जमेल का तुला.?  तिच्या सवयी ...खाणे , पथ्य ,औषध करशील का ग तू ?
"तू काही काळजी करू नकोस.. मी पाहीन तिला व्यवस्थित . तिने आईला आश्वासन दिले.तशी ही तिला घेऊन सासूबाईंच्या खोलीत शिरली. 
खरे तर तीही थोडी घाबरलीच होती .आजीच्या खोलीत ती सहसा जात नसे, किंबहुना टाळतच असे. पण आता अंगावर आले तर करावेच लागणारच ना . 
आजी पलंगावर झोपून होती . तिने दोघींकडे पाहिले . बऱ्याच दिवसांनी नातीला पाहून तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य फुलले .तिने सवयीप्रमाणे आजीला हाय केले तर आजीनेही नातीला थंप्सअप करून उत्तर दिले . आईने  दोघीना जरुरीच्या सूचना केल्या आणि बाहेर पडली.
 सकाळी नेहमीप्रमाणे तिला जाग आली. आईला हाक मारताच ओ आली नाही तेव्हा तिला कालचे आठवले.
आजीची आठवण येताच ती घाईघाईने अंथरुणातून उठली आणि धावत आजीच्या खोलीत शिरली . घाणीचा वास येताच ती समजून गेली.बिछान्यात आजी ओशाळवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती . लाजेने तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.
हिने ते पहिले "अरे आजी.. सॉरी ...मी उठलेच नाही. पण आता आलेय ना.... चल मस्तपैकी फ्रेश होऊ . आज तुझी केयर टेकर बदलली आहे थोडे ऍडजस्ट करून घे .असे म्हणत तिला बहुलीसारखे उचलून घेतले आणि बाथरूममध्ये घेऊन गेली .
"चल आज मस्तपैकी शॉवर घे तू ...मी तुझ्यासाठी गाणे म्हणते" असे म्हणत शॉवर चालू करून गाणे गुणगुणत तिला आंघोळ घातली.नेहमी बिछान्यावर स्पंज घेतलेल्या आजीला हे सर्व आवडले. गरम पाण्याच्या धारा तिच्या चित्तवृत्ती आनंदी करून गेल्या . छानपैकी आंघोळ झाल्यावर हिने परत तिला उचलून बाहेर आणले ."किती बारीक झालीस तू ..काहीतरी खात जा चमचमीत... अजिबात वजन नाही तुला .डायटिंग करते  का या वयात...?? की सून काही देत नाही ..." असे काही बडबडत तिने खुर्चीत बसवले आणि तिला तयार केले .यावेळी आजीही खुश होती . बऱ्याच वर्षांनी पावडर आणि परफ्युम वापरला होता. मग बिछाना बदलून खोली स्वछ करून तिने तिला बेडवर ठेवले .
"चल आता आपण नाश्ता करू ..मी तुझ्यासाठी पास्ता करते.. असे म्हणतात आजीने खट्याळपणे डोळे मिचकावून होकार दिला .  तिनेही आपल्या पद्धतीचा पास्ता बनवून आजीला भरविला . आजीने तिला पेपर वाचून दाखवायची खूण केली.हिला बऱ्याच वर्षांनी पेपर वाचायची संधी मिळाली.अडखळत का होईना तिने महत्वाच्या बातम्या आजीला वाचून दाखविल्या मग तिला औषधें देऊन स्वतःची तयारी करायला गेली . बाहेर आली तेव्हा आजी शांतपणे झोपली होती.
 इतक्यात आईचा फोन आला. पास्ता दिला म्हटल्यावर ती रागावली पण नंतर हसू लागली . जेवण साधे दे असे बजावून फोन ठेवला . मग हिनेही साधे वरण भात केले पापड तळले, आणि आजीला भरवत स्वतःही तिच्या बरोबर जेवली .पहिल्यांदाच केलेल्या वरण भाताची चव तिला छानच वाटत होती .हसत आजीला विचारले कसे आहे जेवण तर तिने अंगठा आणि बोट एकत्र करून छानची खूण केली आणि आ वासला. दोघींनी हसत खेळत जेवण संपविले . परत औषधें देऊन ती बाहेर आली .शारीरिक कष्टाची सवय नसल्याने ती थकली होती . सहज मोबाइल बघितला तेव्हा पाचशे मेसेज दिसत होते .अरे देवा ....!! इतके मेसेज..? सकाळपासून मोबाईल हातातही घेतला नाही याची तिला आठवण झाली .  मग मेसेज वाचता वाचता कधी झोपून गेली तिला कळलेच नाही .
संध्याकाळी आजीच्या बेलनी तिला जाग आली.आजीने हळूच चहाची खूण केली.तिचा तो निरागस चेहरा पाहून ती हसली "नो चाय आजी .आज मिल्क शेक "असे म्हणत ती किचनमध्ये शिरली.मस्तपैकी दोन मिल्कशेक घेऊन आजीच्या समोर बसली .चियर्स करीत दोघींही मिल्कशेक पियाल्या. आजी आज खुश दिसत होती.
रात्री आई घाईघाईत घरात शिरली आणि सासूबाईंना हसताना पाहून तिचा जीव भांड्यात पडला.रात्रीचे जेवण काय असे विचारताच तिने सकाळचा वरण भट आईसमोर ठेवला . आज तिघीही एकत्रच जेवायला बसल्या . पहिला घास खाताच आई पटकन म्हणाली "अग बाई किती मीठ टाकलेस ..?आजीला सहन होत नाही आणि मिरच्याही आहेत वरणात.."तिने ओशाळून आजीकडे पाहिले ,आजी डोळे मिचकावत हसत होती . मस्त मस्त अशी खूण करत तिने नातीला प्रोत्साहन दिले  आणि ते पाहून सर्व हसू लागले.
" हे बघ ...आता मी आलेय तू आनंदाने वारीला जा .मी बघते सासूबाईना "तिने मुलीला ऑर्डर सोडली.
" कशाला जायचे वारीला..? जे तिथे जाऊन शिकायचे जो आनंद मिळवायचा तो इथेच तर मिळाला मला..विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचा आनंद इथेच पहिला मी. तूही घर सांभाळायचे मॅनेजमेंट करतेस ना ते मी बाहेर वारकऱ्यांकडे का शिकू ..? आज खूप काही शिकले मी आजीच्या सोबत . तूच जाऊन ये वारीला मी संभाळीन आजीला.आजपासून तू एकटी नाहीस मीही आहे तुझ्या मदतीला"असे बोलून आजीला घट्ट मिठी मारली.
आजीने उशी खालून जुन्या चांदोबाचे पुस्तक काढून तिच्या हाती दिले. ते पुस्तक पाहताना डोळ्यातील अश्रू कधी त्यावर पडले हे तिलाच कळले नाही .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment