Tuesday, July 30, 2024

आवेशम

Aavesham
आवेशम
जे फहाद फासीलचे फॅन आहेत त्यांनी हा चित्रपट जरूर पहावा. यावेळी तो विनोदी भूमिकेत आहे. 
अजू, बीबी, आणि शांतहन ही तरुण मुले केरळहून इंजिनियरिंग करायला बंगलोरला येतात.होस्टेलमध्ये मजा करायला मिळणार नाही म्हणून खाजगी हॉस्टेलमध्ये राहतात. ते ज्युनियर असल्यामुळे रॅगिंग होणारच. तिकडच्या स्थानिक गुंडांचे पाठबळ असलेली सिनियर विद्यार्थ्यांची टीम त्यांचे रॅगिंग करते. आता त्यांना विरोध करायचा तर त्यांच्यापेक्षा मोठे गुंड शोधायचे असे तिघेही ठरवितात . मग वेगवेगळ्या बार मध्ये त्यांना पाहिजे तसल्या गुंडांचा शोध सुरू करतात .
एका बारमध्ये रंगा अजूकडून सिगारेट पेटवितो आणि हसून त्याच्या डोक्यावर टपली मारून निघून जातो.रंगा सोन्याने मढलेला, पांढरे शुभ्र कपडे घातलेला ,डोळ्यावर गॉगल चढविलेला  एक सडपातळ माणूस आहे. तो कुठल्याही नजरेने गुंड वाटत नाही .त्याला रिल्स बघण्यातच इंटरेस्ट आहे. पण पूर्ण भरलेल्या बारमध्ये त्याच्यासाठी एक टेबल राखून ठेवले जाते.त्याची ही वट पाहून तिघेही त्याच्याशी मैत्री करायला जातात आणि रंगालाही ते तिघे आवडतात. तो आणि त्याचे साथीदार त्यांना दारू पाजतात.त्यांना हॉस्टेलमधून काढल्यावर रंगा आपल्या घरी घेऊन येतो.
रंगाविषयी बऱ्याच अफवा आहेत.तो स्वतः कुणावर हात उचलत नाही .त्याने आपल्या बॉसला फसविले होते.भावाचा खून करून घरच्या किचनमध्ये गाडले आहे.अश्या बऱ्याच काही.
तिघेही रंगाच्या पाठिंब्यामुळे वाहवत जातात आणि प्रायमरी परीक्षेत नापास होतात. आता त्यांना रंगापासून सुटका हवीय. रंगाच्या वाढदिवसाला त्यांना रंगाविषयी ज्या ज्या अफवा आहेत त्या खऱ्या आहेत हे त्यांना कळते. आता रंगापासून आपली कशी सुटका होईल याचाच विचार ते करतात.
त्यांची रंगापासून सुटका होईल का ?? रंगाच्या विरुद्ध जो जाईल त्याचा जीव जाणार हे नक्की.
एक थ्रिलर कॉमेडी म्हणून आणि फहाद फासील साठी आवेशम हिंदी मध्ये हॉटस्टार वर पाहायला हरकत नाही. 

No comments:

Post a Comment