Saturday, July 6, 2024

मिर्झापुर 3

Mirzapur 3
मिर्झापुर 3
तुम्हाला जर मिर्झापुर १ आणि २च्या  दहशतीतून बाहेर पडायचे असेल तर मिर्झापुर 3 बघावा लागेल.कारण आधीच्या दोन्ही सिझनच्या मानाने हा तिसरा सिझन खूपच हलका सॉफ्ट आणि बऱ्याच दडपणातून मुक्त करणारा आहे.
अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीनभय्या आता जखमी होऊन गायब झालेला आहे तर मुन्ना मारला गेलाय.गजगामीनी उर्फ गोलू दीदी आणि गोविंद पंडित उर्फ गुड्डू भैय्या या दोघांच्या ताब्यात मिर्झापुर आले आहे.कालीनभय्याची पत्नी बिना आपल्या छोट्या मुलीसह त्या दोघांच्या आश्रयाखाली  त्रिपाठी भवनमध्येच राहतेय . तर मुन्नाची पत्नी माधुरी मुख्यमंत्री झालीय.
आता मिर्झापुरच्या गादीवर अधिकृतपणे कोण बसणार यावर चर्चा आहे. जौनपूरचा शरद शुक्लाही या स्पर्धेत आहे. गुड्डू पंडितने भर बाजारात शरद शुक्लाच्या वडिलांची हत्या केली होती . त्याचा रागही शरदच्या डोक्यात आहे. शरदनेच कालीनभैय्याला गुडडूच्या गोळीबारातून वाचवून स्वतःच्या घरी आणून ठेवले आहे .
बहुबलीच्या बैठकीत पूर्वांचलची सत्ता कोणाला मिळणार हे बहुमताने ठरेल .मुख्यमंत्री माधुरीने उत्तर प्रदेश भयमुक्त करण्याची योजना आखली आहे यासाठी गुड्डू आणि गोलूला ठार करायाची तिची प्राथमिकता  आहे .याकामी शरद शुक्ला तिला मदत करतोय.
अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीनभय्या याला संपूर्ण सिझनमध्ये काहीच भूमिका नाही . तो चौथ्या भागात येतो आणि नंतर प्रत्येक भागात काही मिनिटे दिसतो .तो फक्त शेवटच्या भागात शेवटची काही मिनिटे आपले खरे रूप दाखवतो .
ज्यांनी पाहिले दोन सिझन पाहिले आहेत त्यांना हा सिझन फारसा पचनी पडणार नाही. कारण दोन्ही सिझनमध्ये कालीनभय्या आपल्या फुल पॉवरमध्ये होते.ते थंड रक्ताने अतिशय शांतपणे आपला डाव खेळत होते. त्याचा पडद्यावरचा वावर आपला श्वास रोखत होता.तितकीच टक्कर त्यांना गोलू आणि गुड्डूने दिली होती.
पहिल्या दोन्ही सिझनमध्ये  भरपूर रक्तपात , हिंसाचार होता. पण तिसऱ्या सिझनमध्ये राजकारणाचे खेळ आहेत.सर्वच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात .उत्तर प्रदेशची सत्ता आणि बाहुबली आपल्या हातात ठेवायचे प्रयत्न सर्वच राजकारणी नेते करतायत.
तिसऱ्या सिझनमध्ये सगळेच गोंधळल्यासारखे वाटतात .गुड्डूकडे प्लॅन्स नाहीत.तर शरद शुक्लाचे डावपेच फसतात. मुख्यमंत्रीही गुड्डूला ताब्यात घेऊ शकत नाहीत .
या सीझनमध्ये पहिल्या दोन सिझनचेच प्रमुख  कलाकार आहेत. पंकज त्रिपाठी ,अली फझल, श्वेता त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत .तर लिलीपुट ,विजय वर्मा, अंजुम शर्मा, इशा तलवार यांनी योग्य साथ दिलीय.
पहिल्या दोन सिझनची भीती तिसरा सिझन कमी करतो हे नक्की .बघू पुढच्या सीझनमध्ये काय घडेल ??
प्राईम व्हिडिओवर हिंदीमध्ये आहे.

No comments:

Post a Comment