Friday, November 8, 2024

Vettaiyan .. The Hunter

Vettaiyan .. The Hunter
वेट्टाईन
रजनीकांतचा चित्रपट हा फक्त रजनीकांतसाठीच बनलेला असतो. संपूर्ण चित्रपट फक्त त्याच्याच इशाऱ्यावर चालतो.
भारतात सरकारी शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे.सरकारी शाळेत शिक्षक नाहीत.सोयीसुविधा अपुऱ्या आहेत म्हणून ही मुले पुढे येऊ शकत नाहीत. हीच मुले पुढे गुन्हेगारी क्षेत्रात आणि अनैतिक कामे करू लागतात.काही मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.तर काही मुलांचे गुन्हेगारी व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहेत.
पोलीस अकॅडमीमध्ये जस्टीस डॉ. सत्यदेव व्याख्यान देतात.चांगला पोलीस अधिकारी कसा असतो ,भारतीय न्याय व्यवस्था यावर त्यांचे व्याख्यान असते. पोलीस आणि जनतेने न्याय करू नये तर ते काम न्यायव्यवस्थेचे आहे  याबाबत ते नेहमी आग्रही आहेत.
एसपी अथीयन एन्काऊंटर स्पेशालिस्ट आहे. त्याला हंटर नावाने सर्व ओळखतात.त्याला असे वाटते गुन्हेगारांना ताबडतोब शिक्षा मिळाली पाहिजे.एन्काऊंटर केले तर गुन्हेगारीला आळा बसेल. डॉ. सत्यदेव नेहमीच त्याला कायद्याच्या कचाट्यात पकडायचा प्रयत्न करतात पण हा दरवेळी त्यांना पुरून उरतो.
बॅटरी एसपी अथीयन खबरी आणि अनधिकृत मदतनीस आहे.तो कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहे.छुपे कॅमेरे ,ड्रोन याचा तो व्यवस्थित वापर करतो.अनेक गुन्हे शोधायला त्याने अथीयनला मदत केली आहे.
सरन्या तामिळनाडूतील छोट्या गावात सरकारी शाळेत शिक्षिका आहे. शाळेत मोठ्या प्रमाणात ड्रग साठविले आहे याची माहिती ती निनावी पत्राद्वारे एसपी अथीयनला देते आणि मोठे प्रकरण उघडकीस येते पुढे तिची बदली चेन्नईत मोठ्या शाळेत होते.
सर्व काही सुरळीत चालू असताना सरन्याची हत्या होते. स्पेशल टीम त्या हत्येचा तपास करतेय .काही दिवसांनी गुणा नावाच्या युवकाला पकडले जाते.सर्व पुरावे गुणाच्या विरुद्ध आहेत.जनतेकडून गुणाचे एन्काऊंटर करा अशी मागणी होते आणि त्यातच गुणा पोलिसांच्या तावडीतून पळून जातो. गुणाचे एन्काऊंटर करा असा आदेश वरून येतो आणि एसपी अथीयनला बोलावले जाते.अथीयन दोन दिवसात गुणाचे एन्काऊंटर करतो.
पण सर्व इथेच संपत नाही .डॉ .सत्यदेवची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केले जाते आणि तो गुणा निर्दोष आहे हे एसपी अथीयनसमोर सिद्ध करतो.
सत्य पाहून अथीयन हादरतो आणि तो खरा खुनी शोधण्याचा निश्चय करतो.तो खऱ्या खुन्यापर्यंत  पोचतो आणि त्याची बदली  आर्थिक गुन्हे शाखेत केली जाते.
एसपी अथीयन आता त्या खुन्याचे आर्थिक गुन्हे शोधून काढायचे ठरवितो. यामार्गाने तो खऱ्या खुन्याला कोर्टात उभे करेल का ? 
हा चित्रपट जिथे संपतो असे वाटते तेव्हा वेगळी कलाटणी घेतो.
सरन्याची हत्या करण्यामागचा हेतू पाहून आपण चक्रावून जातो.तो कशाप्रकारे घडवला जातो .कसे निरपराधाला  खुनात अडकवले जाते हे पाहण्यासारखे आहे .
एसपी अथीयनच्या प्रमुख भूमिकेत सर्वांचा लाडका सुपरस्टार रजनीकांत आहे.तर जस्टीस डॉ. सत्यदेवच्या छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन आहे.
बॅटरीच्या भूमिकेत फहाद फसीलने नेहमीपेक्षा वेगळी भूमिका केली आहे.
चित्रपट पाहताना आपण रजनीकांतचा चित्रपट पाहतोय त्यामुळे समोर काय घडतेय त्यावर फारसा विचार न करता पहावा.
चित्रपट हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.

Wednesday, November 6, 2024

लेवल क्रॉस

LEVEL CROSS
लेवल क्रॉस
तीन पात्रात एक चांगला सस्पेन्स थ्रीलर चित्रपट बनू शकतो का ?? तो ही फक्त संवाद आणि एकाच लोकेशनवर ?? मग त्यासाठी तुम्हाला साऊथचा लेवल क्रॉस पहावा लागेल.
ते कोणते राज्य आहे याची आपल्याला कल्पना नाही.पण  तो भाग ओसाड निर्जन आणि वैराण आहे.नजर जाईल तिथपर्यंत चिटपाखरूही दिसत नव्हते.त्या भागात रस्ता आहे पण रस्त्यावरून एकही गाडी जात नव्हती.होय रस्ता होता, तसाच रेल्वे ट्रॅकही होता. दिवसभरात कधीही एखादी ट्रेन आणि मालगाडी जायची.त्यामुळे त्या रस्त्यावर क्रॉसिंगही होते.
रघू त्या क्रॉसिंगचा गार्डमन आहे. रेल्वे येण्याची वेळ झाली की तो युनिफॉर्म घालायचा. आणि क्रॉसिंग बंद करायचा .येणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून परत क्रॉसिंग उघडायचा.गेली अनेक वर्षे तो हेच काम करतोय. त्याच्या सोबतीला एक गाढव आहे.त्याचे घर क्रॉसिंगजवळच आहे.अनेक वर्षे त्यानेही कोणत्याही माणसाला तिथे पाहिले नाही.
पण त्या दिवशी थोडे विचित्र घडले.त्याने हिरवा झेंडा दाखविलेली ट्रेन पास झाली आणि थोड्याच अंतरावर कोणीतरी त्या ट्रेनमधून उडी मारली. रघूने पहिल्यांदा दुर्लक्ष केले पण त्याला नंतर राहवले नाही. तो तिथे गेला आणि आश्चर्यचकित झाला. ट्रेनमधून पडलेली ती व्यक्ती एक सुंदर तरुणी होती.
रघू तिला घरी घेऊन आला .बावळट दिसत असला तरी रघू सुशिक्षित होता. 
त्या तरुणीने शुद्धीवर येताच आपली कहाणी त्याला सांगितली. तिचे नाव चैताली असून ती मानसोपचारतज्ञ आहे.आपला नवरा मानसिक रुग्ण आहे आणि त्याच्यापासून बचाव करायला ट्रेनमधून उडी मारली असे सांगते.रघू तिच्यावर विश्वास ठेवतो.पण तिलाही रघूचे रहस्य कळते आणि ती हादरते.
अचानक चैतालीचा पती झिंचो  रघू समोर उभा राहतो. तो ही आपली कहाणी त्याला सांगतो.
दोघांच्याही कथा ऐकून रघु हैराण होतो ?
शेवटी रघू कोणाच्या बाजूने निर्णय घेईल. ?
रघुचे अस्तित्व काय आहे ?
चित्रपट आपली उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरतो आणि अनपेक्षित शेवट करतो.
विविध विषय आणि त्यावर उत्कृष्ट सादरीकरण हे साऊथच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे.त्यांना वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात आणि म्हणूनच आज ते बॉलिवूडपेक्षा जास्त लोकप्रिय आणि यशस्वी आहेत.
असिफ अली रघूच्या मुख्य भूमिकेत आहे.वेडसर भासणारा पण प्रामाणिकपणे बोलणारा रघू सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
अमला पॉलने चैताली रंगवली आहे.
शरफ धीनने चैतलीचा पती झिंचोची भूमिका केली आहे.
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Tuesday, November 5, 2024

लठ्ठी चार्ज

Laththi charge
लठ्ठी चार्ज 
पोलीस कॉन्स्टेबल मुरुगनाथम गेल्या सहा महिन्यांपासून निलंबित आहे.एका निरपराधी नागरिकाला मारहाणीचा आरोप त्याच्यावर होता. पण मुरुगनाथम प्रामाणिक आणि शूर कॉन्स्टेबल आहे.त्याच्या जुन्या कामगिरीची आठवण ठेवून वरिष्ठांच्या शिफारशीवरून त्याला परत नोकरीत घेतले.
मुरुगनाथमची बायको नर्स आहे तर दहा वर्षाचा मुलगा आहे.मुलाला दम्याचा आजार आहे. सहा महिन्यांपूर्वी एका मुलीच्या बलात्काराच्या आरोपावरून एका संशयिताला अटक केली जाते आणि मुरुगनाथम त्याला मारहाण करतो.पण तो संशयित निरपराध असतो.त्यामुळेच त्याला निलंबित केले होते.पण पुन्हा नोकरीत आल्यावर तो या प्रकरणाची चौकशी करतो आणि खऱ्या आरोपीला शोधून काढतो.
वेलाई शहरातील माफिया डॉन सुराचा मुलगा आहे.एके दिवशी तो एका पोलीस ऑफिसरच्या मुलीची छेड काढतो.तो अधिकारी कायद्याने वेलाईचे काही करू शकत नाही म्हणून अपहरण करतो आणि मुरुगनाथनला बोलावून त्याला लाठीने फोडून काढतो.
वेलाई हॉस्पिटलमध्ये सुराला मुरुगनाथनचा शोध घ्यायला सांगतो.सुराची सगळी यंत्रणा मुरुगनाथनच्या मागे लागते.शेवटी वेलाई आणि सुरा त्याला एका जुन्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत अडकवतात. दुर्दैवाने मुरुगनाथनचा मुलगा ही त्याच्यासोबत तिथे अडकतो.
आता सुरा वेलाई आणि त्यांची शेकडो माणसे मुरुगनाथनच्या मागे लागली आहेत.ह्या सर्वांचा सामना करून तो आपल्या मुलाला आणि स्वतःला वाचविण्यात यशस्वी होईल का ?? 
 चित्रपटाचा पूर्वार्ध थोडा संथ आहे पण उत्तरार्ध मात्र प्रचंड हाणामारीने भरलेला आहे.त्या अर्धवट बांधकाम असलेल्या उंच इमारतीत मुरुगनाथन या सर्वांशी कसा लढा देतो ते अंगावर काटा आणते.
सुपरस्टार विशाल मुरुगनाथनच्या प्रमुख भूमिकेत आहे. 
जिओसिनेमावर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.