शॅडो मॅन... कोडी मॅकफॅदियेन
अनुवाद ... उदय भिडे
मेहता पब्लिशिंग हाऊस
स्मोकी बॅरेट एफबीआय च्या विकृत खुनी विभागात काम करते. अॅलन ,कॅली, जेम्स तिच्या टीममधील विश्वासू सहकारी. पण काही महिन्यांपूर्वी स्मोकीवरच एका विकृत खुन्याने हल्ला केला.तो खुनी इतका विकृत होता की त्याने तिच्यावर पाशवीपणे नवऱ्यासमोरच बलात्कार केला. नवऱ्याला बेदम मारहाण करून ठार मारले.तिच्या मुलीलाही ठार मारले.तर स्मोकीचा चेहरा चाकूने विद्रुप केला.
या घटनेने स्मोकी हादरून गेलीय. तिचे मानसोपचारतज्ञाकडे उपचार चालू आहेत.आता तर ती गनही उचलू शकत नाही.लोक तिच्या विद्रुप झालेल्या चेहऱ्याकडे पाहत राहतात. ती आपल्या सहकार्याना भेटत नाही .रात्री किंचाळत उठते.
पण आता ती सावरतेय. ती आपल्या सहकाऱ्यांना भेटून आलीय.पण त्याच रात्री कॅलीने तिला फोन केला. स्मोकीच्या जिवलग मैत्रिणीचा खून झालाय.खुन्याने अतिशय क्रूरपणे तिची हत्या केलीय आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलीला त्या प्रेतासोबत बांधून ठेवलंय. तीन दिवसांनी ही गोष्ट उघडकीस आलीय.खुन्याने आपल्या चिट्ठीत स्मोकीचा उल्लेख केलाय म्हणून कॅलीने फोन करून तिला ही गोष्ट नाईलाजाने सांगितली.
खरे तर डिपार्टमेंटने तिला कामावर रुजू होण्याची परवानगी दिली नाही .तरीही स्मोकी घटनेच्या जागी जाते. तो खुनी विकृत आहे.त्याच्याकडे स्मोकी आणि तिच्या सहकाऱ्यांची पूर्ण माहिती आहे.तो त्यांना पुढची शिकार कोण याचीही हिंट देतोय.
स्मोकी स्वतःला सावरून त्या खुन्याच्या मागे लागेल .तिच्या सहकाऱ्यांच्या जीवाला ही धोका आहे.खुनी नेहमीच त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे आहे.पण तो काहीतरी चूक करेलच याची स्मोकीला खात्री आहे.
No comments:
Post a Comment