Friday, November 8, 2024

Vettaiyan .. The Hunter

Vettaiyan .. The Hunter
वेट्टाईन
रजनीकांतचा चित्रपट हा फक्त रजनीकांतसाठीच बनलेला असतो. संपूर्ण चित्रपट फक्त त्याच्याच इशाऱ्यावर चालतो.
भारतात सरकारी शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे.सरकारी शाळेत शिक्षक नाहीत.सोयीसुविधा अपुऱ्या आहेत म्हणून ही मुले पुढे येऊ शकत नाहीत. हीच मुले पुढे गुन्हेगारी क्षेत्रात आणि अनैतिक कामे करू लागतात.काही मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.तर काही मुलांचे गुन्हेगारी व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहेत.
पोलीस अकॅडमीमध्ये जस्टीस डॉ. सत्यदेव व्याख्यान देतात.चांगला पोलीस अधिकारी कसा असतो ,भारतीय न्याय व्यवस्था यावर त्यांचे व्याख्यान असते. पोलीस आणि जनतेने न्याय करू नये तर ते काम न्यायव्यवस्थेचे आहे  याबाबत ते नेहमी आग्रही आहेत.
एसपी अथीयन एन्काऊंटर स्पेशालिस्ट आहे. त्याला हंटर नावाने सर्व ओळखतात.त्याला असे वाटते गुन्हेगारांना ताबडतोब शिक्षा मिळाली पाहिजे.एन्काऊंटर केले तर गुन्हेगारीला आळा बसेल. डॉ. सत्यदेव नेहमीच त्याला कायद्याच्या कचाट्यात पकडायचा प्रयत्न करतात पण हा दरवेळी त्यांना पुरून उरतो.
बॅटरी एसपी अथीयन खबरी आणि अनधिकृत मदतनीस आहे.तो कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहे.छुपे कॅमेरे ,ड्रोन याचा तो व्यवस्थित वापर करतो.अनेक गुन्हे शोधायला त्याने अथीयनला मदत केली आहे.
सरन्या तामिळनाडूतील छोट्या गावात सरकारी शाळेत शिक्षिका आहे. शाळेत मोठ्या प्रमाणात ड्रग साठविले आहे याची माहिती ती निनावी पत्राद्वारे एसपी अथीयनला देते आणि मोठे प्रकरण उघडकीस येते पुढे तिची बदली चेन्नईत मोठ्या शाळेत होते.
सर्व काही सुरळीत चालू असताना सरन्याची हत्या होते. स्पेशल टीम त्या हत्येचा तपास करतेय .काही दिवसांनी गुणा नावाच्या युवकाला पकडले जाते.सर्व पुरावे गुणाच्या विरुद्ध आहेत.जनतेकडून गुणाचे एन्काऊंटर करा अशी मागणी होते आणि त्यातच गुणा पोलिसांच्या तावडीतून पळून जातो. गुणाचे एन्काऊंटर करा असा आदेश वरून येतो आणि एसपी अथीयनला बोलावले जाते.अथीयन दोन दिवसात गुणाचे एन्काऊंटर करतो.
पण सर्व इथेच संपत नाही .डॉ .सत्यदेवची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केले जाते आणि तो गुणा निर्दोष आहे हे एसपी अथीयनसमोर सिद्ध करतो.
सत्य पाहून अथीयन हादरतो आणि तो खरा खुनी शोधण्याचा निश्चय करतो.तो खऱ्या खुन्यापर्यंत  पोचतो आणि त्याची बदली  आर्थिक गुन्हे शाखेत केली जाते.
एसपी अथीयन आता त्या खुन्याचे आर्थिक गुन्हे शोधून काढायचे ठरवितो. यामार्गाने तो खऱ्या खुन्याला कोर्टात उभे करेल का ? 
हा चित्रपट जिथे संपतो असे वाटते तेव्हा वेगळी कलाटणी घेतो.
सरन्याची हत्या करण्यामागचा हेतू पाहून आपण चक्रावून जातो.तो कशाप्रकारे घडवला जातो .कसे निरपराधाला  खुनात अडकवले जाते हे पाहण्यासारखे आहे .
एसपी अथीयनच्या प्रमुख भूमिकेत सर्वांचा लाडका सुपरस्टार रजनीकांत आहे.तर जस्टीस डॉ. सत्यदेवच्या छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन आहे.
बॅटरीच्या भूमिकेत फहाद फसीलने नेहमीपेक्षा वेगळी भूमिका केली आहे.
चित्रपट पाहताना आपण रजनीकांतचा चित्रपट पाहतोय त्यामुळे समोर काय घडतेय त्यावर फारसा विचार न करता पहावा.
चित्रपट हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.

No comments:

Post a Comment