Friday, January 5, 2018

कॉन्ट्रॅक्टर

गोष्ट काल्पनिक आहे . कोणाचाही संबंध यात येत नाही .
आज सकाळीच त्याला फोन आला.नंबर अर्थातच अनोळखी होता.पण त्याची त्याला पर्वा नव्हती.तो कधीच कोणाचे नंबर सेव्ह करीत नव्हता. सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात जे वातावरण होते त्यावरून आपल्याला असे फोन येणारच याची त्याला खात्री होतीच.
"एकूण दीडशे माणसे.पन्नास रेल्वे स्टेशन.पन्नास हायवेआणि पन्नास गल्लोगल्ली फिरायला".फोनवरील व्यक्तीने त्याची अपेक्षा सांगितली.
हा फक्त ओके म्हणाला.पैसे हवालामार्फत यांच्याकडे पोचणारच होते. फोन ठेवल्यावर त्याने इतराना योग्य त्या सूचना केल्या  आणि आपले काम संपविले.
त्याला आपले जुने दिवस आठवले . साधारण पंचवीस वर्षांपूर्वी काळ होता .नुकताच पदवीधर होऊन बाहेर पडला होता तो.... इतरांसारखी त्याची ही स्वप्ने होतीच.पण बाहेरच्या जगाचे आणि बेकरीचे चटके बसून तो जमिनीवर आला.एके दिवशी टपरीवर चहा पित उभा असताना समोरून कोणतातरी मोर्चा चालला होता . त्यातील एक माणूस झेंडा घेऊन त्याच्याकडे आला आणि म्हणाला "येतोस का.. ??  ह्याने पटकन नकार दिला.मग त्याने खिशातून शंभरची नोट काढून त्याच्या हातात दिली."तासभर थांब"..असे म्हणून झेंडा हातात दिला.
"तासाचे शंभर ..."??? तो काही न बोलता त्याच्या बरोबर घोषणा देत चालू लागला. तासाभराने मोर्चा संपला तसा तो माणूस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला "उद्या येशील का ..??? दोनशे देईन.सांगेन तिथे चार दगड मारून पळून जायचे".
नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्याने अशीच कामे करायचे ठरविले . रोज कुठेना कुठे तरी मोर्चा ,दंगल सभा  चालूच असायच्या.तिथे हजर राहिले की दोन तीनशे रुपये मिळायचेच.हळू हळू यात त्याचा जम बसू लागला.त्याने स्वतः माणसे पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले .मुंबईत बेकरांची कमी नाही आणि पैश्यांचीही कमी नाही हे त्याने अनुभवले होतेच.
आज गेली पंचवीस वर्षे तो या क्षेत्रात अनुभवी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत होता.नुसत्या एक फोनवर हजार माणसे गोळा करायची ताकद होती त्याच्यात. जोपर्यंत भारतात लोकशाही आहे तोपर्यंत आपल्या धंद्याला मरण नाही हे माहीत होते त्याला .इथे सरळमार्गी जाणाऱ्यांना ह्या गोष्टीत इंटरेस्ट नसतो म्हणून तर आमच्यासारख्यांची गरज भासते.
अचानक फोनच्या आवाजाने तो भानावर आला . समोरच्या व्यक्तीची मागणी त्याने नोंद केली आणि पुन्हा कामाला लागला .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment