Saturday, January 20, 2018

भास

पूर्वी बरेचसे कारखाने गावाबाहेरील मोकळ्या जागेत उभारले जायचे त्यामुळे तेथे एक गूढ वातावरण निर्माण व्हायचे.आजूबाजूला ओढा किंवा नाला तर स्मशानही असायचे.हळूहळू वस्ती वाढू लागली आणि तिथे शहरे निर्माण झाली .मग त्यातील गुढपणा कमी झाला.तरीही अधूनमधून काही गूढ गोष्टी सांगितल्या जातातच.
मी एके ठिकाणी कामाला होतो त्या फॅक्टरीच्या बाजूला मुसलमानांचे कब्रस्थान होते.आमच्या बॉयलर हाऊसमधून ते दिसायचे . रात्री तिथे खूप भीती वाटायची.आमचे ऑपरेटर जागे असायचे.नुकतेच एका ऑपरेटरचे निधन झाले होते .त्याचे जोडीदार कधी कधी सांगायचे "अरे ....डुलकी लागली की हा कानाजवळ येऊन ओरडतो. झोपू नकोस बॉयलर चालू आहे .कधी कधी कानाजवळ आवाज येतो पाणी चेक कर". खरेखोटे देव जाणे पण मला कधी त्रास झाला नाही.
त्यानंतर मी दुसऱ्या कंपनीत गेलो. तिथेही बाजूला पारशी लोकांची स्मशानभूमी आहे . तिथेही मला कधीच प्रेत दिसले नाही.पण कंपनीत एक स्त्री रात्री राऊंड मारते अशी माहिती होती . कधी कधी रविवारी मी नाईट शिफ्ट ला एकटा असलो की कॉम्प्रेसर रूममध्ये जाऊन झोपायचो . त्यावेळी मध्येच कोणतरी बाजूने गेल्याचा भास व्हायचा . कधी बारीक पैंजनाचा आवाज . मग मी उठून माझ्या जाग्यावर येऊन झोपायचो.गेटवर चहा पिता पिता सिक्युरिटी गार्ड सांगायचे त्या स्त्री बद्दल.वंजारी समाजातील ती स्त्री मागच्या गेटमधून आत येते. मग कॉम्प्रेसर रूममधून मागे पाण्याच्या टाकीवर जाते .तिथून ती ऑफिस बिल्डिंगमध्ये जाते मग गच्चीवर आणि परत खाली येऊन मागे फिरते .योगायोग असा की त्या त्या  ठिकाणी  काहीजणांनी तिला पाहिले आहे .
मला भास बऱ्याच वेळा झालेत पण प्रत्यक्षात त्या स्त्रीला पाहिले नाही . कॅबिनमध्येही एक दोनदा भीतीदायक प्रसंगाला सामोरे जावे लागले . खुर्चीवर झोपलो असताना छातीवर कोणतरी प्रचंड दाब देतोय असे जाणवले . तोंडातून आवाजही फुटत नव्हता तर डोळेही उघडू शकत नव्हतो.हातपाय झाडून ते  ओझे हटविले आणि डोळे उघडले तर समोर कोणी नाही . हातापायांची थरथर चालू झाली होती .असे नक्की का होते हे अजूनही कळले नाही.
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment