Thursday, January 18, 2018

फुटपाथ

शेजारचा तन्मय हातात वही पुस्तक घेऊन घरात शिरला तेव्हाच मी चरफडलो . आता हा वेगवेगळे प्रश्न विचारून माझे डोके खाणार हे नक्की ....... मी हसरा चेहरा करून तयारीत बसलो .
"भाऊकाका .......मला हे वाहतुकीचे नियम समजावून सांगा"...एक हाताने वही पुस्तक आणि दुसऱ्या हाताने पॅन्ट सावरत त्याने मला आज्ञा केली.शेवटी पाचवीतल्या मुलाला शिकवायची जबाबदारी माझ्यावर पडलीच. "बोल ...."मी वैतागून विचारले.
"चालताना नेहमी फुटपाथचा वापर करावा"..त्याने वाचून सांगितले.
"एकदम बरोबर.." मी ठामपणे बोललो.
" ते ठीक आहे हो... .पण फुटपाथ म्हणजे नक्की काय ..?? कुठे असतो तो.." ??  त्याने निरागस चेहरा करून माझ्याकडे पाहिले.
"अरे तुला फुटपाथ माहीत नाही...?? रस्त्याच्या बाजूला माणसांना चालण्यासाठी जी जागा असते त्याला फुटपाथ म्हणतात".
"चला दाखवा मला प्रत्यक्षात ...". तोही आता हट्टाला पेटला.
"च्यायला......!! एव्हडा हट्ट बापाकडे कधी केलास का ??? मी मनात म्हणत त्याला घेऊन बाहेर पडलो.
घरासमोरच्या फुटपाथपाशी त्याला घेऊन आलो आणि म्हणालो" हा बघ ...???
त्याने परत विचारले" हा कुठे ..?? इथे तर सर्व झोपड्या आहेत. समोर फेरीवाले बसलेत . तो बघा भाजीवाला..आई नेहमी त्याच्याकडूनच भाजी घेते .इथे कुठे माणसे चालतात .सर्वजण खालून रस्त्यावरून चालतात . तो बघा तिथे एक माणूस चक्क आंघोळ करतोय आणि समोर तर 4/5 बाईक पार्क केल्यात . ह्याला फूटपाथ म्हणता तुम्ही भाऊकाका..??
मी काहीच न सुचून शांत बसलो.थोड्यावेळाने म्हणालो" अरे हाच फुटपाथ आहे ..पण काहीजणांनी अतिक्रमण केलेय.
"मग आपण कुठून चालायचे ..?. नियम कसे पाळायचे.अपघात झाले की जबाबदार कोण "?? त्याने सहज स्वरात हा प्रश्न विचारला .
खरेच.... हे चित्र तर सगळ्या फुटपाथवर आहे . माझ्या ऑफिससमोरच्या फुटपाथवरही असेच फेरीवाले बसलेले असतात. तर काही ठिकाणी ते खणलेले असतात. गटारे उघडी असतात.तर काही ठिकाणी मुले  क्रिकेटही खेळतात आणि माणसे रस्त्यावरून चालत असतात.मागून येणाऱ्या गाड्या चुकवताना त्यांची कसरत चालली असते . आपण मुंबईकर नेहमी फास्ट जीवन जगत असतो या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही . पण आज एक पाचवीतल्या मुलाने माझ्यासमोर हे भयानक सत्य उघड केले होते . मी काही न बोलता परत त्याला घरी घेऊन आलो.
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment