Monday, January 22, 2018

वंदना

"हाय केके ...." !! बऱ्याच वर्षांनी कानावर तो परिचित आवाज पडला आणि माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. मी चिडून मागे पाहिले तर तीच होती.चेहऱ्यावर छद्मी हास्य ठेवून माझ्याकडे बघत होती.ओळख झाल्यापासून केके म्हणणारी ती एकमेव. मला राग येतो हे माहीत असूनही तिने ते थांबविले नव्हते.
वंदना ...माझी बालपणापासूनची मैत्रीण . दिसायाला साधारण ,अनाकर्षक .पण आपल्या चेहऱ्याची कसर तिने बोलण्यात,लिहिण्यात भरून काढली.कॉलेजमधील वक्तृत्व ,वादविवाद स्पर्धेत भाग घेऊन आपल्या ज्ञानाचा वापर करून बक्षिसे मिळवायची.गेली कित्येक वर्षे आमचा कॉन्टॅक्ट नव्हता अर्थात मला त्याचे कधीही दुःख झाले नाही.मी आज इन्कमटॅक्स ऑफिसमध्ये कामासाठी आलो होतो.तेव्हा तिने मला पाहून हाक मारली.
"अरे वंदना मॅडम .... मीही उलट उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तिने तो उडवून लावला,
"इकडे कुठे ...?? माझ्या ऑफिसमध्ये ..?? भुवया उंचावत तिने प्रश्न विचारला .
मी आश्चर्यचकित झालो." तू इथे .."???
"हो ...मी इथेच ऑफिसर आहे ".असे बोलून माझे काम एक शिपायाकडे दिले आणि मला घेऊन केबिनमध्ये शिरली.
" बोल काय चालू आहे ..."मी विचारले.
"मस्त....दोन  नवरे ,एक मुलगी आणि दोन फ्लॅट.सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारी नोकरी" असे बोलून विषादाने हसली.
मी कपाळावर आठ्या आणल्या."अजूनही तुझे बोलणे सुधारले नाही का ..?? सरळ बोल आणि एक नवरा काय.... ?? सर्वाना एक नवरा ,एक बायको असते".
"पण मला दोन आहेत ना ..??? हा दुसरा . पाहिल्याशी घटस्फोट झालाय.. पण होता ना तो ??ती हसत म्हणाली.
" सरळ बोल ग".मी कॉफीचा घोट घेऊन म्हणालो.
"हे बघ केके.... मी तुम्हाला कधीच आवडत नव्हते हे माहीत आहे मला.विक्रम तर मान फिरवून जायचा . . तू बोलायचास तरी . कॉलेज संपल्यावर आम्ही दुसरीकडे राहायला गेलो .मला इथे नोकरी मिळाली पण सुंदर नसल्यामुळे लग्न लांबणीवर पडले . शेवटी आत्याने एक स्थळ आणले त्यांनी न पाहताच होकार दिला .मीही हो म्हणून लग्नाला उभी राहिले . लग्न झाल्यावर सासरी आले आणि काही दिवसात कळले की हे लग्न म्हणजे तडजोड आहे . माझ्या नवऱ्याचे दुसऱ्याच बाईबरोबर संबंध आणि तेही घरातच .माझ्या समोरच त्यांचे चाळे चालायचे .त्यांना वाटले हिच्यावर उपकारच केलेत लग्न करून . किती दिवस सहन करणार ,शेवटी चिडले दोघांना शिव्या देऊनच घराबाहेर पडले . पण मुलीचे लग्न केले आता तिची जबाबदारी नवऱ्यावर असा आपला समाज . घरचे ही घरात घेईना.गावात बोंबाबोंब  नवऱ्याला सोडलेली म्हणून ...समाजाने वाळीत टाकले .नशीब नोकरी होती . काही दिवस होस्टेलमध्ये राहिले .नंतर प्रयत्न करून ऑफिसचे घर  मिळाले . दोन वर्षे एकटीने काढली . खूप काही भोगले . असे वाटायचे परिस्थितीला शरण जावे पण पुन्हा नवऱ्याचे वागणे आठवायचे . नातेवाईकांची ,घरच्यांची बोलणी आठवायची आणि मन पेटून  उठायचे . नाही यांच्या नाकावर टिच्चून उभे राहायचे . काही वर्षांनी परिस्थिती निवळली .आई ,भाऊ शांत झाले मग पुन्हा येणे जाणे चालू झाले .तेव्हा दुसरे स्थळ आले . त्याला सर्व सांगितले आणि लग्नाला तयार झाले . त्याचेही दुसरे लग्न होते . मग एक मुलगी झाली . पण त्यानंतर त्याचेही वागणे बदलले . कधी तुसाडेपणे, हेकटपणे वागू लागला . मला काही कळेना का असे वागतोय . हळू हळू मुलींचेही कान भरू लागला .त्याची नोकरी सुटली म्हणून तो वेगवेगळे बिझनेस करू लागला . राजकारणात उडी घेतली. हे सगळे माझ्या नोकरीच्या जीवावर .मी दिवसभर ऑफिस . हा आणि मुलगी घरात . साहजिकच घरात दोन विरुद्ध एक असे प्रमाण.मी त्यांच्या न कळत एक फ्लॅट बुक केला . धोक्याची जाणीव झाली असे समज.मग एकदा घरी कडाक्याचे भांडण झाले . नवरा म्हणाला नीघ ..मुलगी शांतपणे पाहत होती . मी बॅग घेतली आणि निघाले . नवीन फ्लॅटमध्ये जाऊन राहिले .दोन दिवसात नवरा ,मुलगी वठणीवर आले . परत माफी मागून घरी घेऊन गेले .आता एक कळले तुमच्याकडे पैश्याचे आणि एक छपराचे पाठबळ असेल तर कसलीच भीती नाही . आता भांडण होत नाही आणि झाले तरी नवरा घर सोडून ज असे म्हणत नाही".
"तूला खरेच वाटते हा यावर हा उपाय आहे..." ?? मी विचारले .
"माहीत नाही ..."?? लहानपणापासून रुपावरून  खूप ऐकले आहे मी. माझा सतत वापर केला गेला असे वाटते मला . माझे ज्ञान ,वक्तृत्व ,लिखाण याकडे कोणी पहिलेच नाही . ही काय करणार आपले वाकडे.... ?? कोण विचारतोय हिला ..?? असेच वाटत होते सगळ्यांना .त्यामुळे मी घराबाहेर एकटी राहू शकते कळल्याबरोबर बहुतेकांची धाबी दणाणली. आणि मी कुरूप त्यामुळे इतरांसारखा धोका नाहीच.घरच्यांना कळले आता पैसे येणे बंद .काही बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागले . पण हरकत नाही . माझी पॉवर तरी दिसली . सध्यातरी ठीक आहे पुढे बघू."
इतक्यात शिपायाने माझ्या हातात पेपर आणून दिले . तिचा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करत तिचा निरोप घेतला
© श्री .किरण बोरकर

No comments:

Post a Comment