Tuesday, January 2, 2018

तिचेही थर्टी फर्स्ट

आज सकाळपासूनच ती खुश होती .सकाळीच त्यांचा फोन आला होता .कुठेतरी रात्री फिरायला जाऊया . मावळत्या वर्षाची शेवटची रात्र होती ती. 31 डिसेंम्बर . कधी नव्हे ती मुले ही तयार झाली होती.
मग रात्रीची तयारी करण्यातच गुंग होऊन गेली . अंथरुणातून सासूबाई कौतुकाने तिला न्याहाळत होत्या . मध्येच खुणा करून विचारूनही झाले ...क्या बात है ..?. तशी ती लाजली आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाबद्दल सासूला सांगितले. तीच तर तिची एकमेव जवळची मैत्रीण होती . आपली सर्व सुख दुःखे ती हक्काने तिला सांगायची .कधी कधी रागवायची सुद्धा .पण सासू आपल्या भावना डोळ्यातून व्यक्त करायची. त्यांची ही भाषा घरातील इतर कोणालाच कळायची नाही .पहिल्यांदा सासूचे सर्व करताना तिला खूप राग यायचा पण हळू हळू नकळत दोघींच्यात एक नातेच निर्माण झाले . आताही तिचे कारण ऐकून सासूने थम्स अपची खूण केली त्याबरोबर ती छानशी लाजली.
संध्याकाळी लवकर लवकर आवरून घेतले .सवयीनुसार सासुला काय काय केले ते सांगितले .इतक्यात मुले आली.त्यांचीही तयारी करून घेतली.
थोड्या वेळाने ते आले .आल्याआल्याच त्यांनी सर्वाना तयार व्हायचा हुकून सोडला . चहा पितापिता आईची चौकशी झाली . मग बरेच दिवसांनी मुले आणि ती समोर बसलीत पाहून त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या .लहानपणी कसे आईबाबा जत्रेला घेऊन जायचे .मग बाबा गेल्यावर आईने कशी बाबांची कमतरता भासू दिली नाही . जत्रेत आईचा हात सोडून गेलो तेव्हा आईचा चेहरा कसा झाला.मोठ्या रंगात येऊन सांगू लागले .त्याचे बोलणे ऐकून तिचा जीव कासावीत होऊ लागला .निघत निघत ती त्याला थांबा थोडावेळ म्हणून आत निघून गेली .अर्धा तास झाला तशी त्यांची घाई सुरू झाली .
आणि अचानक ती व्हीलचेअरवरून सासूबाईंना घेऊन आली . साधीच पण नवीन साडी तिच्या अंगावर खुलून दिसत होती . केसांचा अंबाडाही छान बांधला होता . पण अचानक इतक्या वर्षांनी ही कुठे नेतेय..? हे न समजून चेहऱ्यावरचे कावरेबावरे भाव ही स्पष्ट दिसत होते . मुलांना आणि त्यांना बसलेला धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
"हिला कशाला त्या गर्दीत ..?? कोण लक्ष देईल तिच्याकडे ...?? काही झाले तर... ?? त्याच्या प्रत्येक प्रश्नावर सासूबाईंचा चेहरा पडत होता.
" का ...?? तुम्ही लहान असताना असले प्रश्न याना नाही पडले ते ..?? यांनी कधीच हा विचार केला नाही. उलट बाबानंतर तिने तुम्हाला फिरायला नेण्याची परंपरा खंडित केली नाही . आताच तर फार कौतुकाने ही गोष्ट आम्हाला सांगत होतात .मग आता आपण त्यांना नेऊ.मी संभाळीन त्यांना . तशीही मला सवय आहेच . केवळ म्हातारी झाली . काही हालचाल करता येत नाही म्हणून त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा का.. ?? त्यांनी हा विचार केला नाही तर आपण का करावा .."?? बोलता बोलता तिने सासूबाईंच्या खांद्यावर हात ठेवले होते .
एक क्षणात वातावरण गंभीर झाले . मुले एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली .ते हसले मुलांकडे पाहून म्हणाले "चला रे ओला बुक करा आज आणि यापुढे आपण सर्वांनीच एकत्र बाहेर जायचे. नवीन वर्षाचा हा संकल्प समजा.
हातावर पडलेल्या गरम थेंबानी ती भानावर आली आणि पाहिले सासूबाई हातावर डोके ठेवून मुक्तपणे अश्रूंना वाट करून देत होती .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment