Monday, July 2, 2018

दादू

दादूला समोरून येताना पाहिले तसा मी उठलो .पण विक्रमने मला हात खेचून परत खाली बसविले.मग पुढे घडणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी विक्रमवर सोपवून मी शांत बसलो.दादू आमच्याकडेच येत होता. कारण विक्रमला पाहून चेहऱ्यावर पसरलेले समाधान आम्हाला स्पष्ट दिसले .
"बोला दादूशेठ ....?विक्रमने नेहमीच्या आवाजात विचारले आणि परत एका कटिंगची ऑर्डर अण्णाला दिली .मीही चान्स मारून एक नानकटाई काढून घेतली . "विक्रम... कोणी ओळखीचा फायनान्सर आहे का रे ...?? त्याने उत्सुकतेने विक्रमला विचारले.
" या क्षणी मी तुम्हाला फक्त कटिंग चहाच फायनान्स करू शकतो .नानकटाई आपल्या जबाबदारीवर खावीत"माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकून विक्रम म्हणाला .
अर्थात मला काही फरक पडणार नव्हताच .पण दादूला उत्सुकतेने विचारले "का रे फायनान्सर हवा ....?
"मी चित्रपट काढतोय माझ्या जीवनावर .....सहजपणे दादूने उत्तर दिले .
ते ऐकूनच आम्ही हबकलो.
"कारण कळेल का दादूमिया...?? आता विक्रम मूळ रुपात आला .
"हल्ली उठबस कोणीही आपल्या जीवनावर चित्रपट काढतो .माझेही आतापर्यंतचे जीवन रोमांचकारी ..धडाकेबाज ....आहे "तो जोशात म्हणाला.
"ते कसे बुवा....? माझा प्रश्न आलाच.
" बघा माझे बाबाही एक पक्षाचे कार्यकर्ते होते . मिलमध्ये ते त्यांच्या डिपार्टमेंटचे लीडर होते . त्यांनी कामगारांसाठी मारही खाल्ला आहे एकदा "
मी मान डोलावली .ह्याच्या बापाने रात्री कामावरून घरी येताना त्या केळे विकणाऱ्या बाईची छेड काढली आणि सर्वांनी त्यांना धुतला हे खरे कारण त्याला कुठे माहीत .....
"बरे अजून ..?? विक्रमचा प्रश्न .
"मीही लहानपणी कितीतरी मारामाऱ्या केल्या..... व्यसन लागली मला ... हातभट्टीच्या गुत्यावरही होतो ."त्याच्याकडे बहुतेक स्टोरी तयार होती .
"हे बाकी खरे ....तुझ्या आयुष्यात तू इतका मार खाल्ला आहेस की आपल्या एरियात कोणीच खाल्ला नसेल. आणि जी जी फुकट मिळेल  ती व्यसन  केलीस तू शेट्टीच्या बारमधील गिऱ्हाईकाच्या बाटलीत उरलेली दारू तू गोळा करून पियाचास ,त्याने फेकून दिलेल्या अर्धवट सिगारेटी ,विड्या तू पियाचास ते माहीत आहे मला..विक्रम हसत हसत म्हणाला .
दादू हळू हळू खुश होऊ लागला हे आम्हाला कळू लागले .
"आणि बायकांची किती लफडी आहेत माझी.. ?? असे म्हणत दादूने मला टाळी दिली .
"हो रे ....गल्लीतून जाणाऱ्या एकाही कचरावाल्या बाईला ,कामवाल्या बायकांना तू सोडले नाहीस.कितीजणी तुला पटल्या हा अभ्यासाचा विषय आहे .पण त्या दिवशी वनिता सांगत होती दादूला बाजारात एका बाईने कानफटात मारली ". विक्रम त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला.
"बघा ..! किती कीर्ती माझी ....."छाती पुढे करून दादू उत्तराला." शिवाय गणपती ,नवरात्रात मी नाटकांमधून कामे करतो.
च्यायला हेही खरे ..... गल्लीत सादर होणाऱ्याप्रत्येक नाटकात दादू आहेच की.रस्तावरून जाणार माणूस....कोपऱ्यात पेपर वाचणारा...,पोस्टमन अशी कित्येक कामे दादूने केली आहेत .
"पण दादू समाजसेवेचे काय ....? विक्रम हळूच म्हणाला .
"वहिनीला विचार ..कधीही काही आणायला हा दादू तयार असतो. त्या दिवशी मार्केटला जाऊन दोन कोंबड्या घेऊन आलो "दादूकडे उत्तर तयार होतेच. त्या कोंबड्याची कलेजी गायब होती . त्यावरून विक्रमने वनिताला किती शिव्या घातल्या असतील ते मलाच माहीत .
"या एरियात कोणताही नेता.. नगरसेवक ..येवो लोक मलाच बोलावतात . त्यांच्या चहापाण्याची सोय कोण करणार ....
"तसे नाही रे ....काहीतरी भरीव काम .. मी म्हटले .
मी लग्न केले हे मोठे काम नाही का.. ??? दादूने आम्हालाच उलट विचारले .तसे आम्ही अचानक शांत झालो . खरे आहे ...रात्रीअपरात्री कुठेही भटकणाऱ्या दादूला एक स्त्री लहान मुलीला घेऊन रेल्वे रुळाजवळ दिसली .त्याने तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि तिच्याशी लग्न ही केले .खरेतर त्या एका प्रसंगाने दादूची पापे धुतली गेली . बायको मुलीबद्दल जराही बोललेले दादूला चालत नाही .
"पण मग चित्रपटात शेवटी तुला सुधारलेले दाखवावे लागेल. तू सुधारला आहेस का ..???ते  ऐकून दादू विचारात पडला ."हे सुधारणे म्हणजे नक्की काय ...?? मुळात मी बिघडलेला कुठे होतो ....??? विक्रमने काही न बोलता अण्णाला पैसे दिले. हात जोडून दादूला नमस्कार केला  आणि मला निघायची खूण केली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment