Sunday, July 8, 2018

उपाय

रात्री उशिराच कुशल घरी आला. नुकतेच त्याच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले होते.
कुशल एक मोठ्या कॉर्पोरेट कंपनीतमोठ्या पोस्टवर कामाला होता. त्यामुळे कामावरच जास्त वेळ जात होता. मग जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मित्रांसोबत दोन पेग मारायचा.तसेही ऑफिसच्या पार्ट्या ,सेमिनार सतत चालू असायचे. लग्न मात्र त्याने गावाकडची मुलगी पाहूनच केले होते . शहरातील मुलींना आपले लाईफ पटणार नाही किंवा त्याही आपल्याप्रमाणेच बिझी असतील एकमेकांना वेळ दिला नाही तर चिडचिड होईल  म्हणून टाळले होते .
करिष्मा शिकलेली होती आणि गावात त्यांची परिस्थिती चांगली होती त्यामुळे जॉब करायचा प्रश्न नव्हताच . कुशललाही घर सांभाळणारी बायको हवी होती . खरे तर आपली व्यसन सांभाळून घेणारी पाहिजे होती म्हणा ना .....
लग्नानंतर महिन्यांनी तो कामावर जॉईन झाला . पेंडिंग कामे पूर्ण करता करता महिना गेला . नवीन लग्न त्यामुळे ऑफिसमधूनही लवकर घरी यायचा . चांगली रूम ही घेऊन ठेवली होती . दोघेच राहायचे ते . आजकुठे त्याला थोडा आराम मिळेल होता.मग मित्रांनी आग्रह केला चल दोन पेग घेऊ .बघता बघता अकरा कधी वाजले ते कळलेच नाही . डोक्यात थोडी नशा  आणि हातातील सिगारेट संपवून त्याने बेल वाजवली .  आतुरतेने वाट बघत असल्याप्रमाणेच दार पटकन उघडले गेले आणि झपकन तो वास तीव्रपणे तिच्या नाकात घुसला.तोंड वाकडे करीत तिने त्याला आत घेतले. काही न बोलता तिने जेवण गरम करायला घेतले.
" अग....आता नको .. बाहेरच झालेय .मित्रांबरोबर बसलेलो.नाही म्हणता आले नाही.गप्पागोष्टीत तुला कळवायचे राहून गेले . तिने काही न बोलता जेवण तसेच फ्रीजमध्ये ठेवले आणि बेडरूममध्ये निघून गेली.थोड्यावेळाने फ्रेश होऊन तो आत आला. तिला जवळ घेतले . पण यावेळी ती नेहमीप्रमाणे मोहरली नाही . त्या वासाने तिला सारखी उलटीची भावना होऊ लागली . त्याने तिचा विचार न करता नेहमीचा कार्यभाग उरकला आणि पाठ करून झोपून गेला. ती मात्र रात्रभर तळमळत राहिली.
सकाळी नेहमीप्रमाणे दिवस सुरू झाला. काही दिवस नेहमीसारखे गेले . एक दिवस सकाळी त्याने तिला सांगितले आज जेवण बाहेरून करून येणार . तिने मान डोलावली . रात्री त्या दिवशीसारखाच तो घरी आला . हिने काही न बोलता त्याला आत घेतले . तो फ्रेश होण्यासाठी आत गेला . थोडयावेळाने बाहेर आला आणि धक्का बसून समोर पाहत राहिला . ती शांतपणे सोफ्यावर बसली होती .समोर टीपॉयवर एक ग्लास आणि शेजारी व्हिस्कीची बाटली होती . बाजूला शेंगदाण्याची डिश आणि पेप्सीची बाटली .शांतपणे तिने थोडी व्हिस्की ग्लासमध्ये भरून त्यात पेप्सी ओतला आणि त्याच्याकडे ग्लास उंचावून चियर्स केले आणि तोंड वाकडे करीत एक मोठा घोट घेतला. मग बाजूच्या ड्रॉवरमधून सिगारेट काढून ती शिलगावली आणि मोठा कश घेतला आणि ठसका लागून खोकू लागली .
"हे काय करिष्मा ....?? त्याने आवाज चढवून विचारले.
"काय म्हणजे ...?? तुम्ही हेच पिऊन आलात ना बाहेर.....?? मीही तेच पितेय... ?? फक्त घरात बसून".तिने अजून एक घोट घेऊन उत्तर दिले.त्याला काय उत्तर द्यायचे सुचले नाही.
"अग पण ती दारू आहे ..... तू का पितेस ..?? त्याने थोड्या रागात विचारले.
"तुम्ही का पिता....? तिने उलट प्रश्न केला.
"अग कामाचे टेन्शन असते  ते जाण्यासाठी मित्र मित्र बसून पितो कधी कधी ....कधी ऑफिसच्या पार्ट्या असतात. बॉस आणि सिनियर असतात ते आग्रह करतात तेव्हा त्यांना खुश करण्यासाठी .तर कधी मज्जा टाईमपास म्हणून पितो"त्याने बचावाचा दुबळा प्रयत्न केला.
"एव्हढेच ना ...?? मलाही खूप टेन्शन येते हो घरी. तुमची काळजी वाटत असते.. काय करीत असाल . काय जेवला असाल ....शिवाय आईबाबांची काळजी असते . कसे असतील ते . आणि तुम्ही पिता म्हणजे ही चांगलीच गोष्ट असणार ...??म्हणून पिते मीही . शेवटी तुमच्या पावलावर पाऊल टाकून एकत्रपणे संसार  करायचा असे देवाच्या अग्नीच्या साक्षीने सर्वांसमोर वचन देऊन आलेय मी ....असे म्हणत तिने तो ग्लास रिकामा केला.मग उठून उभी राहिली आणि अंगावरची साडी दूर करून हात पसरून त्याला आमंत्रण दिले "चल चालू कर पुढचा कार्यक्रम ...
काही न बोलता तो मान खाली घालून बेडरूममध्ये निघून गेला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment