Saturday, July 14, 2018

रिपोर्ट

हातात मेडिकल रिपोर्ट घेऊन ती खिन्न चेहऱ्याने बाहेर पडली . बाहेर मुसळधार पाऊस पडत होता . कशीबशी रेल्वे स्टेशनवर आली . ट्रेन उशिरानेच धावत होत्या . दुसरा काही पर्याय नसल्याने तिने स्टेशनवरच थांबायचे ठरविले . एक कोपऱ्यात जागा पकडून तिने आधी मनसोक्त रडून घेतले . स्टेशनवर सगळेच चिंतेत असल्यामुळे कोणीही तिच्या राडण्याकडे लक्ष दिले नाही .रात्री बऱ्याच उशिराने ट्रेन चालू झाल्या . ती आपल्या नेहमीच्या स्टेशनवर उतरेपर्यंत मध्यरात्र होऊन गेली होती .घरापर्यंत जायला रिक्षा शोधत असतानाच एक तरुणी तिच्याजवळ आली ताई कुठे जाणार तुम्ही ?? तिने प्रश्न केला . हिने कुसुम नगर असे थंड आवाजात उत्तर दिले . मीही त्याच्या जवळ राहते आपण जाऊया का एकत्र .तिने काही न बोलता मान डोलावली .अचानक एक रिक्षा समोर येऊन उभी राहिली .कोणताही विचार न करता दोघी रिक्षात बसल्या आणि रिक्षा चालू झाली . तिचा चेहरा पाहून दुसरी तरुणी काही बोलली नाही . अचानक रिक्षाने नेहमीच रस्ता सोडून वेगळेच वळण घेतले . व भाऊ इथे कुठे असे बोलेपर्यंतच दोन  माणसे त्या रिक्ष्यात चढली .एक क्षणात दोघीनीही कल्पना आली काय घडणार ते .पुढे एका काळोख्या घरासमोर रिक्षा थांबली आणि अजून दोघेजण अंधारातून पुढे आले .सगळ्यांनी मिळून दोघीनीही आत उचलून आणले . हातातील पर्स कुठच्या कुठे गेल्या होत्या . भीतीने थरथर कापत दोघीही कोपऱ्यात उभ्या राहिल्या .त्या पाची जणांच्या चेहऱ्यावर वासना स्पष्ट दिसत होती .काहीतरी विचार करून ती पुढे झाली . तुम्हाला काय हवेय ?? नजर रोखत तिने विचारले . पुढे येणारे पाचही थांबले .पैसा आणि तुम्ही ..त्यातील एकाने उत्तर दिले . उद्या  हे लपून राहणार नाहीत . आज ना उद्या पोलीस तुमच्यापर्यंत पोचतीलच त्यापेक्षा एक तडजोड केली तर ...? आश्चर्याने ते तिच्याकडे पाहू लागले . ती तुम्हाला पैसे देईल मी शरीर देते ... बोला . तिला हात लावायचा नाही .आम्हाला घरी सोडा नंतर . असे म्हणत तिने ओढणी खाली टाकली . सर्वांनी एकमेकांच्याकडे पाहत होकारार्थी माना डोलवल्या आणि तिच्यावर तुटून पडले .दुसरी तरुणी हताश नजरेने सर्व पाहत राहिली.सर्व आटपल्यावर  दुसऱ्या तरुणीच्या पर्समधून हजार रुपये काढून घेतले . आणि नंतर दोघीना रिक्षातून घराजवळ सोडले .खाली उतरल्यावर ती दुसरीला म्हणाली मला तीन हजार हवेत . ती तिची मागणी ऐकून अवाक झाली . कसले पैसे...?? तुला त्यांच्यापासून वाचविण्याचे पैसे ... ती शांतपणे म्हणाली .नाही आहेत आता दुसरीने उत्तर दिले हरकत नाही ट्रान्सफर कर .. आम्ही हल्ली ऑनलाईन पेमेंट ही स्वीकारतो . तिच्याकडे उत्तर तयार होतेच . आम्ही म्हणजे ??? दुसरीने शंकेने विचारले . अग धंदा करते मी .रोजची चार हजाराची कमाई आहे माझी . म्हणून तर त्यांना अंगावर घेतले मी .आणि तुला वाचविले . नाहीतर त्यांनी इज्जत आणि पैसे दोन्हीही घेतले असते तुझ्याकडून .पाचजणांना काय फुकट चढवून घेतले का ???? काही न बोलता दुसरीने तिच्या अकाउंट वर तीन हजार ट्रान्सफर केले .पैसे जमा झाल्याचा मेसेज येताच ती निघाली .पण असेच जर दुसऱ्यांच्या बाबतीत झाले तर ...?? ते असेच मोकाट सुटणार का ?? दुसरीने आवाज चढवून विचारले . ती वळली तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाली आता ते काही करू शकणार नाहीत . हा रिपोर्ट बघ . एड्स झालाय मला . आजच डॉक्टरकडून रिपोर्ट आणला मी . हातातील रिपोर्ट तिच्या हातात ठेवून ती शांतपणे वळली आणि चालू लागली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment