Friday, September 27, 2019

ट्रॅफिक आणि मुंबईकर

ट्रॅफिक आणि मुंबईकर
आजचा दिवस माझ्या आयुष्यात सुवर्णाअक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. का .....?? आहो ...पहिल्यांदाच मी बाईकवरून कामाला निघालोय.आता त्यात काय नवीन असे म्हणता ...?? माझ्यासाठी ते नवीनच हो .. मुलगा नोकरीला लागला आणि त्याने पहिली बाईक विकत घेतली . भले हप्त्यावर तर हप्त्यावर ....पण घेतली ना ...नाहीतर आम्ही ... एक घर हप्त्यावर घेतले त्याचे हप्तेच अजून फेडतोय . नंतर सर्व काही हप्त्यावरच घ्यायची सवय लागली . पाहिले घर ..मग मुलांची शिक्षणे ..आई वडिलांचे आजारपण सगळे काही हप्त्यावर चालू . पोराने मात्र बाईक घेतली हो... माझी कुठे बाईक घ्यायची ऐपत....
पहिल्या नोकरीला लागलो तेव्हा बसचे पैसे वाचावे म्हणून सेकंड हॅन्ड सायकल घेतली होती.व्यायाम आणि पैसे वाचविणे हा दुहेरी हेतू . त्याची इतकी सवय लागली की हिला बघायला ही सायकलवरून गेलो होतो.ते पाहून तिने केलेला चेहरा अजून लक्षात आहे माझ्या.शेवटी नोकरी बदलली तशी सायकल ही गेली आणि ती 7.16 ची लोकल नशिबात आली .ती अजूनपर्यंत .....आणि मुंबईकरांच्या नशिबात लोकल आली की तो निवृत्त होईपर्यंत सुटत नाही .
पण आज पोराने ऐटीत बाईकची चावी हातात दिली..म्हणाला आज जा बाईक वरून .. नशीब तरुणपणी मित्रांच्या बाईक  चालवायला शिकलो होतो. मीही म्हटले जाऊ आज आरामात बाईकने . कामावर ही जरा शो शाईन करू. नाहीतरी फारच कमी मुले बापाला असा आनंद देतात.निघताना विचार आला गोखले मॅडमला विचारावे का....येतात का... ?? नको रे बाबा ..  बाई उद्यापण अपेक्षेने वाट पाहत उभी राहायची ...आपण एकटेच निघू . बऱ्याच वर्षांनी बाईक चालवतोय उगाच तिच्यासमोर पचका व्हायचा .
आह.... किती मस्त वाटतेय बाईक चालवायला ....?? ह्या पोरांची खरेच मज्जा आहे. ट्रेनची कटकट नाही.. दरवाजाला लोबकळणे नाही. इतरांचे धक्केबुक्के नाही . बाईकवर टांग टाकायची आणि निघायचे.
बापरे ... हे काय .. रस्त्यावर गाड्या किती आल्यात . आणि किती हळूहळू चालल्यात. अरे किती गाड्या रिकाम्याच आहेत . काही भल्या मोठ्या गाडीत तर एकच माणूस . आहो एक दोन जणांना लिफ्ट द्या त्यांचाही वेळ वाचेल तुमचाही टाईमपास होईल . आम्ही बघा कसे अर्धा वेळ उभे राहतो आणि अर्धा वेळ दुसऱ्याला बसायला देतो . फार बरे वाटते हो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून .
च्यायला.....!!  सारखा ब्रेक मारावा लागतोय. गियरही कितीवेळा बदलावा लागतोय. अरे भाऊ ... सिग्नल आहे कळत नाही का ....?? मी काय वेडा म्हणून उभा आहे का....?? नाही ..सिग्नल तोडून मी जाणार नाही .... अरे हो.... हो... कितीजण हॉर्न वाजवितायत . थांबा मी बाजूला होतो... तुम्ही जा सिग्नल तोडून . आम्ही आयुष्यात नियम पाळीतच जगलोय.. थांबा गाडी बाजूला घेतो . छान सगळेच बाईकवाले सिग्नल तोडून जातायत . ह्यांच्यासाठी सिग्नल नाही का... ?? अरे अरे सांभाळ .. ती बघ उजवीकडून स्पीडमध्ये कार आलीय .आई ग.... ठोकला तिने त्याला आणि हे काय सरळ निघून ही गेली ती ..बाईकवाल्याला काय झालंय ते पहा तरी .च्यायला आमच्या स्टेशनवर तरी बरे.... चालत्या गाडीतून कोण पडला तरी दहाजण धावत येतात..,त्याला बाजूला बसवितात पाणी देतात. चला आता.. ट्राफिक जाम होतोय तर हळू हळू . मेट्रोचे काम चालू आहे वाटते इथे . कितीवर्षं काम चालू राहणार देव जाणे . माझ्या रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशी मेट्रोतून आलो तरी भरून पावलो. पुढच्या पिढीसाठी मेट्रो आहे म्हणतात पण आताच्या पिढीने केवळ त्यागच करावा का ...??? अर्धे आयुष्य या प्रवासातच गेलंय आणि अर्धे आयुष्य काम करण्यात .च्यायला... रिटायर्ड झालो तरी स्टेशनवर येऊन भरलेल्या लोकल बघितल्याशिवाय चैन पडणार नाही....अरे पण किती हा ट्राफिक....?? तो मूर्ख  बघा .... भर ट्रॅफीकच्या गर्दीत रस्त्यावर काँक्रीट टाकतोय .. कोणत्या मूर्खाने हा सल्ला दिला असेल त्याला...?? आधीच फक्त सात फूट वाट ठेवलीय त्या मेट्रोने आणि हा त्यावर काँक्रीट टाकतोय . कानाखाली जाळ काढावसा वाटतोय .तू ये रे ....आमच्या लोकलमध्ये ....दारात उभे राहून रस्ता अडविणाऱ्यांची आम्ही कशी वाट लावतो ते बघच एकदा..
अरे बाबांनो पुढे जाल की नाही  आज ...की इथेच संध्याकाळ होणार....??  बरे झाले गोखले बाईला लिफ्ट नाही दिली .परत कधीच गुड मॉर्निंग म्हटले नसते ..चला ट्राफिक सुटतेय हळू हळू . निघुया पटकन. हुश्शहहह ......आलो एकदाच ऑफिसला च्यायला.... इथे पार्किंगही फुल्ल आहे .कमाल आहे... आता पार्किंग शोधण्यात पाच मिनिटे जाणार . त्यानंतर लिफ्टला गर्दी आहेच.
आलो बुवा एकदाचा ऑफिसच्या दारात ..आज ऑफिसला येताना जणूकाही लढाई करून आल्यासारखे वाटतेय ..आयचा घो .....हे काय ......?? चार मिनिटे लेट ....?? गेला ह्या महिन्याचा राखीव लेटमार्क ही गेला .ह्या ट्रॅफीकने शेवटी एक लेटमार्क खाल्लाच माझा ......
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment