Sunday, September 29, 2019

दहशतवादाची कथा ....ललिता गंडभीर

दहशतवादाची कथा ....ललिता गंडभीर
ग्रंथाली प्रकाशन
विसाव्या शतकात जगभर अनेक ठिकाणी जातीय आणि धार्मिक कारणावरून हिंसक घटना घडल्या . त्यात अनेकांची होरपळ झाली . लाखो लोक निर्वासित झाले . अनेकांना आपले घरदार जमीन सोडून निर्वासित व्हावे लागले .  आयुष्यभर ते ह्या घटना विसरू शकले नाहीत . त्यांच्या हृदयात या घटना कोरून राहिल्या . लेखिकेने या यातनांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे .भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते .ज्यांनी हे भोगलेय ते विरुद्ध बाजूंचा पराकोटीचा द्वेष करतात . असेच एक पाकिस्तानात राहणारे सुखवस्तू शेतकरी शीख कुटुंब आहे . भारताची फाळणी होते आणि मुस्लिम समुदायातील काही समाजकंटक त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना दिल्लीत यावे लागते . इथे आल्यावर त्यांचे होणारे हाल वाचून अंगावर काटा येतो . त्याच कुटुंबातील एका छोट्या मुलाने दरशनने सगळा हिंसाचार आपल्या डोळ्याने पहिला आहे . त्यात त्याचे वडील ही नाहीसे झालेत आणि त्या घटनेचा धक्का बसून त्याची पणजी सुन्न झाली आहे .यातूनही ते कुटुंब सावरते आणि  आपल्या कष्टाने कपड्यांच्या व्यापारात जम बसविते . काही वर्षांनी त्या मुलाचे वडीलही परत येतात पण आपला एक हात गमावून . त्या मुलाच्या मनात बसलेली अढी अनुनच घट्ट होते .
त्याच वेळी कोकणातील एका छोट्या गावात एका ब्राम्हण कुटुंबात एका मुलाचा  गोपाळचाजन्म झाला होता. शहरातील सगळ्या गोष्टीपासून दूर असलेल्या त्यागावात  सर्व सुखाने राहत होते . स्वातंत्र्य संग्राम,हिंसाचार या गोष्टीपासून ते गाव दूर होते . गावात दोनच ब्राह्मण कुटुंबे होती . पण महात्मा गांधींचा खून झाला आणि त्याची झळ गावाला बसली . बाहेरून काही माणसे आली आणि त्यानी दोन्ही ब्राह्मण कुटुंबांची वाताहत केली .जीव वाचविण्यासाठी गोपाळ  आपल्या काका काकूंसोबत दुसऱ्या गावी गेला . पण गावातील हिंसाचार त्याच्याही हृदयात कायमचा बसला .
योगायोगाने दोन्ही मुले  शिक्षणासाठी दिल्लीत एकत्र येतात आणि एकमेकांचे जानी दोस्त बनतात . एक समाजसेवा आणि राजकारणाच्या माध्यमातून देश घडवायला निघतो . तर दुसरा योग्य संधीची वाट पाहत यशस्वी उद्योजक बनतो.
पंजाबात स्वतंत्र खलिस्तानची मागणी जोर धरू लागते तेव्हा दरशन  त्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवितो . आपल्यावर झालेला अन्याय स्वतंत्र देश निर्माण करूनच दूर होऊ शकतो याची खात्री त्याला असते. त्याची पत्नी माया ही हिंदू आहे . त्यातच पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या होते आणि पुन्हा दंगली चालू होतात . हिंसाचाराचा डोंब उसळतो . यावेळी हिंदू विरुद्ध शीख असा सामना होतो. या हिंसाचारात कोणाची आहुती जाते ते पुस्तक वाचल्यावरच कळेल .

No comments:

Post a Comment