Monday, March 1, 2021

असुर...एका पराभूताची गोष्ट...आनंद नीलकांतन

असुर...एका पराभूताची गोष्ट...आनंद नीलकांतन
अनुवाद.....हेमा लेले
मंजुल पब्लिशिंग हाऊस
ही कथा आहे प्रमुख महाकाव्यातील सर्वश्रेष्ठ खलनायकाची अर्थात रावणाची.रणांगणात मृत्यूशय्येवर असताना कोल्हे... कुत्रे त्याच्या शरीराचे लचके तोडताना त्याने आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्याने आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे.खरे तर लेखकाचा हा रावण  संपूर्ण पुस्तकात खूपच दुबळा..हतबल.. निराश वाटतो. 
लेखकाची कल्पनाशक्ती कशी बहरू शकते हे या पुस्तकातून दिसते. रामायणातील आपल्याला माहीत असलेल्या घटनांशी विसंगत आणि धक्कादायक गोष्टी यात आहेत.
तुम्हाला ठाऊक असलेले सर्वमान्य रामायण मनात ठेवून हे पुस्तक वाचाल तर फारच धक्के बसतील.
रावणाला दशमुख का म्हटले जाते ...?? आपल्यात बुद्धिमत्ता,राग,गर्व,द्वेष,दुःख,लोभ,आनंद,भीती,स्वार्थ..अभिलाषा आणि महत्वाकांक्षा  हे गुण असल्यामुळे आपण परिपूर्ण आहोत असे तो मानतो. थोर राजा महाबली त्याला बुद्धिमत्ता सोडून इतर गुणांचा त्याग करण्यास सांगतो.पण तो पावित्र्याचे उसने अवसान आणत नाही .जो माणूस म्हणून जसा असायला हवा तसाच आहे .
यात भद्र नावाची अजून एक व्यक्तिरेखा लेखकाने रंगविली आहे.भद्र एक सामान्य असुर सैनिक आहे . ज्याने आपली पत्नी आणि मुलगी देवांविरुद्ध लढताना गमावली आहे.आता तो एक गलिच्छ किळसवाणा दारुड्या भिकारी आहे . पण रावणाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा साक्षीदार आहे . किंबहुना रामायणात जी महत्वाची वळणे आहेत त्यात हा प्रमुख आहे. तो रावणाच्या शयनगृहात ही शिरतो. रावण त्याचा तिरस्कार करतो पण आपल्या आयुष्यातून टाळू शकत नाही.
लंकेचा राजा कुबेर हा रावणाचा सावत्रभाऊ.तर रावण आपल्या कुंभकर्ण ,विभीषण, आणि कुरूप बहीण शूर्पणखा  आणि आई यांच्या समवेत दारिद्र्याचे जिणे जगतोय. मामा मारीच त्यांना जमेल ती मदत करतो. एकदा कुबेराच्या गाई चोरताना रावण आणि कुंभकर्ण पकडले गेले तेव्हाही मारीचने तो आळ स्वतःवर घेतला आणि शिक्षा भोगली.रावणाची आई असुर जमातीतील होती तर वडील ऋषी होते. विभीषण हा वडिलांच्या वळणार गेला होता. त्याला वेद धार्मिक ग्रंथात रुची होती .तो अतिशय शांत आणि घाबरट होता. तर कुंभकर्ण हा कुरूप लठ्ठ, ठेंगू केसाळ कुरळ्या केसांचा असुर. तो नेहमी अंमली पदार्थांच्या नशेत झोपून असायचा .शूर्पणखा काळीकुट्ट ,सरळ केसांची,पिंगट डोळ्यांची आहे . स्वतः रावण गोरा दाट कुरळ्या केसांचा आणि  काळ्या डोळ्यांचा आहे.
रावणाने कुबेरावर हल्ला करून लंका ताब्यात घेतली.त्यात भद्राचा सिहांचा वाटा होता.खरे तर अयोध्या रावणाच्या खिजगणतीत ही नव्हती. एक अतिशय गरीब छोटे राज्य म्हणून त्याने आयोध्याकडे पाहिले. तेथील प्रजा अतिशय गरीब ,घाणेरडी होती. ती रस्त्यावरच आपले नैसर्गिक विधी करत होती. रस्ते अरुंद होते त्यातच कचराकुंड्या होत्या. त्यांचा राजवाडा ही जीर्ण मोडकळीस आलेला होता.त्याने अयोध्येचा सहज पराभव केला.अयोध्येचा राजा अनर्ण्य याचा रावणाने वध केला. त्याच लढाईत रावणाची भेट वेदवती नावाच्या ब्राह्मण विधवेशी झाली. रावण तिच्या प्रेमात पडला पण तिने नेहमीच रावणाची निर्भत्सना केली. तरीही रावण तिच्या प्रेमात होता.
मंदोदरीपासून रावणाला पहिली मुलगी झाली. पण ज्योतिषाने ही मुलगी असुरांचा नाश करेल अशी भविष्यवाणी वर्तवली आणि तेव्हापासून सर्व नातलग रावणाशी विचित्र वागू लागले . एक दिवस संधी मिळताच त्यांनी वेदवती आणि रावणाची मुलगी भद्राच्या स्वाधीन केली. यात वेदवती मारली गेली पण ती छोटी मुलगी बचावली .एका राजाने तिला दलदलीतून बाहेर काढले.
हा भद्र जगण्यासाठी अनेक जागा बदलत गेला. तो आचारी होता ,तो धोबी होता. त्याची रखेल रावणाच्या दरबारात दासी होती. रावणापासून तिला एक पुत्र झाला.तो शेवटपर्यंत मेघनादाशी प्रामाणिक होता. 
हनुमानाच्या आगमनाची खबर ही भद्रानेच दिली.रावणाच्या मृत्यूसमयी तोच त्याच्या जवळ होता. मी माझ्यापरीने याचा सूड घेईन असे आश्वासन त्याने रावणाला दिले. पुढे तो अयोध्येत राहण्यास आला . आता अयोध्येत वर्णव्यवस्था सुरू होती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी व्यवस्था होती. भद्राने आपल्या रखेलीसमवेत धोब्याचे काम करण्यास सुरुवात केली. दिवसभर काम करून संध्याकाळी आपल्या रखेलीला मारहाण करायची शिव्याशाप द्यायचे हेच त्यांचे काम. त्यातूनच पुढे एक महत्वाची घटना घडली त्याचा परिणाम रामाच्या आयुष्यावर झाला .
हे अतिशय वेगळे रामायण आहे.रावणाच्या नजरेतून घडलेले. यात रामाला काहीच स्थान नाही .तर सीतेला महत्व आहे. भद्रसारख्या शूद्राचे समाजात किती महत्वाचे स्थान असते हे दाखविले आहे .
एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचावे .

No comments:

Post a Comment