Saturday, March 20, 2021

नकार

नकार
गळ्यात मोठे मेडल मिरवतच त्याने घरात प्रवेश केला आणि सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा पाहूनच तो सुखावला.आज पुन्हा त्याने पाचशे मीटरची शर्यत जिंकली होती.
 यापुढील प्रवास खडतर होता .पण त्याची त्याला पर्वा नव्हती. तो नेहमीच जिंकत होता.सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करून तो वडिलांकडे वळला. "पप्पा ...!!  मला पुढच्या स्पर्धेसाठी नवीन शूज हवेत .हे वरून फाटले आहेत..."तो अगदी सहज स्वरात म्हणाला.
"बघू ... सध्या माझे पाकीट रिकामे झालेय. लॉकडाऊनमुळे पगार कमी येतोय. घरच्या खर्चाची काळजी आहे मला ..." वडील नजर चुकवत म्हणाले.
"मग कसे होईल....?? आतातर राज्यस्तरीय स्पर्धा आहेत.त्यात निवडला गेलो तर पुढे राष्ट्रीय स्पर्धा. मी आतापर्यंत कधीच अपयशी ठरलो नाही त्याचे कारण तुम्ही मला जे पाहिजे ते दिलेत . मग आताच असे का ..."?? तो थोडासा चिडूनच बोलला.
"बाळा... जे आहे ते आहे .. तरीही कुठे कर्ज मिळेल का ते पाहतो.कोणी दिले तर नक्कीच घेऊ ... "वडील केविलवाण्या स्वरात म्हणाले . त्याची आई आश्चर्याने दोघांकडे पाहत होती.
पुढचे काही दिवस बापलेक बऱ्याच ठिकाणी पैशासाठी फिरत होते . काहीजणांनी पैसे दिले पण ते रोजच्या खर्चातच संपून गेले . 
"नवीन शूज घेण्यापेक्षा आहे ते रिपेयर करून वापर की ....."वडिलांनी शेवटी हताश होऊन सल्ला दिला.
"काहीतरीच काय बाबा ... लोक काय म्हणतील ....?? आतापर्यंत आपण टॉप क्लास वस्तू वापरल्या आहेत . हे असे शिवून घातलेले शूज पाहून इतर स्पर्धक काय म्हणतील.....तो थोडा चिडून म्हणाला,आज पहिली मॅच आहे मी बघतो काही तरी" असे बोलून तो निघाला .
संध्याकाळी घरी आला तोच पडका चेहरा घेऊन .आल्या आल्याचं आपले किट एका कोपऱ्यात फेकून दिले आणि कोपऱ्यात जाऊन बसला 
"काय रे ...?? काय झाले..." ??? आईने काळजीने विचारले .
"पाचवा आलो ..." त्याचा बांध फुटला आईला मिठी मारून तो रडू लागला . 
"पुढची मॅच आहे ना ...?? त्यात येशील पहिला .. बाबा आत येत म्हणाले. 
"पण ते शूज...." ??? त्याने पुन्हा वडिलांना आठवण करून दिली . 
"बघू रे .. प्रयत्न चालू आहेत. मिळाले की आणूया . तोपर्यंत तुझे जुने शूज शिवून आणतो कोपर्यावरच्या दुकानातून..."असे म्हणून त्याचे शूज घेऊन बाहेरही पडले.
"चल फ्रेश हो... मी तुझ्यासाठी काहितरो बनवते.."आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"अग आई.. मी पाचवा आलोय .. याचे काहीच वाटत नाही का तुम्हाला ....?? आख्खी शाळा आश्चर्यचकित झाली माझा परफॉर्मन्स पाहून ..मला तर घरी यायची इच्छाच नव्हती . तुम्ही काय म्हणाल याचीच काळजी ...." तो आईकडे अचंब्याने पाहत म्हणाला.
"पाचवा आलास ना...??? स्पर्धा म्हटली की कोणतरी पहिला..दुसरा..तिसरा येणारच.जो मनापासून प्रयत्न करतो त्याला यश मिळते.म्हणून बाकीचे काही प्रयत्न करायचे सोडत नाहीत की स्पर्धेत भाग घेण्याचेही सोडत नाही.ते दुसरी नाहीतर तिसरी संधी घेतातच.आज तू नाही पहिला आलास पण कोणतरी पहिला आलाच ना.त्याने तुझ्यापेक्षा जास्त प्रयत्न केले म्हणून पहिला आला ... तुझ्याकडे संधी आहे पुढच्यावेळी नक्कीच पुढे जाशील ... "आई अगदी सहज स्वरात म्हणाली आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला.
संध्याकाळी वडिलांनी त्याला शिवून आणलेले शूज दाखवले . त्याने नाराजीनेच ते कोपऱ्यात ठेवून दिले . काही दिवस त्याने प्रॅक्टिस बंद केली .घरातले कोणीही काही त्याविषयी बोलत नव्हते . शेवटी शाळेतून फोन आलाच .प्रॅक्टिसला का येत नाहीस...??  याबद्दल विचारणा झाली.नाईलाजाने त्याने उद्या येतो असे उत्तर दिले.
रात्री कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली . हळूच दरवाजा उघडून बाहेर पाहिले तर बाबा त्याचे शूज साफ करत होते.त्यांच्या चेहऱ्यावर।त्याला समाधान दिसत होते. मन लावून त्यांनी ते शूज साफ करून त्याच्या  बॅगेत ठेवले.
संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्याचा मूड थोडा बरा झाला होता . किट बॅग साफ करताना आईने त्याचा टी शर्ट घुवायला काढला तेव्हा खांद्यावर थोडा उसावलेला दिसला.काळजीने तिने तो बाबांच्या हाती दिला. त्यांनी शांतपणे तो हातात घेतला आणि सुई दोरा घेऊन तो शिवून टाकला .
आज त्याची मॅच होती . दुसरी संधी होती त्याच्यासाठी . घरून निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निश्चय दिसून येत होता .
आज तो चौथा आला . घरी येऊन त्याने सांगितले तेव्हा वडील शांतपणे म्हणाले" मागच्यावेळापेक्षा हे चांगले नाही का... ??? आणि कोणाचा तरी नंबर तू पटकावलास ...ठीक आहे .. अजून एक संधी आहे . आणि ती गेली तर पुढचे पूर्ण वर्ष आहे तुझ्याकडे . प्रयत्न करीत राहा ....".त्याने हसून मान डोलावली.
दिवस निघून जात होते . याची प्रॅक्टिस जोरात चालू होती . पण यावेळी त्याला नंबरात इंटरेस्ट राहिला नव्हता फक्त मनापासून प्रयत्न करायचे हेच ठेवून त्याचा सराव चालू होता .
आज फायनल ... 
संध्याकाळी तो उड्या मारतच घरात शिरला . आईला जोरात मिठी मारून त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत आपली निवड झाल्याचे सांगितले. आता पहिल्यांदाच तो आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार होता .सगळ्या कुटुंबात आनंद पसरला होता. रात्री हसतखेळत जेवण करून सगळे झोपायला गेले. 
खुश असल्यामुळे त्याला झोप येत नव्हती. अचानक कोणाच्यातरी कुजबूजीने त्याला जाग आली .
"आहो आता तरी त्याला नवीन शूज आणून द्या ..."आई हळू आवाजात बाबांशी बोलत होती. 
"नाही आता तर मुळीच नाही. प्रत्येकवेळी आपण त्याला हवे ते दिले. त्याला कधी नाही म्हटले नाही . त्यामुळेच तो यशाच्या शिखरावर गेला . पण अपयश म्हणजे काय... ?? हे त्याला माहित आहे का.. ?? अपयशी माणसाची मनःस्थिती काय असते.तो अपयश कसे पचवतो हे त्याने अनुभवले आहे का... ??? आज आपण त्याला नाही म्हटले त्यामुळे त्याची मनःस्थिती बिघडली. आपल्याला ही नकार मिळू शकतो हे त्याला जाणवले. त्यातून त्याने अपयश पाहिले पण त्यातही आपण त्याच्या पाठीशी उभे राहिलो. त्याला धीर दिला त्याचे मनोधैर्य वाढविले. राखेतून उभ्या राहणाऱ्या फिनिक्स पक्षाची त्याला आठवण करून दिली. मनात असेल तर कठीण परिस्थितीत ही मार्ग दिसतो हेच तो यातून शिकला . आज त्याच इच्छाशक्तीवर राज्याचे प्रतिनिधित्व करतोय आणि कदाचित पुढे देशाचे प्रतिनिधित्व करेल. आज नकार आणि अपयशाचा अनुभव घेतलाय. यातूनच पुढे  जाईल . चल झोपुया रात्र खूप झालीय..."
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment