Thursday, March 25, 2021

घातसूत्र.....दीपक करंजीकर

घातसूत्र.....दीपक करंजीकर 
ई प्रकाशन ... पुस्तक कट्टा
हा एक शोधग्रंथ आहे . गेल्या शंभर वर्षात जगाच्या इतिहासात काही मोठ्या घटना घडल्या. त्यात काही अपघात होते तर काही घातपात तर काही राजकीय घडामोडी. लेखकाने या महत्वाच्या घटनेमागे कोण असावेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे .  वरवर साध्या सरळ वाटणाऱ्या घटनांमागे काही शक्ती आपला आर्थिक हित साधण्यासाठी कार्यरत आहेत हे वाचून आपल्याला धक्काच बसतो . 
यापुस्तकात एकूण 104 वर्षातील महत्वाच्या घटनांचा पाठपुरावठा आहे . १९१२ साली घडलेल्या टायटॅनिक बोटीचा अपघात ते २०१६ साली ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसला तिथपर्यंत .
त्या 104 वर्षातील घटनाक्रम ,त्यामागील सूत्रधार, आणि त्यामागे त्यांनी केलेले कारस्थान किंवा संरचना. अश्या तीन भागात हे पुस्तक आहे. लेखकाचा अभ्यास आणि घेतलेली प्रचंड मेहनत पुस्तक वाचताना आपल्याला जाणवते.
अमेरिकेवर खाजगी बँकांचा पहिल्यापासूनच ताबा होता. यादवी युद्धात अब्राहिम लिंकनला पैसे हवे होते तेव्हा या खाजगी बँकांनी त्याच्याकडून 24 ते 36 टक्के व्याज मागितले ,साहजिकच लिंकन संतापला.त्याने खाजगी बँकांचे नूतनीकरण थांबविले.खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन सरकार चालवू नये असे त्याचे धोरण होते आणि म्हणूनच अमेरिकेच्या ट्रेझरी खात्याने स्वतः नोटा छापाव्यात असा आदेश काढला.पण खाजगी बँका हे खपवून घेणार नव्हते ,त्यांनी लिंकनविरुद्ध मोहीम सुरू केली.अश्या बँकांवर अंकुश ठेवणारा कायदा अंमलात आणावा असे लिंकनने सुचविले.या कायद्याने अमेरिकेची पूर्ण बँकिंग पद्धत बदलून गेली असती .त्याचवेळी लिंकन पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला.पण केवळ एकेचाळीस दिवसात त्याची हत्या झाली आणि कायदा झालाच नाही.
 टायटॅनिक बोटीचा अपघात हा खरोखरच अपघात होता की अजून काही .....?? 
1909 साली जे पी मॉर्गनने व्हाईट स्टारलाईन ही  प्रचंड तोट्यात असलेली कंपनी ताब्यात घेतली  होती.त्यांचे  आरएमएस ऑलिम्पिक जहाज सतत नादुरुस्त असल्यामुळे डॉकयार्डमध्ये पडून होते. त्यासाठी प्रचंड पैसा खर्च होत होता.पण मॉर्गन हा यशस्वी व्यावसायिक होता. तो ही कंपनी नक्की फायद्यात आणेल याची खात्री होती. त्याने ताबडतोब एक मोठे प्रवासी जहाज आयर्लंडच्या बेलफास्ट शिपयार्डमध्ये बांधायला घेतले .
१९१० साली जॉर्जियातील जॅकील आयलंड बेटावर अमेरिकेतील सात धनाढ्य व्यक्ती एकत्र जमल्या होत्या.तब्बल सात दिवस ते सर्व एकत्र काही धोरणे आखत होते काही कारस्थाने रचत होते. सात दिवसांनी काही ठोस मसुदा घेऊन ते सर्व आपापल्या घरी परतले. एक फेडरल रिझर्व्ह बँक सर्वांनी मिळून स्थापन करावी असा त्यांचा हेतू होता आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या भेटीत फिक्स झाल्या होत्या.
बेलफास्टमध्ये नवीन प्रवासी जहाज बांधून तयार झाले. १२ एप्रिल १९१२ ला टायटॅनिक प्रवासाला सुरवात करणार होती.मॉर्गनने या प्रवासासाठी काही प्रसिद्ध प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रणे दिली होती. या प्रवासात तीन मातबर धनाढ्य व्यावसायिकही होते ज्यांचा मध्यवर्ती बँकेला प्रचंड विरोध होता. प्रवासात खुद्द जे पी मॉर्गनही आपल्या कुटुंबासोबत सामील होणार होते.पण प्रवास सुरु होण्याआधीच मॉर्गनने आपल्या आजाराचे कारण देत प्रवास रद्द केला.त्याच्या इतर नातलगांनीही आपली सहल रद्द केली.पुढे टायटॅनिकला अपघात झाला .त्यात ते तिन्ही उद्योगती मरण पावले आणि मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा मार्ग खुला झाला .
लेखकाने यात घातपात असावा अश्या शंकेची सुमारे सोळा कारणे दिली आहेत यातील बहुतेक पटण्यासारखी आहेत.पुढे मध्यवर्ती बँक स्थापन झाल्यावर अमेरिकेचा आर्थिक कारभार या काही धनाढ्य घराण्यांच्या ताब्यात गेला . त्यात प्रामुख्याने जे पी मॉर्गन, रॉकफेलर,रॉथशिल्ड अशी घराणी होती.  त्यांच्या पाठिंब्यावर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडून येऊ लागला . जे त्यांच्या आर्थिक धोरणाला विरोध करीत त्यांना बाजूला काढले जाऊ लागले. पाहिले आणि दुसरे महायुद्ध यांच्याच धोरणानुसार ठरविले गेले. त्यांना जी राष्ट्रे डोईजड वाटत त्यांच्या विरुद्ध बंडखोर तयार केले जात त्यांना विपुल प्रमाणात पैसे आणि शस्त्रपुरवठा केला जातो. यातच अमेरिकेच्या पाच राष्ट्राध्यक्षांच्या हत्या झाल्या आणि ते कुठे ना कुठे या धोरणाविरुद्ध होते. 
सद्दाम हुसेनने डॉलरमध्ये तेल विकण्यास नकार दिला. तेल हे काळे सोने मानले जाते.जो तेलाचा मालक तो जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखला जातो. जगभरात तेलाचा व्यवहार डॉलरमध्ये होतो . आपल्या देशाचे चलन आणा आणि माझ्याकडून तेल घेऊन जा असे फर्मान सद्दामने काढले आणि फेडरल बँकेच्या या सुत्रधाराना ते सहन झाले नाही . त्यांनी कुवेतवरील हल्ल्याचा फायदा घेऊन सद्दामवर आक्रमण केले आणि इराक बेचिराख केला.
गडाफीने लिबियात डॉलरमध्ये तेल विकण्यास नकार दिला तेव्हा या सुत्रधारानी लिबियातील बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरवून क्रांती घडविण्यास भाग पाडले.
9/11 .. अमेरिकेतील ट्वीन टॉवरवर आत्मघातकी हल्ला झाला आणि ओसामा बिन लादेन प्रकशझोतात आला .सगळ्यांनी अल कायदा ला टार्गेट केले . पण यामागे खरच ओसामा बिन लादेन होता का ...?? ट्वीन टॉवर मध्ये एकूण साडेचारशे ज्यू कामाला होते पण त्यापैकी कोणीही त्यादिवशी कामावर हजर नव्हते. एकच ज्यू यात मरण पावला जो पर्यटक होता. ओसामा आणि तालिबान याना मोठे करण्यात या सुत्रधारांचाच हात होता. या सुत्रधारांची ऑफिसेस ठेवी काही महिने आधीच ट्वीन टॉवरमधून हलविले गेले होते.
अश्या अनेक घटनांची चौकशी या पुस्तकात झाली आहे. आर्थिक व्यवहार ,बँकिंग कार्य यात इंटरेस्ट नसणाऱ्या वाचकांना मध्ये मध्ये कंटाळा येईल पण हे सारे एका रहस्यकथेप्रमाणे आहे. एका क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीमागे किंवा एका जातीय किंवा अतिरेकी घटनेमागे आर्थिक कारणे किंवा काही लोकांचा प्रचंड आर्थिक फायदा असू शकतो हे वाचून आपण थक्क होतो.

No comments:

Post a Comment