Sunday, March 7, 2021

एचएमएस युलिसिस ...अँलिस्टर मॅक्लिन

एचएमएस युलिसिस ...अँलिस्टर मॅक्लिन
अनुवाद....अनिल काळे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
आतापर्यंत आपण दुसऱ्या महायुद्धाच्या जमिनीवर लढल्या गेलेल्या शौर्याच्या कथा वाचल्या. त्यात जर्मनी तसेच मित्रराष्ट्रांच्या अतुलनीय शौर्याच्या कहाण्या होत्या . कमांडोच्या घातकी कारवाया होत्या तर थरारक अपहरणे होती. पण आज पहिल्यांदाच  समुद्रात लढलेले युध्द कसे असते याची माहिती या पुस्तकातून मिळते.
युलिसिस ब्रिटिश आरमारातील एक हलक्या जातीचे क्रूझर जहाज.सगळे तिला घोस्ट शिप म्हणत.कारण तिच्यासोबत नेहमी मृत्यू प्रवास करतो असे मानले जाते.तिची एकूण लांबी 510 फूट .वजन साधारण 5500 टन होते. एकूण साडेसातशे माणसे त्या बोटीवर होती. मालवाहू जहाजांच्या ताफ्याला संरक्षण देणे हे यूलिसिसचे प्रमुख काम.गेले शंभर दिवस युलिसिस सतत लढत होती. सैनिकांनी किनारा पहिलाच नव्हता . भयानक थंडी,बर्फाचा पाऊस ,वादळी वारे यामुळे सर्वच आजारी आणि अतिशय थकलेले होते.जहाजात शेकडो टन बर्फ साचत होते.जर्मनीची टेहळणी विमाने सतत डोक्यावरून घिरट्या घालीत होती. 
त्याचवेळी युलिसिसकडे 36 मालवाहू जहाजांना संरक्षण देण्याची कामगिरी आली. एफआर 77 या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्याला सुरक्षितपणे रशियाला पोचविण्याची जबाबदारी युलिसिसवर असते.
आता सुरू होतोय युलिसिसचा प्रवास. या प्रवासात त्यांचे दोन शत्रू आहेत. एक जर्मनी आणि दुसरा निसर्ग .भयानक थंडी,उपाशी नौसैनिक, प्रचंड वादळे,जीवघेणे घुके, थकवा ,आजारपण, आणि शिवाय या ताफ्याला हल्ला करणाऱ्या जर्मनीच्या यू बोटी, फायटर विमाने . या सर्व आघाड्यांवर युलिसिसचे नौसैनिक ,अधिकारी ,कॅप्टन मोठ्या धैर्याने सामना देतात.
रविवारी दुपारी सुरू झालेली ही सफर दुसऱ्या रविवारी सकाळी समाप्त होते. आठ दिवसातील युद्धातून एफआर 77 ताफ्यातील किती जहाजे रशियाला पोचली ....?? युलिसिसने आपली कामगिरी पार पाडली का ???  सागरीयुद्ध किती भयानक असू शकते हे या पुस्तकातूनच कळते.
दुसऱ्या महायुद्धावरील एक महान कादंबरी असे या पुस्तकाचे वर्णन केले जाते.

No comments:

Post a Comment