Tuesday, January 23, 2024

किलर सूप

Killer Soup
किलर सूप
स्वाती शेट्टी ,प्रभाकर उर्फ प्रभूची पत्नी.एक छान रेस्टोरंट  बनवायचे तिचे स्वप्न आहे. आपण पाया आणि चिकन सूप बनविण्यात एक्सपर्ट आहोत असे तिला वाटते.तिने एका बाईकडे स्पेशल क्लास लावला आहे आणि मनीषा कोईराला नावाने बुरखा घालून क्लासला जाते.
प्रभाकर शेट्टी, स्वाती शेट्टीचा नवरा.अरविंद शेट्टीचा भाऊ. एका पायाने अधू.स्वातीने बनविलेले सूप बेसिन मध्ये फेकून देतो.आपल्या भावाच्या कंपनीत त्याने करोडोचा घोटाळा केलाय. एक फाईव्ह स्टार रिसॉर्ट काढायचे त्याचे स्वप्न आहे.
अरविंद शेट्टी .एक उद्योजक ,ड्रग व्यापारी. प्रभूच्या चुका वेळोवेळी माफ करणारा. पण अतिशय खतरनाक आणि शिवराळ माणूस.
अपेक्षा उर्फ अपू शेट्टी .अरविंद शेट्टीची मुलगी.तिला इटली फ्रांसला पेंटिंग शिकायला जायचे आहे .पण अरविंद शेट्टीला ते मान्य नाही.अपू कंपनीतील करोडो रुपयांचा घोटाळा शोधून काढते.
उमेश पिल्लई, प्रभू आणि अरविंदचा मसाजर आहे.तो प्रभुसारखा दिसतो .फक्त त्याच्या डाव्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे.त्याला प्रभूचे  रहस्य माहीत आहे.तो प्रभूला ब्लॅकमेल करतोय.त्याचे आणि स्वातीचे अनैतिक संबंध आहेत.
किरण नादार एक खाजगी गुप्तहेर .त्याला प्रभूने ब्लॅकमेलर शोधण्यासाठी नेमले आहे.त्याच्याकडे स्वाती आणि उमेशचे संबंध असल्याचे पुरावे आहेत.
त्या दिवशी कुकिंग क्लासला जाताना आपला कोणीतरी पाठलाग करतोय असा स्वातीला संशय येतो . ती नादारच्या पाठी लागते ,त्यांची झटापट होते.तो गाडीतून पळतो पण कॅमेरा स्वतीच्या हाती लागतो.एक ट्रक नादारच्या गाडीला ठोकतो त्यात त्याचा मृत्यू होतो.
इन्स्पेक्टर हसनकडे या अपघाताची चौकशी करण्याचे काम येते.तो काही महिन्यातच निवृत्त होणार आहे.त्यामुळे या केसकडे फारश्या गांभीर्याने पाहत नाही.पण त्याचा साथीदार तरुण सब इन्स्पेक्टर थुपली हुशार आहे .तो काही गोष्टी शोधून काढतो पण त्यात त्याचाही मृत्यू होतो.
थुपलीच्या मृत्यूमुळे हसनला खड्ड्यात पुरलेली बॉडी सापडते .ती बॉडी कोणाची आहे ??
यावरून एकूण कथेचा अंदाज आपल्याला आलाच असेल .प्रत्येक भागात गुंतागुंत वाढत जातेय.
नेहमीसारखी एक खून कथा आहे ज्यात खुनी कोण हे आपल्याला माहीत आहे पण ती कशाप्रकारे सादर केलीय हे महत्वाचे आहे .
विशेष म्हणजे यातील स्टार कास्ट मोठी आहे .उमेश महातो आणि प्रभू शेट्टीचा डबल रोल मनोज वाजपेयीने साकारला आहेत.प्रभू शेट्टी पायाने अधू आहे तर उमेश डोळ्याने तिरळा .
स्वाती शेट्टीची प्रमुख भूमिका कोकणा सेन शर्माने केलीय.
तर सयाजी शिंदेने आपल्या नेहमीच्या पद्धतीने अरविंद शेट्टी केलाय.
तामिळ अभिनेता निसार इन्स्पेक्टर हसनच्या भूमिकेत आहे.थकलेला ,पोट सुटलेला ,निराश चेहऱ्याचा हसन त्याने छान उभा केलाय .
अनपेक्षित शेवट आणि दुसऱ्या सिझनची कल्पना देणारी ही सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

No comments:

Post a Comment