Wednesday, January 31, 2024

Neru

Neru
नेरू 
सारा मोहम्मद एक अंध तरुणी.आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत राहतेय.त्या दिवशी तिचे आईवडील लग्नाला गेले होते.तिची केयरटेकर मावशी तिला सांगून बँकेत गेली .जाताना तिने नेहमीसारखे दाराला कुलूप लावले.काही वेळाने घरी आली तेव्हा तिला कळले कोणीतरी घरात घुसून सारावर बलात्कार केलाय .तिने पोलिसांना बोलावले नंतर तिचे आईवडीलही आले.
एक अंध तरुणी काय सांगणार ? असे वाटत असताना तिने बलात्कार करणाऱ्या तरुणाचे शिल्प काढून दाखविले.पोलिसांनी आपल्या पद्धतीने अधिक माहिती काढली आणि त्या तरुणाला एअरपोर्टवरून अटक केली.
तो तरुण घटनेच्या आदल्या दिवशी साराच्या घरी मित्राचा पत्ता विचारण्यासाठी आला होता आणि तो शेजारीच राहत होता असे साराच्या आईवडिलांनी सांगितले.
तो तरुण मायकल एका श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा आणि गृहमंत्र्यांचा होणारा जावई आहे.मायकलच्या वडिलांनी देशातील सर्वोत्कृष्ट वकील राजशेखरला नियुक्त केले .राजशेखरची मुलगी पूमीमा ही पण सुप्रीम कोर्टात वकील आहे.
मायकलच्या जामीनासाठी राजशेखर कोर्टात उभा राहतो.त्याचा दबदबा पाहून सरकारी वकील गोंधळतो आणि मायकलला सहज जामीन मिळतो.
कोर्टात केस उभी राहणार असते. पण कोणीही मोठा वकील साराची केस घ्यायला तयार नाही.इन्स्पेक्टर पॉल अतिशय प्रामाणिक अधिकारी पण त्यालाही केसवरून हटविले जाते.तरीही तो साराच्या बाजूने उभा आहे.
एक विजयमोहन नावाचा वकील आहे.पॉल एका सूत्रांकडून त्यांच्यापर्यंत पोचतो .विजयमोहन एके काळी राजशेखरकडे कामाला होता आणि पूमीमाचा प्रियकर राहिला होता.त्यामुळेच त्याची नोकरीही गेली आणि तीन वर्षाची बंदीही.आता तो कोर्टात उभा राहत नाही पण वकिलांना वेगवेगळ्या निकालाचे दाखले ,आणि कोर्ट केसेसचे संदर्भ देण्याचे काम करतो.
विजयमोहन पॉल आणि त्याची मदतनीस आहाना यांच्या आग्रहावरून साराच्या घरी जातो.साराशी बोलून तो केस स्वीकारतो.फार वर्षांनी तो आता कोर्टात उभा राहणार आहे आणि ते ही राजशेखर सारख्या कसलेल्या वकीलासमोर.
केसच्या सुरवातीला चाचपणारा गोंधळलेला विजयमोहन हळूहळू स्वतःला सावरतो आणि आत्मविश्वासाने राजशेखरच्यासमोर कसा उभा ठाकतो त्याचे मुद्दे वेगवेगळे संदर्भ देऊन कसे खोडून काढतो ते पाहण्यासारखे आहे.
हा एक अतिशय संथ पण थ्रिलर कोर्टरूम ड्रामा आहे.यात काहीही भडक दाखविले नाही .कोण कोणावर चिडत नाही ,मोठमोठे दमदार संवाद नाहीत.संपूर्ण केस कोर्टाच्या तांत्रिक बाबीवर आधारलेला आहे. राजशेखर मायकलला वाचविण्याचे पूर्ण प्रयत्न करतोय तर विजय मोहन तो दोषी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करायचा प्रयत्न करतोय.
विजयमोहनच्या भूमिकेत मोहनलालने नेहमीसारखा दमदार अभिनय केलाय.त्याच्या शांत स्वभावाला ही भूमिका शोभून दिसते.अनस्वार राजनने अंध साराच्या भूमिकेत प्राण ओतले आहेत.बलात्कारित अंध असूनही ती धाडसी आहे हे प्रत्येक प्रसंगात दाखविले आहे. पूमिमा राजशेखरच्या भूमिकेत प्रियमणी आहे.उत्तरार्धात विजयमोहनच्या समोर पूर्ण ताकदीने उभी राहिली आहे.
हल्लीच्या काळात कोणतेही पुरावे कसेही तयार करता येतात हेच या चित्रपटातून दिसते.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे .

No comments:

Post a Comment