Meiyazhagan
मेइयाळगन
कधी कधी प्रवासात आपल्याला अशी व्यक्ती भेटते जी आपल्याला जवळून ओळखते .आपल्याशी खूप जुनी ओळख असल्यासारखी बोलत राहते पण आपण तिला संपूर्ण प्रवासात ओळखण्याचा प्रयत्न करतो . तिच्या आपलेपणामुळे आपण मी तुला ओळखत नाही असे बोलायला घाबरतो .शेवटी ती वेळ येतेच जेव्हा ती व्यक्ती आपल्याला नावाने हाक मार असे सांगते आणि पुढे काय ??
1996 लाच अरुलने तंजावर सोडले आणि चेन्नईला आलाय.आता तो त्याची पत्नी ,मुलगी ,बाबा इथे सुखाने रहातायत.त्याला तंजावरची आठवण ही नकोय.पण आता आतेच्या मुलीचे लग्न आहे.तीच एक जवळची बहीण त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून आहे. तिच्या लग्नाला जावेच लागणार आहे नाहीतर ती गोंधळ घालेल याची त्याला खात्री आहे.
आज बावीस वर्षांनी तो तंजावरला आलाय. दुपारी लग्नाला हजर राहायचे रात्री चेन्नईची बस पकडून निघायचे असा त्याचा प्लॅन आहे .
त्याला पाहून बहीण शोभना खुश होते.त्याने गिफ्ट दिलेले पैंजण त्यालाच आपल्या पायात घालायला लावते.त्याने दिलेले दागिने घालून स्टेजवर उभी राहते.
नंतर त्याला तो भेटतो.सुरवातीपासूनच त्याला भाऊ भाऊ म्हणून बोलतो.त्याला लहानपणीच्या आठवणी सांगतो .पण अरुलच्या तो कोण हे लक्षात येत नाही.त्याचे सर्व बोलणे बरोबर असते म्हणून ते खोडूनही काढता येत नाही .तो अरुलला रात्रीच्या गाडीत बसवायचे वचन देतो. त्या प्रमाणे रात्री त्याला बाईकवर बसवून स्टॅण्डवर येतो.
पण दुर्दैवाने बस निघून गेली असते.अरुल चिडतो तसा तो चेहरा केविलवाणा करतो आणि आपल्या घरी येण्याची विनंती करतो .मग सुरू होते रात्रीची कहाणी.
दोघेही बोलता बोलता आपले मन उलगडत जातात.अरुल कमी बोलतो पण तो खूप बोलतो.अरुलने आणि त्याच्या फॅमिलीने त्याच्यावर खूप उपकार केले आहेत असे सांगतो .दोघेही बियर पितात , धरणावर जातात.त्याची पत्नीही अरुलला आपला नवरा किती मानतो ते सांगते.आता त्यांना मूल होणार आहे आणि त्याचे नाव ही त्याने अरुलच्या नावावरून ठरविले आहे. शेवटी बोलता बोलता तो अरुलला तुम्ही माझे नाव एकदाही घेतले नाही असे सांगतो. उद्या सकाळी तुम्ही आम्हाला नाव घेऊन आशीर्वाद द्या असे सांगून झोपी जातो .
आता अरुल बेचैन होतो.आपल्यावर इतके प्रेम करणारा आपल्याला आठवत नाहीत हे त्याच्या जिव्हारी लागते आणि तो एक निर्णय घेतो .
या चित्रपटात राग ,लोभ, मत्सर ,हाणामारी काहीही नाही .हा एक सरळ साधा भावनिक नात्यांचा चित्रपट आहे जो सरळ चालत राहतो.अरुल सोबत आपणही त्याचे नाव शोधतो .अरुलचे बेचैन होणे आपल्याला पाहवत नाही .चित्रपट मध्येच हसवतो तर मध्येच गंभीर करतो.
अरुल बनलेला अरविंदस्वामी आपल्या संयमित अभिनयाचे दर्शन घडवितो. तर तो बनलेला करथी आपल्याला भरपूर हसवतोही आणि रडवतोही.
त्याचे नाव काय हे जाणण्यासाठी तरी चित्रपट पाहायला हवा.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment