Monday, December 18, 2023

कानविंदे हरवले

कानविंदे हरवले
हृषीकेश गुप्ते
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
खरे तर मिसेस कानविंदेचा तो फोन मिहीर इनामदारने घेतला नसता तर पुढच्या घटना कदाचित टळल्या असता.पण जे घडणार आहे ते टाळू शकत नाही.
वासुदेव कानविंदे हे सिनेमा जगतातील मोठे नाव.अर्थात मिहीर इनामदारही त्याच क्षेत्रात आर्ट डायरेक्टर होता म्हणून कानविंदेला नावाने ओळखून होताच.कानविंदे हे प्रसिद्ध ध्वनी संयोजक ,डायरेक्टर आहेत.
त्या दिवशी अचानक एका अनोळखी नंबर वरून मिहीरला फोन आला .कानविंदे हरवले आहेत असे त्यांची पत्नी म्हणत होती.
खरे तर मला का फोन केला ?? माझा काय संबंध ? असे अनेक प्रश्न मिहीरला पडले होते.
आठ दिवसांपूर्वी पहिल्यांदाच त्याला कानविंदेचा फोन आला होता.पण त्या फोनवर काय बोलणे झाले तेच मिहीरला आठवत नव्हते.
मिसेस कानविंदेच्या आग्रहावरून मिहीर त्यांना भेटायला गेला, तेव्हा तिने त्याच्या हातात एक लिफाफा ठेवला. त्यात जुन्या व्हिडिओ कॅसेट लायब्ररीची रिसीट होती. त्यात कानविंदेने एक व्हिडिओ कॅसेट भाड्याने घेतल्याची सही होती.पण अजून दोनजणांनी तीच कॅसेट भाड्याने घेतल्याची नोंद होती. कॅसेट लायब्ररीचा पत्ता मुंबईचा होता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या कार्डवर तिसरे नाव मीर इनामदार उर्फ मिहीरचे होते.सहीही त्याचीच होती.पुण्यात राहणारा मिहीर मुंबईत जाऊन व्हिडीओ कॅसेट भाड्याने का घेईल ? 
आता मात्र मिहीर गोंधळात पडला .पण व्हिडिओ कॅसेट लायब्ररीचा मालक मुश्ताकभाई होता.जे मिहीरचा बालपणीचा मित्र इनायतचे वडील होते. पण कार्डवर तारीख चौऱ्याणव सालातील होती आणि तेव्हा मिहीर सोळा वर्षाचा होता.
आता मिहीरला मोरब्याला जाऊन मुश्ताकभाईला भेटावेच लागणार होते .कारण त्या कार्डवर लिहिलेली व्हिडीओ कॅसेट महत्वाची होती. त्याच कॅसेटच्या मागे कानविंदे होते.
काय आहे कानविंदेचे रहस्य ? ते कुठे हरविले आहेत ? त्यांचा मिहीर इनामदारशी काय संबंध ?? 
एक अतर्क्य ,गूढ आणि लेखकाच्या नेहमीच्या शैलीला साजेशी अशी गूढरम्य कादंबरी .

Thursday, December 14, 2023

ओरिजिन

ओरिजिन 
डॅन ब्राऊन 
अनुवाद ...मोहन गोखले 
मेहता पब्लिकेशन हाऊस
मानवाची उत्पत्ती कश्यापासून झाली ?? अर्थात  माकडापासून असा डार्विनचा शोध जगाला मान्य आहे.पण हे माकड कुठून आले ? ते देवाने निर्माण केले की विज्ञानाने.
 चर्च आणि विज्ञान यांचा वाद गेली अनेक शतके चालू आहे.गॅलिलिओ विज्ञानाचा आधार घेऊन चर्चशी भांडला .त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी चर्चच्या देवाविषयीच्या अनेक समजुती मोडीत काढल्या .आजही सजीव कसे तयार झाले याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञ करतायत .
आज रात्री स्पेनमध्ये एक महान शोध प्रसिद्ध होणार आहे.जगभरातील प्रसारमाध्यमातून त्याचे लाईव्ह प्रसारण होईल .एडमंड कर्ष हा तरुण उद्योजक ,कॉम्प्युटर तज्ञ, विडिओ गेमचा निर्माता या शोधाच्या पाठीशी आहे .
स्पेनमधील बिलबाओ शहरातील गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयात हा कार्यक्रम होणार आहे . त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रसिद्ध सांकेतिकचिन्ह तज्ञ प्रोफेसर रॉबर्ट लॅग्डन याना खास आमंत्रित केलंय.
खरे तर एडवर्ड कर्ष हा लॅग्डनचा आवडता विद्यार्थी.अतिशय हुशार ,मॉर्डन आर्टचा चाहता.
हा शोध जनतेसमोर आणण्याआधी त्याने बिशप वॉल्डस्पिनो हे स्पेनच्या राजाचे मित्र, ज्यू धर्मगुरू  राब्बो येहुदा आणि इमाम सैय्यद अल फदल या प्रसिद्ध धर्मगुरूसोबत मिटिंग घेतली होती. एडमंडचा शोध पाहून तिघेही हादरून गेले.हा शोध जनतेसमोर आला तर मानवजातीचा विनाश नक्की आहे असे त्यांचे मत झाले.
गुगेनहाईम येथे जमलेल्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींना एक हेडफोन देण्यात आला होता .रॉबर्टला ही एक हेडफोन होता .त्यातून एडमंडचा खास सहाय्यक विन्स्टन  रॉबर्टला सूचना करीत होता .खरे तर विन्स्टन कोणी पुरुष नसून तो अत्याधुनिक कुत्रीम बुद्धीमत्ता असणारा कॉम्प्युटर होता. कार्यक्रमाची आयोजक गुगेनहाईम म्युझियमची प्रमुख अधिकारी आणि एडमंडची मैत्रीण आणि स्पेनच्या राजपुत्राची नियोजित वधू अँब्रा व्हिडाल होती.
या कार्यक्रमात आयत्यावेळी एक व्यक्ती शिरली होती.राजवाड्यातून त्या व्यक्तीला कार्यक्रमाला येऊ द्यावे अशी विनंती अँब्राला केली होती.
अतिशय नाट्यमयरीतीने कार्यक्रम सुरू झाला आणि मुख्य कार्यक्रमाला काही मिनिटेच बाकी असताना कुठूनशी एक गोळी झाडण्यात आली आणि तिने एडमंड कर्षच्या कपाळाचा वेध घेतला . त्यापूर्वी रॉबर्टला ही धोक्याची जाणीव झाली आणि तो एडमंडच्या दिशेने धावत सुटला.जगभरातील करोडो प्रेक्षकांनी हे दृश्य लाईव्ह पाहिले.
कोण आहेत ज्यांना एडमंडचा हा शोध जगासमोर येऊ द्यायचा नाहीय ? हा शोध माहीत असणारे तीन धर्मगुरू आणि एडमंडच आहेत .त्यातील दोन धर्मगुरूंचा त्यांच्या देशात आणि एडमंडचा आता इथे खून झालाय.स्पेनच्या राजपुत्रालाही अँब्रा आणि एडमंडची जवळीक सहन होत नाहीय.
आपले काही बरेवाईट झाले तर रॉबर्ट आपला शोध जगासमोर आणेल याची खात्री एडमंडला आहे आणि तश्या सूचना त्याने विन्स्टनला दिल्या होत्या.
आपल्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला खून पाहून अँब्रा हादरली. तिने रॉबर्टला साथ देण्याचे नक्की केले.पण शाही रक्षक ,स्पेनचे लोकल पोलीस यांच्यापासून ते कसे वाचणार ?? 
आपल्या शोधपर्यंत जाण्यासाठी एडमंडने काही खुणा चिन्हे मागे सोडली आहेत .त्या चिन्हांचा आधार घेत रॉबर्टला त्याच्या सुपर कॉम्प्युटरपर्यंत पोचायचे आहे आणि त्याचा शोध जनतेसमोर आणायचा आहे ? रॉबर्ट यात यशस्वी होईल का ?? असा कोणता शोध एडमंड कर्षने लावला आहे की त्यासाठी खून होतायत ?
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी ,एका रात्रीच घडणारी डॅन ब्राऊनच्या नेहमीच्या शैलीतील थरारक कादंबरी.
AI अर्थात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर या कादंबरीमध्ये केला आहे.

Tuesday, December 12, 2023

जिगर थंडा डबल x

Jigar thanda Double X
जिगर थंडा डबल x
 तामिळनाडूतील कोंबईचे घनदाट जंगल हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.तिथे अगणित हत्तींच्या शिकारी होतात.शेट्टानी हा तिथला प्रमुख शिकारी.तो सहजपणे हत्तीची शिकार करतो.त्याला अजूनही कोणी पाहिले नाही.त्याचे लागेबांधे वरपर्यंत आहेत. पोलिसांचे एक दल त्याच्या बंदोबस्तासाठी जंगलात तळ ठोकून आहे.पण डीएसपी रतनकुमार गावातील निरपराध लोकांना पकडून त्यांचा छळ करतोय.
ही घटना आहे साठ आणि सत्तर च्या दशकातील . मदुराईतील एक तरुण किरुबन पोलीस खात्यात सिलेक्ट झाल्याचे पत्र घेऊन आपल्या प्रेयसीला भेटायला कॉलेजमध्ये आलाय.तो पोलिसात सिलेक्ट तर झालाय पण रक्त पाहिले की त्याला अटॅक येतो.तो कोणाला साधा दम ही देऊ शकत नाही.त्याची प्रेयसी त्याला मजेत चार तरुणाचे भांडण सोडविण्यास सांगते .थोड्या वेळाने बाहेर गडबड उडते म्हणून ती धावत बाहेर येते तेव्हा ते चार तरुण मरून पडलेले असतात आणि किरुबनच्या हातात सुरा असतो.पोलीस त्याला पकडून घेऊन जातात.
तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदासाठी चुरस चालू असते. त्यातील एका नेत्याला पाठिंबा देणाऱ्या गुंडाची हत्या करण्याची सुपारी डीएसपी रतनकुमार किरुबनला देतो.त्यांच्यामते तो पोलिसात सिलेक्ट झालेला होता आणि चारजणाची क्रूरपणे हत्या केली होती म्हणून तो हुशार असेल.त्याबदल्यात त्यांच्यावरील सर्व आरोप दूर करण्याचे आश्वासन देतो.
अलियन सिजर शहरातील खतरनाक गुंड .तो हत्तीच्या दातांची तस्करी करतो. त्याला मारायची सुपारी किरुबनला दिलीय. अलियन सिजरला चित्रपटाचे वेड आहे.क्लिंट इस्टवूड त्याचा आवडता हिरो.किरुबन रे दासन बनून त्याच्याकडे जातो आणि त्याच्या जीवनावर चित्रपट बनवायचा आहे असे सिजरला सांगतो.तो त्याच्या प्रत्येक गोष्टीची शूटिंग करतो .पण संधी मिळूनही मारू शकत नाही.शेवटी शेट्टानीला जिवंत पकडून दिल्यास तू राज्यात हिरो बनशील आणि चित्रपट हिट होईल असे सांगतो. शेट्टानी सिजरला नक्की ठार मारेल असा त्याला विश्वास असतो.
सिजर जंगलात जातो पण पुढे अश्या काही अनपेक्षित गोष्टी घडतात ज्या पडद्यावर पहाणेच योग्य ठरेल .
पावणेतीन तासाचा हा चित्रपट सुरवातीस विनोदी वाटतो पण मध्यभागी हिंसक बनतो आणि शेवटी अनपेक्षित वळण घेतो.
राघव लॉरेन्सने अलियन सिजरची भूमिका सहजपणे केलीय.त्याचा क्रूर चेहरा धडकी भरवितो. एस. के.सुर्या किरूबनच्या भूमिकते सहानुभूती मिळवतो .
पर्यावरण ,आदिवासी ,अवैध शिकार त्यावर चालणारे राजकारण यावर प्रकाश टाकणारा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.
यातील vfx पाहण्यासारखे आहे.विशेषतः हत्तीची शिकार पाहताना अंगावर काटा येतो.

Sunday, December 10, 2023

कडक सिंह

कडक सिंह
Kadak Singh 
ए. के.श्रीवास्तवने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे ऐकून कोणाचाच विश्वास बसला नाही. सरकारच्या आर्थिक गुन्हे विभागात त्याच्याइतका स्वच्छ प्रतिमेचा आणि कठोर अधिकारी दुसरा कोणीच नव्हता.
 त्यांचे काम इतके अचूक आहे की आत्महत्या करण्यात ही चूक होणार नाही असे त्यांचा सहकारी अर्जुन म्हणतो.
पण सध्या परिस्थितीच वाईट आलीय.अशोक अग्रवालने चिट फंड घोटाळा करून हजारो भागीदारकांचे पैसे बुडविले आहेत.त्या प्रकरणात ए के च्या एका सहकऱ्याने देखील आत्महत्या केलीय.
ए. के. ला शुद्धीवर काहीच आठवत नाही.साक्षी नावाची तरुणी त्याला भेटायला येते आणि त्याची मुलगी म्हणून ओळख सांगते. तेव्हा तो नकार देतो.आदित्य नावाचा पाच वर्षांचा मुलगा आपल्याला आहे असे तो सांगतो.पण आता आदित्य सतरा वर्षाचा आहे. तरीही तो साक्षीची संपूर्ण गोष्ट ऐकून घेतो. घरी आपल्याला कडकसिंह म्हणतात हे ऐकून त्याला हसू येते.
मग त्यागी येतो.त्यागी त्याचा बॉस. तोही ए .के. कोण आहे , तो इथे कसा आला ,चिट फंडची काय भानगड आहे ते सांगतो.ए .के. शांतपणे तेही ऐकून घेतो.
त्यानंतर अर्जुन त्याला त्याच्याकडे असलेली माहिती देतो .मग नैना येते.ती ए. के. ची मैत्रीण असल्याचे सांगते.या सर्व गोष्टी ए. के. आपली नर्स मिस कन्नन सोबत एन्जॉय करत ऐकत असतो.काही गोष्टींची पडताळणी मिस कन्नन करून तो करून घेतो.
एका झटापटीत अशोक अग्रवाल मारला जातो. काही कागदपत्रे तपासल्यावर साक्षीला वाटते आपले वडील आत्महत्या करू शकत नाहीत.
असे काय घडते की ए. के.सारखा कठोर अधिकारी आत्महत्येचे पाऊल उचलेलं ??चिट फंड घोटाळ्यात नक्की कोण कोण अडकले आहेत ? ए. के.ची स्मृती खरच गेलीय की तो नाटक करतोय. 
ह्या सर्वांची उत्तरे हवी असतील तर झी 5 वर कडक सिंह पहायलाच हवा.
कडक सिंहच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी सोडला तर कोणीही नावाजलेले कलाकार यात नाहीत.अर्धा चित्रपट हॉस्पिटलच्या रूममध्ये आणि पंकज त्रिपाठी बेडवर असताना आहे. पण एक एक धागा जोडत या प्रकरणाच्या शेवटी काय होते हे पाहणे मजेशीर आहे.

Friday, December 8, 2023

अलक

अलक 
"आताच्या काळात प्रेतालाही चार माणसे जमणे मुश्किल."त्याचा आजारी बाप हातात हात घेऊन पुटपुटला.
"काळजी नको बाबा, पन्नास माणसे नक्कीच जमतील तुमच्या अंत्ययात्रेला."त्याने ही हसत उत्तर दिले.
आज खरोखरच पन्नास माणसे बाबांच्या अंत्ययात्रेत उपस्थित होती.स्मशानभूमीतून बाहेर पडल्यावर त्याने प्रत्येकाच्या हाती दोनशेची नोट देत नमस्कार केला. "पैशाने हल्ली बरीच कामे होतात हे पटले आज."तो माझ्याकडे पाहून डोळे पुसत म्हणाला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

The Italian Job

The Italian Job
द इटालियन जॉब 
जॉन ब्रिगर आणि त्याची टीम प्रोफेशनल चोर आहेत.त्यात चार्ली योजना आखण्यात पटाईत आहे.तर रॉब गाडी चालविण्यात. जॉन आयुष्यातील शेवटची चोरी करणार असतो.इटलीतील व्हेनिस शहरात ते एका माफियाकडील सोने लुटतात .सोने घेऊन पळताना त्यांचाच एक साथीदार स्टिव्ह गद्दारी करून ते सोने ताब्यात घेऊन सर्वाना ठार मारायचा प्रयत्न करतो त्यात जॉन मारला जातो.
जॉनची मुलगी स्टेलाही तिजोरी खोलण्यात तरबेज आहे.ती पोलिसांना मदत करते.एका वर्षांनी चार्ली तिला फिलाडेल्फियात भेटतो आणि स्टिव्हचा पत्ता लागल्याचे सांगतो.आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्टेला चार्लीला साथ देण्याचे ठरविते.
स्टिव्ह एका मोठ्या बंगल्यात राहतो .त्याच्या तिजोरीतून सोने पळविण्याची योजना चार्ली आखतो .पण स्टिव्हला त्यांची योजना कळते .तो ते सोने घेऊन दुसऱ्या देशात पळून जायचे ठरवितो. स्टिव्ह यात यशस्वी होईल का ? की चार्लीला आपली योजना आयत्यावेळी बदलावी लागेल ?? 
एक उत्कंठावर्धक थरारक चोरी पहायची असेल तर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदी भाषेत जरूर पहा.
मार्क वॉलबर्ग, जेसोन स्टेथाम, चार्लीझ थेरोन प्रमुख भूमिकेत आहेत. यात बंदुकबाजी नाही ,हाणामारी नाही .फक्त चोरीचे प्लॅनिंग आणि तुफानी पाठलाग आहे.

Sunday, December 3, 2023

The Equalizer 3

The Equalizer 3
द इक्विलायझर 3
आधीच्या दोन भागापासून हा थोडा वेगळा आहे. यात हिंसा कमी, पण जी आहे ती फारच क्रूर आहे.
सिसलीतील एका वायनरी असलेल्या किल्लेवजा गढीत रॉबर्ट मकॅल हल्ला करून वायनारीच्या मालकाला आणि त्यांच्या मालकाला ठार मारतो.
पण निघताना तो जखमी होतो. एक पोलीस अधिकारी त्याला आपल्या अल्टामोंन्टे या छोट्या गावात घेऊन येतो. तेथील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतो.रॉबर्ट त्याच गावात राहतो.पण अमेरिकेला त्या गढीतील अंमली पदार्थाची माहिती देतो.
अल्टामोंन्टे गावात माफियाचे राज्य आहे.व्हिसेन्ट आणि त्याचा भाऊ तेथील लोकांशी क्रूरपणे वागतात.अंमली पदार्थाच्या पैशातून इटलीत बॉम्बहल्ले होतात. पोलीस प्रमुख व्हिन्सेंटला हे प्रकार बंद करायला सांगतो पण त्यालाच मारहाण होते.आता रॉबर्टलाच काहीतरी करायला हवे.पण तो एकटा या माफियाशी लढेल का ? 
अतिशय टापटीप आणि स्वच्छतेची काळजी घेणारा .हातातील घड्याळात वेळ लावून समोरच्याला मारणारा रॉबर्ट डेंझल वॉशिंग्टनने नेहमीप्रमाणे सहज रंगविला आहे.पण यात तो आधीच्या दोन भागापेक्षा जास्त अग्रेसिव्ह वाटतो.तो लोकांच्यात मिसळतो .त्यांच्याशी मैत्री करतो.पण शत्रूला मारताना नेहमीसारखा थंड रक्ताने मारतो.
ज्यांनी आधीचे दोन भाग पाहिले आहेत त्यांनी हा भाग नक्कीच पहावा .
चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .