Thursday, December 14, 2023

ओरिजिन

ओरिजिन 
डॅन ब्राऊन 
अनुवाद ...मोहन गोखले 
मेहता पब्लिकेशन हाऊस
मानवाची उत्पत्ती कश्यापासून झाली ?? अर्थात  माकडापासून असा डार्विनचा शोध जगाला मान्य आहे.पण हे माकड कुठून आले ? ते देवाने निर्माण केले की विज्ञानाने.
 चर्च आणि विज्ञान यांचा वाद गेली अनेक शतके चालू आहे.गॅलिलिओ विज्ञानाचा आधार घेऊन चर्चशी भांडला .त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी चर्चच्या देवाविषयीच्या अनेक समजुती मोडीत काढल्या .आजही सजीव कसे तयार झाले याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञ करतायत .
आज रात्री स्पेनमध्ये एक महान शोध प्रसिद्ध होणार आहे.जगभरातील प्रसारमाध्यमातून त्याचे लाईव्ह प्रसारण होईल .एडमंड कर्ष हा तरुण उद्योजक ,कॉम्प्युटर तज्ञ, विडिओ गेमचा निर्माता या शोधाच्या पाठीशी आहे .
स्पेनमधील बिलबाओ शहरातील गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयात हा कार्यक्रम होणार आहे . त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रसिद्ध सांकेतिकचिन्ह तज्ञ प्रोफेसर रॉबर्ट लॅग्डन याना खास आमंत्रित केलंय.
खरे तर एडवर्ड कर्ष हा लॅग्डनचा आवडता विद्यार्थी.अतिशय हुशार ,मॉर्डन आर्टचा चाहता.
हा शोध जनतेसमोर आणण्याआधी त्याने बिशप वॉल्डस्पिनो हे स्पेनच्या राजाचे मित्र, ज्यू धर्मगुरू  राब्बो येहुदा आणि इमाम सैय्यद अल फदल या प्रसिद्ध धर्मगुरूसोबत मिटिंग घेतली होती. एडमंडचा शोध पाहून तिघेही हादरून गेले.हा शोध जनतेसमोर आला तर मानवजातीचा विनाश नक्की आहे असे त्यांचे मत झाले.
गुगेनहाईम येथे जमलेल्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींना एक हेडफोन देण्यात आला होता .रॉबर्टला ही एक हेडफोन होता .त्यातून एडमंडचा खास सहाय्यक विन्स्टन  रॉबर्टला सूचना करीत होता .खरे तर विन्स्टन कोणी पुरुष नसून तो अत्याधुनिक कुत्रीम बुद्धीमत्ता असणारा कॉम्प्युटर होता. कार्यक्रमाची आयोजक गुगेनहाईम म्युझियमची प्रमुख अधिकारी आणि एडमंडची मैत्रीण आणि स्पेनच्या राजपुत्राची नियोजित वधू अँब्रा व्हिडाल होती.
या कार्यक्रमात आयत्यावेळी एक व्यक्ती शिरली होती.राजवाड्यातून त्या व्यक्तीला कार्यक्रमाला येऊ द्यावे अशी विनंती अँब्राला केली होती.
अतिशय नाट्यमयरीतीने कार्यक्रम सुरू झाला आणि मुख्य कार्यक्रमाला काही मिनिटेच बाकी असताना कुठूनशी एक गोळी झाडण्यात आली आणि तिने एडमंड कर्षच्या कपाळाचा वेध घेतला . त्यापूर्वी रॉबर्टला ही धोक्याची जाणीव झाली आणि तो एडमंडच्या दिशेने धावत सुटला.जगभरातील करोडो प्रेक्षकांनी हे दृश्य लाईव्ह पाहिले.
कोण आहेत ज्यांना एडमंडचा हा शोध जगासमोर येऊ द्यायचा नाहीय ? हा शोध माहीत असणारे तीन धर्मगुरू आणि एडमंडच आहेत .त्यातील दोन धर्मगुरूंचा त्यांच्या देशात आणि एडमंडचा आता इथे खून झालाय.स्पेनच्या राजपुत्रालाही अँब्रा आणि एडमंडची जवळीक सहन होत नाहीय.
आपले काही बरेवाईट झाले तर रॉबर्ट आपला शोध जगासमोर आणेल याची खात्री एडमंडला आहे आणि तश्या सूचना त्याने विन्स्टनला दिल्या होत्या.
आपल्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला खून पाहून अँब्रा हादरली. तिने रॉबर्टला साथ देण्याचे नक्की केले.पण शाही रक्षक ,स्पेनचे लोकल पोलीस यांच्यापासून ते कसे वाचणार ?? 
आपल्या शोधपर्यंत जाण्यासाठी एडमंडने काही खुणा चिन्हे मागे सोडली आहेत .त्या चिन्हांचा आधार घेत रॉबर्टला त्याच्या सुपर कॉम्प्युटरपर्यंत पोचायचे आहे आणि त्याचा शोध जनतेसमोर आणायचा आहे ? रॉबर्ट यात यशस्वी होईल का ?? असा कोणता शोध एडमंड कर्षने लावला आहे की त्यासाठी खून होतायत ?
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी ,एका रात्रीच घडणारी डॅन ब्राऊनच्या नेहमीच्या शैलीतील थरारक कादंबरी.
AI अर्थात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर या कादंबरीमध्ये केला आहे.

No comments:

Post a Comment