Tuesday, December 12, 2023

जिगर थंडा डबल x

Jigar thanda Double X
जिगर थंडा डबल x
 तामिळनाडूतील कोंबईचे घनदाट जंगल हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.तिथे अगणित हत्तींच्या शिकारी होतात.शेट्टानी हा तिथला प्रमुख शिकारी.तो सहजपणे हत्तीची शिकार करतो.त्याला अजूनही कोणी पाहिले नाही.त्याचे लागेबांधे वरपर्यंत आहेत. पोलिसांचे एक दल त्याच्या बंदोबस्तासाठी जंगलात तळ ठोकून आहे.पण डीएसपी रतनकुमार गावातील निरपराध लोकांना पकडून त्यांचा छळ करतोय.
ही घटना आहे साठ आणि सत्तर च्या दशकातील . मदुराईतील एक तरुण किरुबन पोलीस खात्यात सिलेक्ट झाल्याचे पत्र घेऊन आपल्या प्रेयसीला भेटायला कॉलेजमध्ये आलाय.तो पोलिसात सिलेक्ट तर झालाय पण रक्त पाहिले की त्याला अटॅक येतो.तो कोणाला साधा दम ही देऊ शकत नाही.त्याची प्रेयसी त्याला मजेत चार तरुणाचे भांडण सोडविण्यास सांगते .थोड्या वेळाने बाहेर गडबड उडते म्हणून ती धावत बाहेर येते तेव्हा ते चार तरुण मरून पडलेले असतात आणि किरुबनच्या हातात सुरा असतो.पोलीस त्याला पकडून घेऊन जातात.
तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदासाठी चुरस चालू असते. त्यातील एका नेत्याला पाठिंबा देणाऱ्या गुंडाची हत्या करण्याची सुपारी डीएसपी रतनकुमार किरुबनला देतो.त्यांच्यामते तो पोलिसात सिलेक्ट झालेला होता आणि चारजणाची क्रूरपणे हत्या केली होती म्हणून तो हुशार असेल.त्याबदल्यात त्यांच्यावरील सर्व आरोप दूर करण्याचे आश्वासन देतो.
अलियन सिजर शहरातील खतरनाक गुंड .तो हत्तीच्या दातांची तस्करी करतो. त्याला मारायची सुपारी किरुबनला दिलीय. अलियन सिजरला चित्रपटाचे वेड आहे.क्लिंट इस्टवूड त्याचा आवडता हिरो.किरुबन रे दासन बनून त्याच्याकडे जातो आणि त्याच्या जीवनावर चित्रपट बनवायचा आहे असे सिजरला सांगतो.तो त्याच्या प्रत्येक गोष्टीची शूटिंग करतो .पण संधी मिळूनही मारू शकत नाही.शेवटी शेट्टानीला जिवंत पकडून दिल्यास तू राज्यात हिरो बनशील आणि चित्रपट हिट होईल असे सांगतो. शेट्टानी सिजरला नक्की ठार मारेल असा त्याला विश्वास असतो.
सिजर जंगलात जातो पण पुढे अश्या काही अनपेक्षित गोष्टी घडतात ज्या पडद्यावर पहाणेच योग्य ठरेल .
पावणेतीन तासाचा हा चित्रपट सुरवातीस विनोदी वाटतो पण मध्यभागी हिंसक बनतो आणि शेवटी अनपेक्षित वळण घेतो.
राघव लॉरेन्सने अलियन सिजरची भूमिका सहजपणे केलीय.त्याचा क्रूर चेहरा धडकी भरवितो. एस. के.सुर्या किरूबनच्या भूमिकते सहानुभूती मिळवतो .
पर्यावरण ,आदिवासी ,अवैध शिकार त्यावर चालणारे राजकारण यावर प्रकाश टाकणारा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.
यातील vfx पाहण्यासारखे आहे.विशेषतः हत्तीची शिकार पाहताना अंगावर काटा येतो.

No comments:

Post a Comment