Monday, October 12, 2020

स्त्रियांवरील अत्याचार ... वृत्ती की प्रवृत्ती

स्त्रियांवरील अत्याचार ... वृत्ती की प्रवृत्ती
निसर्गानेच स्त्री पुरुष असे लिंगभेद केले आहेत. त्यातील एक दुर्बळ आणि एक सबळ असाच भेद आहे . प्रजननशक्ती स्त्रियांना द्यायची आणि आर्थिक जबाबदारी पुरुषांनी घ्यायची म्हणून ते शक्तिशाली असे कारण असावे . मातृत्व आले म्हणजे कोमल वृत्ती हळवेपणा आलाच आणि यातूनच समाजरचना निर्माण झाली .
विरोधी आकर्षण हा सुष्टीचा नियम आहे. स्त्री पुरुष भिन्न लिंगी म्हणजे आकर्षण आलेच . स्त्रियांनी घरात राहून जबाबदारी सांभाळावी म्हणून त्या दुर्बल समजल्या गेल्या. त्या शरीरानेही कमकुवत राहिल्या . पण त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि ते पुरातनकाळापासून सिद्ध झाले आहे.
 रामायणात ही कैकयीने अतुलनीय पराक्रम करून दशरथ राजाला विजयी केले आणि त्यांनी दिलेल्या वराचा उपयोग योग्यवेळी केला होता.
जिजाबाईंनी काळाची गरज ओळखून शिवाजी महाराजांना घडविले . 
पण कुठेतरी स्त्रियांना नेहमीच भोगवस्तू समजले गेले. प्रजननासाठी काही राजे महाराजांनी अनेक स्त्रियांचा वापर केला गेला आणि ती संकल्पना मागे पडली पण  मनातून ती भोगवस्तू राहिलीच . 
पूर्वीपासूनच स्त्रियांवर अत्याचार होत होतेच. काहींवर शारीरिक तर काहींवर मानसिक. पण ते फारच कमी प्रमाणात होते. कदाचित आतासारखे जग पूर्ण ओपन नसेल .एकत्र कुटुंबपद्धती होत्या.स्त्रियांचा आदर करावा हे संस्कार लहानपणापासूनच होत होते . स्त्रियाही एकट्या घराबाहेर पडत नव्हत्या काळोख पडायच्या आत घरी येत होत्या .
हळूहळू जग समाज बदलत गेला. स्त्रिया ही समान हक्कासाठी लढू लागल्या  आणि यशस्वीही  झाल्या . पण त्यांना साथ देणारे काही पुरुषच होते या गोष्टीही लक्षात घेतल्या पाहिजे.
 समाज बदलला तशी मानवाची मानसिक स्थितीही बदलली . लैंगिक शिक्षण पुस्तकातून मिळू लागले ते ही अनधिकृत . ज्या गोष्टी खुलेआम बोलता येत नाहीत त्याचे आकर्षण प्रत्येकाला असते . योग्य वयात योग्य ज्ञान न मिळता ते इतर मार्गातून मिळू लागले त्याचा परिणाम पुरुषांच्या वृत्तीवर झाला . त्यांची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली . अंगातील वासना बाहेर पडत नव्हती . तर लग्नाशिवाय पुरुषाला अंगाला हात लावू द्यायचे नाही ही आपली संस्कृती . त्याचा उलट परिणाम होऊ लागला . वयात येणाऱ्या पुरुषाची अवस्था पिंजऱ्यात कोंडलेल्या जनावरसारखी झाली . तो हल्ला करायची संधी शोधू लागला आणि त्याचाच परिणाम स्त्रियांवर झाला . संधी मिळाली की त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले .तरीही त्यांचे प्रमाण खूप कमी होते . कारण इंटरनेट स्वतंत्र न्यूज चॅनेल अश्या गोष्टी यायला अजून उशीर होता.
पण इंटरनेट आणि खाजगी वाहिन्यांनी समाजात प्रवेश केला आणि सर्व दरवाजे खुले झाले . लहान वयातच मुलामुलींना अयोग्य पद्धतीने लैंगिक ज्ञान मिळू लागले . आई वडील नोकरी करणारे ,स्वतंत्र कुटुंब पद्धती त्यामुळे मुलांवर संस्कार होतच नव्हते .  इंटरनेटमुळे जॉब वाढले जग जवळ आले त्यामुळे अहोरात्र काम सुरू झाले . जी स्त्री सातनंतर घराबाहेर पडत नव्हती ती आता नाईटशिफ्ट करू लागली.
 समाजात दोन घटक होते . एक शिक्षित वर्ग तर दुसरा अशिक्षितवर्ग .पण दोन्ही घटकात एक गोष्ट कॉमन होती . स्त्रीविषयी आकर्षण .वासना ....
 शिक्षितवर्ग आपल्या परीने स्वतःची तहान भागवत होता तर अशिक्षित वर्ग मिळेल त्या पद्धतीने . आज ग्रामीण भागात अतिदुर्गम भागात मोबाईल टॉवर लागले आहेत पण शाळा सुरू नाहीत . प्रत्येकाच्या हातात फोन आलेत पण खिशाला पेन लागले नाहीत .
खरे तर स्त्रियांवरील अत्याचाराला शिक्षणव्यवस्था हीच कारणीभूत आहे असे माझे ठाम मत आहे .जो पर्यंत प्रत्येक मुलगा मुलगी साक्षर होत नाही तोपर्यंत स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी होणार नाही . आज शिक्षणच तुम्हाला स्त्रियांचा आदर करायला शिकवेल ,आपली लैंगिक भूक कंट्रोल करायला शिकवेल किंवा ती कुठे कशी वापरायची याचे ज्ञान देईल .
एक प्रश्न मनात येतो कदाचित हेच उलट झाले असते तर पुरुषांवर अत्याचार झाले असते ना ....??
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment