Wednesday, October 21, 2020

ती एक देवी ...३

ती एक देवी ....३
तिच्याकडे कपडे फारसे नव्हतेच .तशी गरजच भासली नव्हती. नवरा गेल्यानंतर संसाराची जबाबदारी तिच्यावर पडली होती आणि ती समर्थपणे सांभाळत होती.
 नेहमीप्रमाणे आजचा रंग तिच्याकडे नव्हताच.. पण हरकत नाही... भावाचा त्या रंगाचा टी शर्ट होताच.
 तोच घालून दिवसभर वावरायचे... उद्याचे उद्या बघू .असे मनाशी म्हणत तिने टी शर्ट अंगावर चढवला आणि गाडीकडे निघाली.
होय ती खाजगी टॅक्सीचालक होती . सकाळी टॅक्सी बाहेर काढायची . दुपारी घरी येऊन जेवायचे पुन्हा संध्याकाळी कॉल आल्यावर बाहेर ...
कसले सण...कसले काय.. ???? उलट या सणाच्या दिवसात धंदा जोरात. शहराचा कानोकोपरा माहीत होता तिला.
आताही संध्याकाळी देवापुढे बत्ती लावताना मोबाईल वाजला . ती विशिष्ट बेल... कॉल आहे समजून गेली .मुकाटपणे गाडी चालू केली आणि ठरलेल्या ठिकाणी गाडी उभी केली . 
थोड्याच वेळाने ती गाडीपाशी आली .कोणीही मान वळवून पाहिल असे रूप होते तिचे . आजच्या रंगाचा वनपिस तिला खुलून दिसत होता .त्याच रंगांची लिपस्टिक आणि इतर गोष्टीही . शरीर हवे तिथे उठावदार दिसत होते . तिच्या चालीत ही एक डौलदारपणा होता. मोठ्या ऐटीत मागचा दरवाजा उघडून बसली .
"आज मोठे गिऱ्हाईक वाटते ... ."??गाडी स्टार्ट करत पहिलीने कुत्सित स्वरात विचारले . 
"माईड युवर बिझनेस ..." दुसरी ठसक्यात म्हणाली.
"हो ग बाई .... मी माझा करतेय तू तुझा कर .." पहिली हसून म्हणाली आणि गियर टाकला.
"हो आणि मी तो प्रामाणिकपणे करतेय .फसवत नाही कोणाला. जसा दाम तशी सर्व्हिस .. ..ओठावरून लिपस्टिक फिरवीत दुसरी म्हणाली .
तिने सांगितलेल्या स्थळी गाडी उभी राहिली आणि  मागून ती ऐटीत बाहेर पडली . एक नोट पहिलीच्या अंगावर फेकून उरलेले राहू दे अशी खूण करून  डौलदार पावले टाकत त्या घरात शिरली . 
 नोटेकडे पाहत तिने गाडी सुरू केली आणि दुसरा कॉल अटेंड करायला निघाली . आज रस्ता भरलेला दिसत होता . नवरात्रीची गडबड दिसून येत होती . आजच्या रंगांच्या साड्या ड्रेस घालून सर्व स्त्रिया बाहेर दिसत होत्या . पुरुष ही काही कमी नव्हते . अंगावर कुठे ना कुठे आजच्या रंगांची खूण दिसत होतीच . 
दोन तीन कॉल अटेंड करता करता रात्रीचे बारा वाजत आले . आता मात्र शेवटचा कॉल असे म्हणत आलेला कॉल तिने उचलला . योगायोगाने तो कॉल तिने अटेंड केलेल्या पहिल्या ठिकाणच्या जवळपासचा होता.
"जिथून सुरवात केली तिथेच समाप्त...." असे म्हणत तिने मोबाईल बंद केला .कस्टमरला गुड नाईट करून निघणार इतक्यात कोपऱ्यातील गल्लीतून दुसरी बाहेर आली . आता ती पार दमलेली दिसत होती . संध्याकाळची ऐट आता निघून गेली होती . डोळेही सुजल्यासारखे वाटत होते.
" अरे काय झाले हिला ... ?? स्वतःशी पुटपुटत तिने गाडी तिच्याजवळ नेली . ओळखीचा चेहरा पाहताच दुसरीच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून आला .
"मॅडम ...?? काय झाले ...?? काय हा अवतार .."?? हॉर्न वाजवत तिने थोड्या काळजीनेच विचारले .
"हरामखोर साला ... सर्व्हिस घेतली पण ठरलेले पैसे द्यायला नकार दिला .. उलट मारून बाहेर काढले ...ही काय पद्धत झाली का ....?? दुसरी चिडून बडबड करायला लागली.
काय झाले हे पहिलीच्या  लक्षात आले. काही न बोलता ती गाडीतून बाहेर पडली . मागची डिकी उघडून दोन फूट लांबीची लोखंडी सळई बाहेर काढली .दुसरीचा  हात  पकडून शांतपणे म्हणाली "चल दाखव कोण आहे तो ......"?? आणि त्या घरात शिरली .
बेडरूममध्ये तो शांतपणे झोपला होता . कोपऱ्यातील टेबलवर अर्धी भरलेली दारूची बाटली . चिकन तंदुरीचे पॅकेट , वेफर्स असा सरंजाम होता . 
त्या दोघीना पाहताच तो उठला "ए चल निघ .. पैसे नाही मिळणार म्हटले ना ... बरोबर दुसरीला घेऊन आलीस काय ...?? xxx साली .. ..तो चिडून अंगावर धावत येत म्हणाला .
पहिलीने  एका हाताने त्याला ढकलून हातातील सळई त्याच्या पायावर हाणली..".पैसे बुडावतोस काय ...?? अरे शरीर विकते म्हणून काय झाले . प्रामाणिकपणे धंदा करते ती . फसवत तर नाही ना गिऱ्हाईकाला .." सपासप सळईचे वार करत ती ओरडत राहिली . 
ते पाहून दुसरीने दारूची बाटली उचलून त्याच्या डोक्यात घातली." हवी तशी मजा मारलीस आता पैसे द्यायला नकोत तुला ..." ती ही चिडून म्हणाली .
 दोघींचा रुद्रावतार पाहून तो घाबरला . गयावया करत त्याने पैशाचे पाकीट त्यांच्याकडे फेकले .
ठरलेली रक्कम काढून घेऊन दुसरीने पाकीट पुन्हा त्याच्याकडे फेकले . 
"जे ठरले तितकेच घेतलय .. "ती रागाने म्हणाली . 
दोघीही परत निघाल्या इतक्यात तंदुरीच्या पॅकेटकडे बोट दाखवून पहिली म्हणाली "जेवण झाले का तुझे .."?? 
दुसरीने नकारार्थी मान हलवली . तसे तंदुरीचे पॅकेट उचलत तिने हळूच डोळा मारला . दोघीही हसत हसत बाहेर पडल्या.
"ए घरी सोडतेस का मला .. .." दुसरीने विचारले.
"ठरलेले पैसे देणार आणि टीप देणार नसशील तरच सोडेन तुला ...." पहिली गाडी स्टार्ट करून हसत म्हणाली . दोघीही हसल्या .दुसरी दरवाजा उघडून तिच्या बाजूला बसली 
होय ती देवीच आहेत .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment